Skip to content

“आम्ही आता लहान नाही आहोत, कळतयं आम्हाला सगळं !. “

“आम्ही आता लहान नाही आहोत, कळतयं आम्हाला सगळं !. “


लालचंद कुंवर ,

पुणे.


टिनेजर्स म्हणजे वय वर्षे तेरा ते एकोणीस . वादळी आयुष्याचा काळ. या काळातुन जातांना प्रत्येकानेच कमी अधिक चटके सोसलेले असतातच. हो , खरचं ! हे दिवस म्हणजे वादळी आयुष्यच ! जगण्यात एक प्रकारचा बिंधास्तपणा .

“आम्ही आता लहान नाही आहोत, कळतयं आम्हाला सगळं !. ”

हे क्षणोक्षणी आपल्या वागण्याबोलण्यातुन दाखवून देण्याची वृत्ती! थोडं जरी मनाविरुद्ध काही घडलं कि लगेच बंड करुन दंड थोपटतच मैदानातच उतारायच आणि दोन हात करायचे समोर येणाऱ्या प्रत्येकाशीच परिणामाची तमा न बाळगता.

नुकतच कुठं बालपणाचा उंबरठा ओलांडून काय चांगलं काय वाईट या जाणीवेचं पलीकडचं माप लाथाडून एक सळसळत चैतन्ययुक्त तारुण्यात थाटातच पदार्पण होत असतं !

निसर्गाने जणू काही आकाशाला गवसणी घालण्याची उर्मीच बाहाल केली असते या वयातील लेकरांना. त्यातच त्याबरोबर शारीरिक बदल ही घडत असतात याच वयात. मस्तपैकी आरशा समोर तासंतास उभं राहाव आणि स्वतः लाच न्याहळत स्वमग्नतेतच रममाण व्हावं, एखाद्या ऋतिक रोशन ची किंवा करिना कपूर यांची छबीच जणू काही या जाणीवेने च अंगावर शहारे आणि रोमांच यावेत! असे हे दिवस.

दुसरी कडे आयुष्याला पैलू पाडुन चांगलं जीवनरुपी दागिना घडवण्याचेही हेच दिवस असतात! त्यात लाईफ चेंजिंग दहावी आणि बारावीची वर्षे ही याचं वादळी अवस्थेत येत असतात . खरचं ! किती स्थित्यंतरातुन या वयातली लेकरं जात असतात ना ! म्हणून तर या वयोगटातील लेकरं मुकपणे तर कधी कधी आक्रोश करुन सांगत नसतील ना ?

” बाबा , जरा आम्हालाही समजून घ्या ना “. सारखच हे करु नका, ते करु नका, ठिक आहे हो , मग काय करु ते तरी एकदा सांगा ना ! सारखे छळतात हो , तुमचे उपदेशांचे डोस ! आईपण मलाच सतत बोलत राहाते हो.

बघा ना!माझ्या मनातलं द्वंद्व, घालमेल ! माझे मित्रं , मैत्रिणी किती सहजपणे समजून घेतात मला , अन एक तुम्ही ! मग तुम्ही का नाही समजून घेत मला ? अस असतं काहीस बंडखोर काहीस भावनिक , अस हे आव्हानांनी भरलेलं आयुष्य या टिन एज मधील लेकरांच.

आणखी या वयातली गंमत म्हणजे , हो गंमतच ! ‘ हे सजना, सवरना बिन साजन के बेकार है ! ‘

या गाण्याप्रमाणेच या वयात कोणीतरी स्वप्नातला राजकुमार किंवा राजकुमारी प्रत्यक्षात डोकावतोच. कधी त्याचं दिसणं भाळतं , तर कधी बोलणं . आणि मग एक वेगळचं विश्व , एक वेगळीच दुनियादारी सुरु होते. एक वलायंकित विश्वच जणू काही .

बस्स ! हाच माझा स्वप्नातला जानू किंवा राणी ! खरं तर , याच्यात अनैसर्गिक अस काहीच नसतं . म्हणतात ना ! सोळा वरीस बाई धोक्याच !
खरं तर ते धोक्याच नसून मोक्याच असतं पण तो मोका कशात आहे ? याचं थोड योग्य मार्गदर्शन घेण्याची गरज असते, या वयात .

या वादळी आयुष्यातली हि देणगीच म्हणा ‘भिन्न लिंगी आकर्षण !’ हळूहळू याच आकर्षणातून ओढ. मग या ओढीतुनच निर्माण होते ‘साथ जियेंगे , साथ मरेंगे ‘ , हि प्रेम भावना ! आणि शेवटी झालं एकदाच कसतरी प्रेम . हो प्रेमच ! अपरिपक्व अणि आंधळ प्रेम !

अणि याच वयात झालेलं प्रेम त्यांच्या आयुष्याची माती करुन टाकतं. तर कधी कधी आयुष्य उध्वस्त करायला ही कारणीभूत ठरतं . अढीनिढी वयातलं आकर्षणातुन निर्माण झालेलं हे प्रेम कि ज्यात किती सारासार विवेक असतो ? मुळात नसतोच !

ज्या खांद्यावर विश्वासाने डोकं टेकवतो, तो खांदा खरच , त्या योग्यतेचा आहे की नाही ? याचा सद्सद्विवेकबुध्दीने विचार करण्याची परिपक्वता अंगी असते ! मुळात नसतेच !

“अहो बाबा , का आमच्यावर अन आमच्या प्रेमावरच विश्वास नाही का ? का अजूनही मला तुम्ही कुकुल्लबाळच समजता का हो ?”

लेकरांनो , तुमच्या भावना रास्त आहेत पण हि वेळ आणि हे आत्ताचं वय मात्र नक्कीच चुकलेलं आहे. हे दिवस म्हणजे , काळोख्या रात्री ला भेदुन आयुष्यातली सुवर्ण पहाट आपल्या दैदिप्यमान कर्तृत्वाने एक रम्य सकाळ उजाळण्याचे दिवस. फक्त जेव्हा जेव्हा गरज वाटेल , आणि दोलणामय स्थिती निर्माण होते , त्याचवेळेस समोरचा रस्ताही धुसर आणि मन रुपी आकाशात काळेकुट्ट ढगांची नुसतीच गर्दी होत असेल !
मार्गच भरकटत असेल ! काय करावं आणि काय करु नये …. ! अस माझाच माझ्या मनाशी वाद !

त्या वेळी फक्त आणि फक्त योग्य मार्गदर्शन करणाऱ्या विश्वासू व्यक्ती जवळ विश्वासाने खांदयावर डोकं टेकवावं आणि बिनधास्तपणे मोकळं व्हावं आणि मनातलं मळभ दुर कराव. सारासार विचार आणि योग्य दिशा घ्यावी.

का ? तर,

एक चांगल्या वाईट अनुभवांनी भरलेली आयुष्याची शिदोरी त्यांच्या जवळ असते. तिन्ही ऋतुंनी चांगलच आयुष्य होरपळून काढलेलं असतं . ग्रीष्माचे चटके काय असतात ! याची जाणीव असते. आणि विजाच्या लखलखाटांनी आयुष्य चांगल तावुन सलाखुन निघालेलं असतं,
त्यावेळेस त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे एक एक दीपस्तंभच असतो तुमच्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी.

बाळा, अशा प्रसंगातून तुम्हाला योग्य दिशा देण्यासाठी निसर्गाने पाठवलेला दुतच असतात ते. फक्त त्यांचं अनुभवाचे बोल समजून घ्यावे
मग त्या वेळी भावनेला बुध्दीच्या कसोटीवर घासून डोळस आणि चिकित्सकपणे पाहायचं , तुम्हालाच तुमच्या मनातील पाण्याचा तळ स्वच्छ दिसेल.

मग जो जानु तुमचा जीव कि प्राण असतो , कि ज्याची फक्त चांगलीच बाजू तुमच्या समोर आलेली असते आणि जेव्हा त्याच्या आयुष्यातले एक एक पैलू कि जे तुम्ही डोळसपणे पाहीलेलेच नसतात , ते सर्व उलगडत जातात एक एक करुन,

तेव्हा लक्षात येत , अरे बापरे ! , फक्त भुरळ पाडण्यापलीकडे , या जानु कडे प्रत्यक्षात तर काहीच नाही., ना आचार ना विचार !

लेकरांनो, जेव्हा या वादळी अवस्थेतुन व्यवस्थित शिक्षण पुर्ण करून एक विचार आचाराने प्रगल्भ व्यक्ती म्हणून ज्यावेळी तुम्ही या बाह्य जगात प्रवेश कराल, तेव्हा ‘ हमारी ही मुठ्ठीमे आकाश सारा, जबभी खुलेगी चमकेगा तारा,” हा विश्वास तुमच्या मनात असेल, तेव्हा बापाला ही आपल्या लेकीच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल.

आणि अशा वेळी, बाळा, एक सुसंस्कारी, निर्व्यसनी आणि स्वकर्तुत्वाने स्वतः च्या पायावर भक्कमपणे उभा असेलेला खराखुरा राजकुमार , तुझी वाट पाहात असेल , त्यावेळेस हा बाप सदैव तुझ्या पाठीशी उभा असेल…… !

समाप्त.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

👇👇

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!