Skip to content

मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात.

मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात


सौ. मिनल वरपे


दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल…. हे ऐकताच मनाला नविन आशा मिळते. आपण किती सहज सोडून देतो … मला हे हवं आहे पण ते मिळवण्यासाठी जे कष्ट, जे प्रयत्न आणि ज्या संयमाची गरज आहे ते माझ्याकडे अजिबात नाहीत असं स्वतःला कळत नकळत सांगून आपण हातातलं सोडून पळत्याच्या मागे लागतो.

आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून एक वाक्य नेहमीच ऐकतो ते म्हणजे आम्ही जे दिवस काढलेत ते तुम्ही नाही काढू शकणार आणि आम्ही किती हलाखीचे दिवस काढलेत, एक एक वेळ आम्हाला जेवायला मिळत नव्हतं,. पाणी पिऊन दिवस काढलेत आम्ही, इतकं सगळं सहन करून आम्ही कधी माघार नाही घेतली आणि आज जे तुम्ही सुख बघताय ते आमच्या कष्टातून उभारलेले आहे…

आपल्याला जे चार भिंतीच घर मिळालं आहे ते कसेही का असेना पण ते त्यांच्या कष्टातून कमवलेल आहे. यातून फक्त एकच सांगायचं आहे की जे त्यांनी वाईट दिवस काढलेत ते सहन करताना त्यांच्या मनात जे स्वप्न होत ज्या इच्छा होत्या त्या त्यांच्या पूर्ण झाल्या.

शिक्षण म्हणा नाहीतर नोकरी … सुरवातीला कष्ट घ्यावेच लागतात. जे स्वप्न आपण आपल्या उराशी बाळगतो ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला आजचा दिवस हा जे समोर येईल ते सहन करत, समजून घेत, येणाऱ्या आव्हानांना सामोरे जात, येणारे प्रश्न सोडवत पुढे जावं लागतं.म्हणून तर नंतर चांगल शिक्षण घेतलं, मनासारखी नोकरी मिळाली की त्याचा आनंद आपल्याला गगनात मावेनासा होतो.

संसार मांडणे सुद्धा अगदीच तेव्हढ सोप नसते… नाती जपणे, कोणाला काय हवं काय नको ते बघणं,. नवीन माणसं असली की त्यांच्या समोर वागताना बोलताना विचार करावा लागतो., जॉब करून घर सांभाळणं, मुलांचं शिक्षण, मुलांच्या आवडीनिवडी, घरातले वादविवाद म्हणजेच अगदी जे समोर आलंय त्याचा स्विकार करत मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींना सुद्धा सहन करावे लागते तेव्हाच सुख म्हणजे काय हे कळत आणि त्याचा आनंद घेता येतो.

अस कुठेच आणि कधीच मिळणार नाही की एखाद्याने विनाकष्ट सर्व मिळवलं आहे.. एखाद्याच्या सगळ्याच गोष्टी कायम मनासारख्या होतात.. प्रत्येकाला कष्ट आहेत कारण कष्टाला पर्याय नसतो आणि मनासारखं घडाव अस वाटत असेल तर त्यासाठी मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींचा सुद्धा स्विकार करावा लागतो.

आणि आपल्या मनाविरुद्ध काय असते तर आपल्याला सतत आनंद हवा असतो म्हणून दुःख आले की ते आपल्या मनाविरुद्ध आपल्याला वाटतात,. कोणतीही गोष्ट सहज सोप्या रीतीने आपल्याला मिळावी अस आपल्याला हवं असते आणि जर ती मिळाली नाही त्यासाठी कष्ट असतील तर ते आपल्या मनाविरुद्ध आहे अस आपण समजतो.

आपण जे मागितलं ते मिळालं नाही की लगेच आपल मन नाराज होते, आपल्या शब्दाला आदर मिळाला नाही आपण सांगितलेलं कोणी ऐकलं नाही की आपल्याला त्याचा त्रास होतो…

म्हणजेच काय तर आपल्या मनासारखं झालं तर आपण ते हसत स्विकारतो आणि तेच वेगळं घडलं तर ते आपल्याला सहन होत नाही.

पण यापेक्षा मनासारखे दिवस पाहायचे असतील तर मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात हे आपण लक्षात घेतलं तर नक्कीच आपली सहनशीलता आणि सक्षमता वाढेल.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!