Skip to content

आनंदाला दुःखाची किनार असली तरी त्या दुःखातही आनंद घेता यायला हवा.

आनंदाला दुःखाची किनार असली तरी त्या दुःखातही आनंद घेता यायला हवा.


सौ. मिनल वरपे


काय दुःख दुःख करत आयुष्य काढायचं… माझं दुखणं, माझं टेन्शन, माझी परिस्थिती. सतत रडत सतत नशीबाला दोष देणं आपण कधी सोडणार…कधीतरी त्या दुःखाला सुद्धा जाणवू न देता हसत जगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच काही प्रसंगानंतर दुःखाची भिती नाही वाटणार.आणि त्या दुःखाचा त्रास सुद्धा नाही होणार.

सगळं एकदम व्यवस्थित चाललं होत. नावाप्रमाणे सतत चेहऱ्यावर हसू आणि समजदार स्वभावाची, सतत आनंदी राहणारी हर्षिता अचानक आलेल्या दुःखामुळे एका क्षणासाठी स्तब्ध झाली जेव्हा तिला तिच्या आजाराबद्दल कळलं.

ती एका चांगल्या कंपनी मधे सिलेक्ट झाली आणि जॉईन होण्याआधीच सर्वांप्रमाने तीचीसुद्धा मेडिकल टेस्ट करण्यात आली.तसा त्या कंपनीचा नियमच होता. पण नंतर जेव्हा तिचे रक्ताचे रिपोर्ट आले तेव्हा तिला कळलं की तिला ब्लड कॅन्सर झाला आहे.

रिपोर्ट बघून तिला त्या क्षणाला दुःख भरून आले ..तोंडातून शब्द निघत नव्हते… तिच्यासमोर तिच्या घरच्यांचं चित्र उभ राहिलं.. तीच भविष्य, मित्र मैत्रिणी, जवळचे सर्वच तिला त्या क्षणाला आठवले.. आता काय होणार याची तिला कल्पना होतीच… पण नंतर तिने स्वतःला त्यामधून सावरण्याचा प्रयत्न केला. तिने जे सत्य आहे त्याचा स्वीकार केला आपण आणि आपल्यामुळे आपल्या जवळचे दुःखी होऊ नयेत कमजोर पडू नयेत म्हणून तिने स्वतःला समजावत सांगितलं…

अग काळजी करू नकोस.. तू जेवढं आयुष्य आजपर्यंत पाहिलंस तेवढं आनंदाने मनसोक्त तू जगलीस पण जगात असेपण आहेत ज्यांना जन्माला येताच डोळे उघडण्याआधीच जग सोडून जावे लागते. काहींना तर माहीत सुद्धा नसते त्यांना किती गंभीर आजार झालाय आणि अचानक त्यांचा मृत्यू येतो, काही मुल जन्माला येताच त्यांची आई त्यांना सोडून जाते कायमची, लग्नानंतर काही वर्ष होत नाही तर तिचा नवरा कायमच तिला आणि तिच्या बाळाला सोडून जातो … आणि हे इतके भयंकर मृत्यू आणि त्यांची परिस्थिती असताना सुद्धा त्यांना त्यातून जावेच लागते तर मी कोण वेगळी आहे का…

माझं भविष्य मला माहित नाही पण आज हातात आलेल्या रिपोर्ट वरून मी माझा वर्तमान बिघडवणारी नाहीये. मी जस आजपर्यंत आनंदाने जगत आलिये अगदी तसच पुढेही जगणार. पुढचं कोणी पाहिलं आहे मग उगाच काळजीने आजचा आनंद का व्यर्थ घालवायचा.

आनंदाला दुःखाची किनार असतेच पण त्या दुःखात सुद्धा आनंद वाटण्यासाठी आपण तशी मनस्थिती ठेवली पाहिजे. माझा आजार जरी भयंकर असला तरी माझ्यातील सकारात्मकता, माझ्यातील बर होण्याची जिद्द, माझा आनंदी राहण्याचा स्वभाव या आजारापुढे हरणार नाही.

असे कितीतरी आजार आहेत ज्यांना मात करून अनेक लोक आजही त्यांचं आयुष्य जगत आहेत मग त्यामधे आपण का नसावं… नक्कीच असावं. मी माझ्या आनंदाला या दुःखाची झळ लागू देणार नाही…

आनंदाला दुःखाची किनार असली तरी त्या दुखातही आनंद घेता यायला हवा याच एक उत्तम उदाहरण म्हणजेच हर्षिता.. तिच्या आनंदी सुखी आयुष्यात तिच्या अजारासारख मोठं दुःख पुढ्यात येऊन सुद्धा फक्त काही क्षणासाठी ती शांत झाली पण नंतर तिने त्या दुःखाची सावली आनंदावर पडू न देता त्यातून आनंदी कस राहायचं हे ठरवलं…

सगळं आपल्याच हातात असते.. आपले विचार आपले निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे असतात. मग आपण असेच विचार करायचे ज्यातून आपल्याला कितीही काहीही घडलं तरी त्यामधे सुद्धा आनंदी कस राहायचं हे जमलं पाहिजे.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आनंदाला दुःखाची किनार असली तरी त्या दुःखातही आनंद घेता यायला हवा.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!