इथून पुढे लग्ने यशस्वी होण्यासाठी मुला-मुलींनी काय काळजी घ्यावी??
सौ. मिनल वरपे
लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही.. सहज खेळ खेळला … मन भरलं , कंटाळा आला आणि खेळ मोडला… किती सहज इतक महत्त्वाच निर्णय घेऊन मोकळे होतात. दोघं एकमेकांना आवडले , काही दिवस बोलले, तो तिला रोज भेटायचा, दोघं छान फिरायचे, एकत्र गप्पा , सतत फोन आणि मग वाटल यालाच तर प्रेम म्हणतात आणि आता मी किती ठरवलं तरी तिच्या/ त्याच्या शिवाय जगू शकणार नाही एक क्षण सुद्धा नाही राहू शकणार… आणि याच काही दिवसाच्या ओळखीवर आयुष्यभरासाठी अत्यंत महत्वाचा म्हणजेच लग्नाचा निर्णय दोघे घेतात.
घरचे म्हणतात काही वेळ घ्या.. काहीवेळेस माहिती असेल तर विरोध करतात कारण त्यांना आलेल्या अनुभवातून आपल्याला ते शिकवत असतात. पण आपण मात्र इतके हट्टाला पेटलेलो असतो की कोणी काही बोललं म्हणजे हा माझं वाईट बघतोय, कोणाचं काही ऐकण्याच्या मनःस्थितीत आपण अजिबात राहत नाही.
लग्न करून मोकळे तर होतो पण नंतर जबाबदाऱ्या आल्या की एकमेकांचे स्वभाव कळतात. नात सांभाळणे, ते टिकवण हे आपल्याच हातात असते पण दोन्हीकडून सारखा प्रतिसाद हवा. पण घाईगडबडीत पूर्ण ओळख न करून घेता केलेल्या या लग्नात काही दिवसातच एकेमकांची मते पटत नाहीत, स्वभाव जुळत नाहीत, जबाबदाऱ्या आल्या की पळ काढला जातो,
एकमेकांचा एकमेकांच्या वागण्याचा लवकरच कंटाळा येतो आणि लग्न कायमच तोडण्याची सुद्धा तेवढीच घाई करून आयुष्यातला हा निर्णय सुद्धा तितकाच सहज घेतला जातो. ना त्यामधे वर्तमानाचा विचार असतो ना भविष्याची काळजी.
इथून पुढे लग्ने यशस्वी होण्यासाठी मुला-मुलींनी काय काळजी घ्यावी??
पूर्ण ओळख
एक मित्र म्हणून कोणीही आपल्याशी चांगलच वागतो पण आयुष्याचा जोडीदार म्हटलं की काही ठिकाणी आपली मते सारखी नसू शकतात. आणि मग त्या ठिकाणी वाद होऊ शकतात म्हणून लग्न करण्याआधी ती व्यक्ती जोडीदार म्हणून कशी असेल, तिचा स्वभाव, तीच वागणं कस आहे एक जोडीदार म्हणून यासाठी एकमेकांची चांगली ओळख करून घ्यायला हवी.
प्रेम की आकर्षण
आपल्याला एखाद्याची सवय असणे आणि प्रेम असणे यात फरक आहे. एखाद वेळेस आकर्षण जरी असेल तरी रोज त्या व्यक्तीला भेटून तिच्याशी बोलून आपल्याला तिची सवय झालेली असते आणि मग ती व्यक्ती काही दिवस आपल्याशी बोलली नाही भेटली नाही तर आपलं कस होणार ही आपल्या मनात भिती असते. खर तर प्रेम करणे आणि आकर्षण यात खूप मोठा फरक आहे..
कधी कधी आपण आकर्षणाला प्रेम समजून पुढचे निर्णय घेतो पण जिथे प्रेमच नाही तिथे एकमेकांचा आदर, काळजी ही जास्त काळ नसतेच. आणि जिथे आपल्याला काळजी करणार माणूस नसेल, नात्याचा आदर ठेवला जात नसेल तर ते नात किती काळ टिकणार..म्हणून आपण करतोय ते नक्की प्रेम आहे की आकर्षण हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे.
जबाबदाऱ्या
प्रेमात असताना , लग्नापूर्वी आपलं काम आपल शिक्षण, मित्र मैत्रिणी, बाहेर फिरायच, पार्ट्या, मज्जा मस्ती हे आपल आयुष्य असते.. संसाराची जबाबदारी काय असते हे माहीत नसते. त्यावेळी मी चांगली नोकरी करणार चांगलं कमावणार आणि सुखी संसार करू एवढीच जबाबदारी आहे अस आपण समजतो पण नंतर प्रत्यक्ष मात्र नोकरी सांभाळून घरात काय हव काय नको याकडे लक्ष देणे, येणारी बिल भरता भरता काहीवेळेस आपण वैतागून जातो..
कुटुंब काय असते, घर कस सांभाळायचं, घरातील काम सांभाळून नाती कशी जपायची या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला नंतर कळतात.आणि यातून पळ काढणारे सुद्धा असतात. जबाबदाऱ्या झेपता नाही आल्या की एकमेकांचे हेवेदावे करत वाद होत राहतात.. म्हणून माझा होणारा जोडीदार जबाबदाऱ्या सांभाळू शकतो का हे पडताळून बघायचं.
एकमेकांची साथ
लग्न करताना प्रेमात असताना आपण एकमेकांना फार जीवन मरणाची वचन देतो .. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार तुझ्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा असेल वैगेरे.. मात्र लग्नानंतर येणाऱ्या समस्या, अडचणी ,कधी एकमेकांची प्रगती तर कधी आर्थिक प्रश्न असतील त्यावेळी मात्र साथ देण्याबदली साथ सोडून माघार घेतली जाते. सुखात एकत्र आणि दुःख आल की तुझीच चूक तुझच वागणं अस जोडीदाराला दोष देत काढता पाय घेतला जातो.म्हणून आपला जोडीदार आपल्याला कोणत्याही वेळेला साथ देईल ना याची खात्री करून घ्यावी.
विश्वास
हा प्रत्येक नात्यात गरजेचा असतो विश्वास असेल तर ते नात फुलत..कितीही कठीण काळ आला तरी एकमेकांवर विश्वास ठेऊन पुढे सरकता यायला हवं. एकदा का हा विश्वास संपुष्टात आला तर रे नातं हे नातं उरत नाही.
अशापद्धतीने या गोष्टी बाजूला सारून कोणालाही नातं टिकवता येणे खूप कठीण आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

