सून आल्यानंतर घरातलं वातावरण खरंच बिघडतं का??
सौ. मिनल वरपे
बऱ्याच लोकांकडून आपण सहज ऐकतो की आधी मस्त वातावरण होत यांच्या घरात .. आई वडील एक मुलगा आणि मुलगी.. आई तर घरातच असायची गृहिणी म्हणतात ना तेच, आणि वडील नुकतेच रिटायर्ड झाले म्हणजे दोघंही घरातच.. बहिणीच शिक्षण चालू होत आणि मोठा मुलगा चांगल्या पदावर नोकरी करणारा.. घरातलं वातावरण अगदी हसतखेळत अगदी नांदा सौख्यभरे… थोडीफार लहान सहान तू तू मैं मैं व्हायची पण ती तेवढ्यापुरती नंतर पुन्हा मस्त मजेत सगळे राहायचे. पण मुलांचं लग्न झालं आणि सगळं वातावरण बिघडलं…
खरचं अस असते का…??? लोक म्हणतात आपण ऐकतो आणि विश्वास ठेवतो आणि मग त्या गोष्टीबद्दल आपल्या मनात कायम नकारार्थी विचार जागा करून घेतात.. पण कोणाला काय माहित नक्की यात चुकीचं कोण वागते, दोष कोणाचा असतो,.. म्हणून कायम दोन्ही बाजू जाणून घेतल्या की बर…
जेव्हा नविन सून घरात येते त्यावेळी ती काही वागते बोलते हे महत्त्वाचे असतेच पण त्याबरोबरच घरात तिला कस वागवत आहेत हे सुद्धा तेवढच महत्वाच आहेना..??
पण आपण फक्त एकतर्फी बोलणं ऐकत, वागणं बघतो आणि गरज नसताना मनात नको ते विचार पक्के करून चुकीचे पूर्वग्रह करून इतरांना सुद्धा त्याच गोष्टी सांगून मोकळे होतो.
माहेर सोडून सासरी येणे यात फक्त घर आणि माणसचं बदलतात अस नाही तर त्यासोबतच तिला तिच्या सवयींमध्ये बदल करावा लागतो, जबाबदाऱ्या येतात, घरातलं वातावरण बदलते, कोणाच्या आवडीनिवडी माहीत नसतात, स्वभाव माहीत नसतात म्हणून कोणाशी काय बोलावं काय नाही बोलावं हे सुचत नाही.
मग अशावेळी तिला नविन घरात नविन माणसांमध्ये मिळूनजुळून घ्यायला वेळ लागतो. कधी कोणाच्या चुकून कोणाच्या मनासारखं नाही वागली की खटके उडतात पण तिथे ती समजून सुद्धा घ्यायचं प्रयत्न करत असेल पण कोणी समजून घेणार सुद्धा हवं असतेंना जर ती वेळ सांभाळणार कोणी नसेल तर वाद वाढत जातात आणि तीची चूक नसताना सुद्धा तिला दोष दिला जातो.
आणि काहीवेळेस नविन माणसांमध्ये अड्जस्ट व्हायला जमत नाही काही मुलींना.. त्यांना माहेरी असलेला हट्टी स्वभाव, झालेले लाड हे सगळं सोडून आपण सासरी आलो आहोत याचं भान नसते.आणि तोच हट्टीपणा ती जर सासरी करेल.. तेच लाड जर सासरी अपेक्षित करेल तर वातावरण बिघडणारच. प्रत्येक मुलीला माहेरी जे वातावरण लाभतं अगदी तसंच वातावरण सासरी सुद्धा अपेक्षित असतं.
काहीवेळेस आलेल्या सुनेला नविन घरात रमायला सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागायला वेळ लागतो आणि या सगळ्यात तिच्याकडून चूक झाली तर तिला दोष लागतो. तर काहीवेळेस नविन व्यक्ती आपल्या घरात आलीय पण आपल्या कुटुंबाची त्याच माणसांची आपल्याला सवय आहे त्यांच्या आवडीनिवडी माहीत आहेत पण नविन आलेल्या सदस्याला त्या कुटुंबात सामावून घेताना काही व्यक्तींना जमत नाही.आणि तिथे त्यांची चूक असते ते तिला सांभाळून घेत नाही.
म्हणजे बघा दोन्हीकडून चुका होऊ शकतात.. एकतर तीच वागणं चुकीचं असू शकते किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीचं… टाळी कधी एका हाताने वाजत नाही. कधी ती स्वतःला त्या कुटुंबाला आपलं मानत नसल्यामुळे अडचणी येत असतील तर कधी तिला कुटुंबाचं सदस्य म्हणून मानलं जात नसेल तर तिथे अडचणी येऊ शकतात.
हे प्रत्येकाच्या स्वभावावर, वागण्या बोलण्यावर अवलंबून असते… सून आल्यानंतर घरातलं वातावरण बिघडतेच असे नाही.. घरातलं वातावरण हसतखेळत ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी समजली तर नक्कीच ते वातावरण उत्तम राहिल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

