मनाला नवचेतना देणाऱ्या ह्या गोष्टी माहितीयेत का ??
श्री. राकेश वरपे I ९१७५४२९००६
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संस्थापक, आपलं मानसशास्त्र
अंतर्गत मनाचं आपण कितीही व्यवस्थापन केलेलं असलं तरी आपल्या अवतीभवती घडणाऱ्या अशा असंख्य घटना आपल्या मनाचं खच्चीकरण करण्याचं काम करत असतात. त्यावेळी कमावलेलं सय्यम, वेल मॅनेजमेंट, रिलॅक्सेशन हे असलं काहीही कामी येत नाही. किंबहुना त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला संजीवनी देतील हे माहित असतानाही आपल्या मेंदूला मात्र वेगळंच काहीतरी अपेक्षित असतं.
अशा वेळी कोणीतरी आपल्याला समजावून सांगत असेल तर त्याची जास्तच चीड येते. काहींना शांत रहावेसे वाटते तर काहींना कुठेतरी दूर निघून जावेसे वाटते. तर काहींना एखाद्या टार्गेट केलेल्या व्यक्तीवर जोपर्यंत ओरडून व्यक्त होत नाही तोपर्यंत मोकळं वाटत नाही.
मनाची हि अशी अवस्था असते ज्यावेळी त्याचं रिमोट कंट्रोल हे आपल्या हातात राहत नाही. आपल्याला असंही वाटतं कि काही वेळ निघून गेल्यावर मनामध्ये उत्पन्न झालेला लावा शांत होईल, परंतु तो शांत तर दूरच पण जसा जसा वेळ पुढे सरकत जातो त्या लावाची ज्वालामुखी होत जाते.
कित्येकांना असा अनुभव आलेला असेल कि दररोज मेडिटेशन, छंद जोपासून सुद्धा ज्या काही निरर्थक सवयी जडलेल्या असतात त्या मात्र त्या-त्या वेळी डोकं वर काढतातच. त्यावेळी कमावलेली सगळी मानसिक ऊर्जा ही बाहेर विकृत पद्धतीने फेकली जाते. आणि मग आपणच इतक्या दिवसापासून करत आलेल्या मनाच्या व्यवस्थापनावर शंका घ्यायला लागतो.
खरंतर १०० टक्के मनाचं व्यवस्थापन करणं अजिबात शक्य नाही. ज्या व्यक्ती उत्तम मनाचं व्यवस्थापन करत आहेत, ते सुद्धा छातीठोकपणे हे कधीच कबुल करू शकणार नाही. योगगुरु, साधू, संत, महर्षी हे सुद्धा ह्या प्रक्रियेतून गेलेले आहेत. म्हणूनच कि काय, ‘आहे ते स्वीकारून पुढे चालत राहणं, हीच मनाची श्रीमंती’ या वाक्याचा शोध लागला आहे.
एवढंच काय तर मानसशास्त्रातील असंख्य प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, संमोहन तज्ज्ञ, मनोविश्लेषण तज्ज्ञ या साऱ्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये एकेकाळी मानसिक समस्यांनी घेराव घातलेला होता. ज्याला आपण फादर ऑफ सायकॉलॉजि म्हणतो, असे सिग्मन्ड फ्रॉईड सुद्धा एकेकाळी डिप्रेशनने ग्रस्त होते.
फ्रॉईडने तर या मानसिक समस्येत त्यांची कित्येक वर्ष घालवली. त्यांना सिगार ओढण्याचं व्यसन जडलं आणि त्यांना जबड्याचा कँसर झाल्याची नोंद सुद्धा अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन मध्ये आहे.
अर्थात कोणतीही व्यक्ती यातून गेलेलीच आहे, मग ती कितीही मोठी तज्ज्ञ का असेना. परंतु ज्या-ज्या व्यक्तींनी स्वतःच्या मानसिक समस्येतून पुढे निश्चित असा मार्ग काढला त्यांचं आयुष्य उजागर झालं. काहींनी स्वतःचा व्यक्तिगत विकास केला तर काहींनी सामाजिक मानसशास्त्र आणखीन वृद्धिंगत केलं.
आणि हीच आपल्याला खरीखुरी नवचेतना देणारी बाब आहे. जी आपण सांभाळली पाहिजे, जोपासली पाहिजे. ज्या व्यक्ती पाहिलेला संघर्ष डोळ्यासमोर ठेऊन त्याच्या आठवणीत जगले त्यांनी पुन्हा मागे फिरून पाहिले नाही.
संशोधनातून अशा गोष्टी हाती लागल्या कि, कित्येक व्यक्ती जेव्हा समुपदेशन घेण्यासाठी येतात त्यावेळी त्यांची प्रखर मागणी हीच असते कि मला माझा जुना भूतकाळ पूर्ण विसरायचा आहे. आपण आपल्या जवळच्या लोकांकडे जेव्हा काही सल्ला मागायला जातो तेव्हा त्यांनाही आपण हेच म्हणतो कि असा काहीतरी सल्ला दे कि माझ्या आयुष्यातून तो घडलेला भाग काढून फेकता येईल.
शास्त्रीयदृष्ट्या हि बाब अत्यंत अवास्तविक आहे. आजही विचार करून नक्की तुम्ही स्वतःला सांगा कि १०-१५ वर्षांपूर्वी घडलेली एखादी दुर्दैवी घटना तुम्ही विसरलात का ? तर याचे उत्तर नाही असेच येणार. घडलेल्या घटनेचे काही अंश आपण आपल्याबरोबर घेऊन जगत असतो.
आणि शास्त्र असं मानतं कि ते अंशच आपल्याला नवचेतना देण्याचे नैसर्गिक काम करत असतात. ज्या व्यक्ती घडलेला प्रसंग सतत दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असतात अर्थात तो दुर्लक्ष होतंच नाही किंवा त्याबद्दल सतत नकारार्थी विचार करतात, याचाच अर्थ त्यातून उत्पन्न होणाऱ्या प्रेरणेचा ते विध्वंस करतात.
लहानपणापासून सतत संघर्ष पाहिलेली व्यक्ती स्वतःच्या आयुष्याबद्दल का फोकस असते याचंही उत्तर यामध्येच आहे. केवळ त्या संघर्षाला जोड हवी सकारात्मक विचारांची. जर तर मध्ये अडकलात तर नवचेतना आणि तुमचा इथे काहीही संबंध उरणार नाही.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

