रोज उगवायचा निश्चय करा, मग निसर्गही मार्ग काढून देईल !
मेराज बागवान
आयुष्य हे रंगीबेरंगी असते.वेगवेगळ्या रंगांनी आयुष्य जणू आपल्याला रोज एक नवीन धडा शिकवत असते. कधी हे रंग भरभरून सुख घेऊन येतात , तर कधी दुःखांचे डोंगर उभे करतात. पण या सगळ्यात एका गोष्टीने खूप मोठा फरक पडू शकतो. आणि ती गोष्ट म्हणजे ‘दृष्टिकोन’.
आयुष्यात अनेक आव्हानात्मक प्रसंग येतात. जसे की जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, नातेसंबंध संपणे, कलह, नोकरी अचानक गमावणे , व्यावसायिक नुकसान , मोठे आजारपण इत्यादी. काही जण या समस्यांमधून लवकर बाहेर पडतात तर काही जण त्याच गुरफटून जगत असतात. काहींच्या आयुष्यात काही समस्या नित्याचाच झालेल्या असतात , एक समस्या संपली की दुसरी समस्या असे चक्र कायम चालू असते.
पण हीच ती वेळ असते रोज नव्याने उगवण्याची आणि पुन्हा उंच झेप घेण्याची.आणि ही धमक असेल तर निसर्ग, नियती , संपूर्ण विश्व आपल्याला यातून बाहेर काढण्यासाठी मदत करीत असतो.
अनेक उदाहरणे आहेत छोटी छोटी जी आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकवतात. आयुष्य कसे जगायचे हे सांगून जातात. जसे की , काही मुलांच्यावर अत्यंत कमी वयात संपूर्ण घराची जबाबदारी येऊन पडते, त्यातच उत्पन्नाचे भक्कम असे पाठबळ नसते. काही वेळेस शिक्षण सोडावे लागते. तर कधी शिक्षण घेत घेत, अर्थार्जन करून घर चालवावे लागते.
अशातच मग कोणी घरातील व्यक्ती अंथरुणाला खिळून असेल तर , मानसिकरित्या खूप जास्त कणखर बनावे लागते. परिस्थितीच सर्व काही त्या व्यक्तीला शिकविते, पण या मध्ये सर्वात महत्वाचा ठरतो तो आत्मविश्वास, रोज नव्याने उगवण्याचा आत्मविश्वास. आणि अशीच माणसे, ‘कम्फर्ट झोन’ सोडून आव्हानात्मक आयुष्य जगत असतात आणि आपली आयुष्ये घडवीत असतात , इतरांसाठी एक आदर्श उदाहरण ठरत असतात.
जगात अशा अनेक प्रसिध्द व्यक्ती आहेत ज्यांनी असेच आपले आयुष्य शून्यातून घडविले आहे आणि आज जगापुढे एक आदर्श उभा केला आहे. पण अशी माणसे हे सर्व करू शकतात कारण ती रोज नव्याने उगविण्याचा निश्चय करीत असतात.
आजच्या विद्यार्थ्यांपुढे देखील अनेक आव्हाने आहेत. शिक्षणाचे स्वरूप आता ऑनलाइन झाले आहे.यामध्ये देखील अनेक अडचणी आहेत. काही तांत्रिक अडचणी , तर काही वेळेस आकलनात अडचणी. याचा परिणाम अभ्यासावर आणि पर्यायाने संपूर्ण करिअर वर होऊ शकतो. हीच वेळ असते विद्यार्थ्यांसाठी जोमाने प्रयत्न आणि कष्ट करण्याची. प्रयत्न प्रामाणिक असतील तर उशीरा का होईना त्याचे फळ हे मिळतेच.
काहींना अभ्यासात, ,परीक्षेत वारंवार अपयश येते, अभ्यासात मन लागत नाही आणि मग नैराश्य येते. अशा वेळी विद्यार्थ्यांनी सकारात्मक राहणे अत्यंत गरजेचे असते. ध्येय ठरविणे खूप महत्वाचे असते. वेळेचे योग्य नियोजन, सकारात्मक विचार आणि जिद्द ह्या गोष्टी असतील तर रोजचा येणार प्रत्येक नवीन दिवस फक्त तुमचाच असेल.
गृहिणी,नोकरदार, व्यावसायिक हे देखील क्षणोक्षणी आयुष्यातील समस्यांना सामोरे जात असतात. दिवसांगणिक ताण हा वाढत चाललेला असतो. नोकरीच्या अनियमित वेळा, टारगेटस्, नोकरीची अनिश्चितता , अपयश, व्यवसायात मंदी, तोटा आदी गोष्टी सहन कराव्या लागतात.गृहिणींच्या देखील अनेक समस्या असतात.
एकटेपणा, नैराश्य , दुर्लक्षित राहणे याचा त्या रोज मुकाबला करीत असतात. इथे देखील एक नवा विचार जर प्रत्येकाने ठेवला तर आयुष्य बदलू शकते.कितीही संकटे आली मग ती आर्थिक, सामाजीक, मानसिक कोणतीही असोत , जर त्यातून मार्ग काढत आयुष्य जगण्याची इचछा असेल तर सर्व काही शक्य होते.
आज शारीरिक व्याधी ह्या सर्रास झाल्या आहेत. प्रत्येक घरात आज , रक्तदाब, मधुमेह असे आजार असलेली एक तरी व्यक्ती ही असतेच. पण ह्या सगळ्या आजारांचे मूळ हे मानसिकतेत च असते. मानसिक आरोग्य जपले गेले नाही की मग अशी शारीरिक दुखणी अंग बाहेर काढतात आणि संपूर्ण आयुष्याचा कब्जाच जणू घेतात. यातून मग स्वतःला कसे बाहेर काढायचे? कारण पुन्हा उठून उभे राहणे खूप गरजेचे असते.
मृत्यू हा अटळ आहे. पण जेवढे आयुष्य मिळाले आहे ते आपण कसे जगतो याला खूप महत्व असते. जेव्हा मानसिक समस्या मागे लागतात, तेव्हा स्वतःला शोधण्याची वेळ येते. मानसिक समस्या म्हणाल तर त्यामध्ये, झोप न लागणे, अस्वस्थता,रडू येणे, अबोल राहणे, डोकेदुखी, विचार करण्याची क्षमता नसणे, निर्णय पटकन घेता न येणे , वैचारिक गुंतागुंत,गडबडणे, स्मरणशक्ती कमी होणे इत्यादी.
अशा सर्व नकारात्मक गोष्टी जेव्हा आयुष्यात येतात, तेव्हा जर परिस्थिती आपण बदलू शकत नसू, किंवा परिस्थिती आपल्या हातात नसेल तर आहे त्याचा स्वीकार करून , विचार बदलून स्वतःमध्ये बदल केले गेले पाहिजे. स्वतःचा आत्मविश्वास पुन्हा जागृत केला पाहिजे.’मी हे करू शकतो/ शकते’,’हे ही दिवस संपतील’,’तरी बरं…’ असे काही शब्द जरी वापरले गेले तरी हळूहळू आयुष्यात बदल घडू लागतात.
बदल स्वीकारणे हे खूप गरजेचे असते आणि हाच बदल स्वीकारला गेला नाही की वरील मानसिक समस्या आपले आयुष्य व्यापून टाकतात. मग आपण आपले विचार बदलले, दृष्टिकोन बदलला की परीस्थिती देखील बदलायला लागते आणि आयुष्य मार्गी लागू लागते.
माणूस हा आशेवर जगणारा प्राणी आहे.पण कधी कधी ह्या आशा, अपेक्षांमध्ये बदलतात आणि मग आपण दुःखाला आपलेसे करतो. अपेक्षा असाव्यात, पण त्या स्वतःकडूनच. जेव्हा जेव्हा आपण आपल्या जिवलग व्यक्तींकडून अपेक्षा ठेवू लागतो तेव्हा तेव्हा आपण स्वतःलाच त्रास करून घेतो. म्हणूनच रोज स्वतः काही तरी नवीन शिकले पाहिजे, मग तो नवीन दृष्टिकोन देखील असू शकतो किंवा एखादा छंद जोपासणे देखील असू शकते. रोज नवनवीन गोष्टी अंगी बनण्याचा निश्चय केला तर सबंध सृष्टी देखील तुम्हाला मदत करू लागते.
आयुष्यातील आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘प्रेम’. सगळीकडे प्रेम पसरवता आले पाहिजे. आणि यासाठी सर्व प्रथम स्वतःवर प्रेम करता आले पाहिजे. जर स्वतःच्या प्रेमात आपण पडू शकत असू तर आणि तरच आपण इतरांवर जीवापाड आणि निरपेक्ष प्रेम करू शकतो. ‘माझ्यावर कोणीच प्रेम करीत नाही’ , ‘कोणाला माझी चिंता, काळजी नाही’ असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा खरे तर आपण स्वतःलाच कमी लेखत असतो.
आणि असे म्हणणे हे सदृढ मानसिकतेच्या विरुध्द असते. म्हणून , ‘माझे माझ्यावर खूप प्रेम आहे’,’मी खूप सुंदर आहे’ असे आपण जर स्वतःला म्हणू शकत असू तर खरेच एक ना एक दिवस निसर्ग देखील आपल्या प्रेमात पडू लागतो आणि मग सगळीकडे प्रसन्नता, शांतता याचा अनुभव आपण घेऊ शकतो.
‘संवाद’ हा आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. अनेक समस्या आपण स्वतःहून ओढवून घेतो तेही सुसंवाद नसल्यामुळे. त्यामुळे आपल्या माणसांशी संवाद हा असलाच पाहिजे. स्वतःशी देखील स्वतःचा संवाद असला पाहिजे. ‘मी कोण आहे? माझे आयुष्यात काय ध्येय आहे? मला आयुष्यात काय करायचे आहे’? ह्या सगळ्याची प्रत्येकाला जाणीव असणे फार गरजेचे आहे. व्यक्त होता आले पाहिजे.
प्रत्येकाला स्वतःचे विचार मांडता आले पाहिजेत, भले मग ते विचार समोरच्यापेक्षा वेगळे असोत किंवा नसोत. आपण बोलते झालेच पाहिजे. ठामपणे निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकात असावी. न घाबरता, आत्मविश्वासाने मत व्यक्त करता आले पाहिजे आणि या बरोबरच ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या जाणून घेण्याची, शिकण्याची इचछा देखील हवी. ह्या सर्व गोष्टी आयुष्यात पुढे मार्गक्रमण करण्यासाठी खूप उपयोगी पडतात.
आपण स्वतःच जर आपल्या आयुष्याविषयी ‘फोकस्ड’ नसू तर इतरांकडून अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे? आयुष्यात अशा सर्व अनेक समस्या आहेत, ज्याला आपण स्वतःच प्रथम जबाबदार असतो. पण फक्त विचारसरणीत बदल केला, रोज नव्याने उठून समस्यांवर, अडचणींवर मात करण्याची तयारी दाखवली आणि तशीच कृती केली तर आसमंत तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून फक्त नशिबावर अवलंबून न राहता, स्वतः प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन पुढे जाता आले पाहिजे. स्वतः प्रयत्न करायला शिकले पाहिजे. आणि जर का असा दृष्टिकोन असेल तर निसर्ग हवी तेव्हढी मदत तुम्हाला मदत करू लागेल.
या सगळ्यात फक्त हवी जिद्द, चिकाटी, संयम ,भावनिक समतोल, वास्तवाचे भान आणि सकारात्मक दृष्टिकोन!!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


सुप्रभात, अतिशय उपयुक्त आहे, जीवन नौका पार कशी करावी याचे उत्तर आहे, रोज उगवता येतेच, हे लक्षात आले, आणि जीवन जगण्याचा मार्ग सापडला, ” कामा पुरते मामा” खूपच आले पण सगळे विसरून गेले आहेत, कोणत्याही परिस्थितीत लहानाचे मोठे करून, अनेक हाल अपेष्टा सोसून मुलाला मोठे केले, आवडत्या मुलीशी लग्न केले, फ्लॅट घेऊन दिला, नातवंडे झाली, त्यांचे वाढदिवस साजरे केले, गाड्या घेऊन दिल्या, सुनेला मुलीचा दर्जा दिला, आणि मुलगा सून हे सगळं विसरून गेले,आईवडील काही कामाचे नाहीत, फक्त एकच अपेक्षा केली की आमच्याकडे या, काही देऊ नका, नातवंडाना घेऊन या , ही अपेक्षा, आमच्याशी बोला ही अपेक्षा, आम्हाला विचारा ही अपेक्षा, आणि ती पूर्ण झाली नाही म्हणून एकदा शिवी दिली गेली, तिचा फार वाईट परिणाम होतो , वरील सर्व गोष्टी लक्षात न घेता रोज उगवता आले की छान जगता येईल हे लक्षात आले, धन्यवाद ,👌👌👌💐
Super message through this page , I like very much . Very inspirable .