इतरांच्या दुःखात स्वतःला पूर्णपणे हरवून बसू नका !!
सौ. मिनल वरपे
प्रत्येकाचे प्रश्न , त्यांच्या समस्या , अडचणी , दुःख मुळात प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असते. ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो आपलं आयुष्य जगत असतो. कधी सुखात तर कधी दुःखी होत.. प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकजण सक्षम असतो गरज असेलच मदतीची तर मदत सुद्धा घेतात. पण एखाद्याच्या आयुष्यात जर सतत अडचणी येत असतील त्यांना नेहमीच परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल तर त्यांच्या येणाऱ्या दुःखात आपण जमेल ती मदत केली तर ठीक पण कितपर्यंत अडकून राहावं हे आपल्याला कळायला हवं…
आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल, दुःख असतील तर त्यावेळी आपण जमेल ती मदत करण्याचा प्रयत्न करतो. आपण त्यावेळी स्वतःकडे दुर्लक्ष सुद्धा करतो. माझी माणसं कसे आनंदी राहतील याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देतो आणि त्यासाठी आपण धडपड सुद्धा करतो.
त्यांच्या दुःखात वेळ देता देता आपण सुद्धा त्यातून पूर्ण ओरबाडून निघतो. पण मदत करणे, काळजी वाटणे इथपर्यंत नक्कीच सगळं ठीक असते पण त्यांच्या दुःखात स्वतःच आयुष्य जगायचं विसरण अगदीच चुकीचं आहे.
आपण नेहमीच टीव्ही वर बातम्या ऐकतो पाहतो त्यावेळी खूप भयंकर हृदयाला भिडणाऱ्या, छातीत धस्स होईल अशा बातम्या आपण ऐकतो.. कधी कोणाचा अचानक मृत्यू तर कधी कोणाचं होणारा अपघात.. मधल्या काळापासून बातम्या लावाव्यात तर एकावेळी अनेकजणांच्या मृत्यूची बातमी सर्रास ऐकायला मिळते.. कधी बस पुल मधे पडून तर कधी दुसरे अपघात आणि अशा बातम्या बघून आपण घरीच हळहळ व्यक्त करतो, काहीवेळेस इतकं भरून येते की रडतो सुद्धा. काही दिवस आपण त्याच बातम्या बघतो, तीच चर्चा आणि तीच हळहळ व्यक्त करतो पण कालांतराने आपण झालेल्या घटनेत न अडकता आपल्या आयुष्यात व्यस्त होतो.
अगदी असच आपण सगळ्यांच्याच बाबतीत वागलो तर आपल्याला कसलाच त्रास होणार नाही. आपल्याला कळतच नसते जेव्हा आपण दुसऱ्याच्या दुःखात स्वतःला पूर्णपणे विसरतो तेव्हा आतल्या आत आपल्याला होणारा त्रास आपल्याला त्यावेळी जाणवत नसतो तसेच आपल्या जवळच्या माणसांना त्यावेळी आपल्याबद्दल वाटणारी काळजी आपल्याला अजिबात दिसत नाही कारण आपण स्वतःच अस्तित्वच पूर्णपणे विसरलेलो असतो.
समजा तुमच्या मित्राच्या आयुष्यात एखादी दुःखद घटना घडली असेल त्याच्या कुटुंबातील व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला असेल आणि तो खूप दुःखी असेल तर अशावेळी नक्कीच त्याला सांभाळणे, त्यातून त्याला सावरण्याचा प्रयत्न करायला लावणे, त्याच्यासोबत वेळ घालवणे हे अगदीच योग्य आहे पण नंतर सतत त्याचाच विचार करणे आणि आपण काय करतोय, आपल्या बाकीच्या जबाबदाऱ्या काय , आपली कर्तव्ये, आपल्या माणसांना आपण वेळ देतोय का.., सतत मित्राच्या विचारात अडकून स्वतःच ध्येय विसरणे हे अगदी चुकीचं आहे.
येणारा दिवस जाणार आहे.. कोणतीही गोष्ट जास्तकाळ टिकत नाही मग ते सुख असो नाहीतर दुःख. म्हणून येणाऱ्या सुखाचा पुरेपूर आनंद घ्यायचा पण त्यामधे अडकायच नाही आणि याचप्रमाणे दुःखातही निडर होता त्यांनां सामोरे जायचे त्यांच्याकडून शिकवण घ्यायची..आणि दुःखाचाही डोंगर न करता त्यामधे सुद्धा अडकायच नाही मग ते सुख दुःख कोणाचंही असो आपलं नाहीतर दुसऱ्याचं. जे आहे त्यामधे जगायचं.. जगणं विसरायचं नाही…हीच आयुष्याची सुंदर शिकवण आहे..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


आजच्या धावपळीच्या आधुनिक तंत्रज्ञान युगात हे योग्यच आहे. आणि सुंदर जगण्याचा मंत्र पण.
👌👌👌खूप छान 🙏🙏