Skip to content

आपण मोकळं जगू शकतो हेच विसरत चाललोय..

आपण मोकळं जगू शकतो हेच विसरत चाललोय..


सौ. मिनल वरपे


सकाळी साडेपाचचा गजर होताच लगेच अंथरुणातून उठून दोघेही कामाला सुरवात करतात. म्हणजे गजरची हल्ली गरजच नाही. कामाची जबाबदाऱ्यांची इतकी आता सवय झालिये की झोपायच म्हटलं तर मनात असलेली धाकधूक पूर्ण झोप घेऊच देत नाही.. कामाला जायला उशीर होईल की काय.. घरातली कामं वेळेत आवरायला हवीत.. आज ठरलेलं काम झालं नाही तर वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतील सांगता येत नाही… काय माहित आजचा दिवस कसा असेल.. पुन्हा तेच टेन्शन पुन्हा तेच प्रश्न.. आणि या सगळ्यांचा विचार करत झोप या शब्दाचा अर्थ सगळे विसरलेत.. जरावेळ शांत पडावं तर लगेच काहीतरी काम आठवणार आणि मनात हजार विचार येणार…

खरचं का आपण मोकळं जगणं काय असते हे विसरलोत..?? काय असते मोकळं जगणं माहीत तरी आहे का आपल्याला ..??

फक्त सकाळ झाली उठायचं.. पूर्ण दिवस कामाची धडपड .. सतत डोक्यात वेगवेगळे विचार.. काळजी , चिंता, अपेक्षा , आव्हानं, जबाबदाऱ्या, ध्येय… आणि मग रात्र कधी होते कळतसुद्धा नाही कारण आपल्याला वेळ कुठे आहे मोकळा श्वास घ्यायला..!!

मोकळं जगणं म्हणजे काय तर कधीतरी डोक्यात असणाऱ्या विचारांना बाजूला ठेवायचं, जबाबदाऱ्या ना सांगायचं की काही वेळेसाठी तुम्ही लांबच रहा.. चिंता काळजी यांना सुद्धा मनात आणि डोक्यात शिरकाव करायला जागाच द्यायची नाही.. अपेक्षांना बोलायचं काय सारख्या येतात आता माझ्यापासून दूर निघून जा.. आणि ध्येयाला सांगायचं मला माहितीये तू काय आठवण करून देतोस, मलापण तुझी गरज आहेच पण त्यासोबत मोकळं जगण्याची सुद्धा आहे तर आजपासून माझ्या ध्येयाचा भाग म्हणून माझं मोकळं जगणं सुद्धा आहे हे लक्षात ठेव.

कधीतरी मोकळं जगावं स्वतःवर विश्वास ठेवत.. मला जमेल की नाही या विचारांनी मी आजचा क्षण जगत नाहीये पण मला हे नक्कीच जमेल हा माझा आत्मविश्वास मला कमजोर पडू देणार नाही. म्हणून आता मी स्वतःवर विश्वास ठेवत बिनधास्त मोकळं जगायला सुरुवात करणार.

पुढची काळजी मला आजचा आनंद घेऊ देत नाही. आजचा क्षण, आजचा दिवस एवढच नाही तर आतापर्यंत असे अनेक वर्ष गेलीत माझी ती फक्त पुढच्या काळजीने.. त्यामुळे मला आज काही करताच आल नाही.आजच्या या वेळेत मला काय करता येईल याकडे मी दुर्लक्षच केलं उद्याच्या चिंतेने.. पण आता नाही आज जे सुखाचे क्षण आहेत, जो आनंद मिळतोय तो मी अनुभवणार.. उद्याच उद्या बघू.. मी आज मात्र मोकळं जगणार…

बालपण तर खेळण्यात गेलं पण नंतर शिक्षण, नोकरी, जबाबदाऱ्या, लग्न, संसार या माझा पिच्छा सोडत नाहीत अर्थात या सगळ्यातून आपल्याला जायचे आहेच पण त्याचबरोबर मला जगणं सोडायचे नाही.. हे सगळं असताना सुद्धा मला माझं आयुष्य मोकळं जगायचचं आहे हे मी पुरता विसरून गेलोय.म्हणून आज मला माझ्या इच्छा, माझ्या आवडी, माझे छंद जपायचे आहेत.. ज्यातून मला जगण्याचा आनंद लुटता येईल ते सगळंच मला आज करायचं आहे.

अहो सगळ्यांनाच जन्म आहे आणि मरण सुद्धा कोणाचं टळलय या जगात.. पृथ्वीवर येणाऱ्या प्रत्येक जीवाला जगणं आणि मरण आहेच पण तरीसुद्धा या मधल्या काळात आपण खरचं जगतोय का…

आला दिवस ढकलायचा आणि उद्याची काळजी करायची.. बघाना जे नोकरी करतात त्यांना एक रविवार मिळतो आठवड्यातून …सुट्टी म्हणजेच काही वेळ आपल्या सगळ्या विचारांना शांतता मिळावी म्हणून.. आपल्याला स्वतःला सुद्धा वेळ देता यावा म्हणून… पण आपण हा वेळ देतो का स्वतःला….

खरं मोकळं आयुष्य तर प्राणी पक्षी जगतात.. त्यांना ना माणसासारख बोलता येतं ना व्यक्त होता येत पण तरीसुद्धा ते त्यांचं आयुष्य मोकळं जगतात..पण माणसांचं मात्र ज्यांच्याकडे नाही ते मिळवण्यासाठी धडपड आणि ज्यांच्याकडे आहे त्यांना अजून जास्त मिळवण्याची आस पण या सगळ्यांमध्ये माणूस मात्र इतका गुरफटला आहे की मोकळं जगणं काय असते हे सुद्धा आज त्याला लक्षात नाही….

चला तर मग आजपासून आयुष्याची सगळी मज्जा घेत.. मिळालेल्या वेळेला कुठेच वाया जाऊ न देता.. आज स्वतःसाठी मोकळं जगून बघुयात….शिक्षण घेणं, नोकरी चांगली मिळवणं ती टिकवण,. सकाळपासून ते रात्रीपर्यंत कामाचा व्याप आणि ही सगळी धडपड कशासाठी तर जगण्यासाठी.. पण आपण जगतोय का.???

आज या धडपडीत आपण एकवेळच नीट जेवण सुद्धा घेत नाही.. तर मग सांगा कमावतोय का आपण जगण्यासाठी…



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “आपण मोकळं जगू शकतो हेच विसरत चाललोय..”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!