Skip to content

एका पत्नीच्या आपल्या पतीकडून या माफक अपेक्षा असतात !!

एका पत्नीच्या आपल्या पतीकडून या स्वच्छ अपेक्षा असतात !!


लालचंद कुंवर

उरुळीकांचन ( पुणे )


थोडी कणकण व अस्वस्थ वाटू लागल्याने जान्हवीने दोन दिवस ऑफिसला सुट्टी घेतली होती. तीन वर्षांपूर्वीच सुखी संसाराची स्वप्न पाहत श्री च्या आयुष्यात आली. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता, तेवढ्यात मधुसूदन कालेलकरांच एक गीत कानावर पडलं,

“सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला ,

गंधित नाजूक पानामधुनी सूर छेडीते अलगद कोणी
अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सुरातला ,

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला ”

हे गीत ऐकत असताना, जान्हवीचे डोळे भरून आले.
आणि श्री बरोबरचे एक एक दिवस आठवू लागली.

बस्स आता, श्री ! हा भावनेचा कोंडमारा, असाह्य होतोय ! कधीतरी तू मला समजून घेशील, माझ्याही मनाचा ठाव घेशील ! या एकाच आशेवर जगत आलेय मी आज पर्यंत. पण तुला का लक्षात येत नाही की मी यंत्र नाही रे ! मलाही मन आहे , भावना आहेत !

पण ह्या सगळ्याच गोष्टी तुझ्याशी बोलूनच सांगितल्या पाहिजेत का ?

नवरा म्हणून कुटुंबाची जबाबदारी, तू पार पाडत असताना, जशी तुझी तारेवरची कसरत असते , तशीच गृहिणी म्हणून माझी ही क्षणोक्षणी कसोटीच असते. आजपर्यंत बायको म्हणून माझी सगळी कर्तव्य पुर्ण करत आलेय रे !

समजू शकतेस , श्री ! तुही दिवसभर काम करुन दमत असशील , शरीराने, मनाने क्षीणत असशील. टार्गेट ठेवून काम करण्याच्या ताणाने थकवा येत असेल , हे मलाही जाणवतं. हे सर्व पाहून माझ्याही मनाची घालमेल ही होते. पण गृहिणी म्हणून माझाही दिवस पहाटे पाच – सहा वाजेपासूनच सुरु होतो. दिवसभर घरात आणि दारात मी ही राब राब राबत असते. न थकता, हवं नको ते पाहत असते.

विकेंडला तुम्हां पुरुषांना विश्रांती साठी किमान ऑफिस कामाची हक्काची सुट्टी तरी असते रे ! पण आम्हा बायकांसाठी कसला विकेंड अणि कसली सुट्टी !

नाही नाही , मी उपकार वगैरे मुळीच करत नाही तुझ्यावर ! बायको म्हणून माझी ती इती कर्तव्यच आहेत. पण हा संसार माझ्या एकटीचाच आहे का रे ! Housewife अणि Office lady अशी दुहेरी भूमिका निभावताना काय दमछाक होते ! एकदा डोळे उघडून बघ तरी !

हो हो , मान्य आहे मला ! सध्याच्या काळात एकट्या नवऱ्याच्या पगारात सगळ्या गरजा नाही पूर्ण होऊ शकतं . थोडीफार फरफट माझीही होते तरीही तुझ्या खांद्याला खांदा लावून मीही नेटाने तुझ्या बरोबरीने चालत आहे.

ठीक आहे रे ! घराला घरपण हे बाई मुळेच येत पण याचा अर्थ असा होत नाही की घरातली सर्वच काम मी एकटीनेच करावीत का ?
तस नाही, काही कामं तू करतोसही म्हणा पण त्या कामापेक्षा तुझा त्रागाच जास्त असतो.

‘मेल्या आम्हा बायकांचा जन्मच असा! ‘ असं म्हणून मी मुळीच माझीच पाठ थोपटून घेणार नाही कारण आधीच सोशिकतेच लेबल आमच्या कपाळी ! पण कधीतरी माझ्या जागी स्वतःला ठेऊन बघ.

नाही श्री! तस मी तुझ्याशी तुलना अणि बरोबरी नाही करत. शेवटी काहीही केलं तरी तू माणूस आहेस, पण तू हा संसाराचा गाडा जो नेटाने ओडतोय ना, त्याच गाड्याच एक चाक मीही आहेस की रे! हे लक्षात घे. फक्त या गाड्याच कोणतंही एक चाक काळजी न घेतल्याने , निगा न राखल्याने निखळून पडू नये !

श्री, आम्हा बायकांच्या अपेक्षा खुप माफक असतात रे ! मलाही, कधीतरी कामाहून घरी आल्यावर फक्त अधूनमधून , ” आज खुप दमलीस का ग ?” खुप कामाचा ताण होता का ? बस ! एवढीच. कौतुकाची थाप अपेक्षित असते तुझ्याकडून.

” आज खुप छान दिसतेस, लई झक्कास जेवण बनवलंय, कसला, विचार करतेस ग एवढा ! मी आहे ना ! ”

श्री, हे असले शब्द म्हंजे , आम्हा बायकांसाठी नवसंजीवनीच असते रे ! पुन्हा बारा हत्तीच बळ येतं , संसाराचा गाडा हाकण्यासाठी.

श्री, अशा खूप काही बारीसारीक गोष्टी आहेत, ज्या निसटून चालल्यात. गेल्या काही दिवसांपासून मनाने अणि शरीराने ही लांब होत चालली आहे , तूझ्या ह्या रुक्ष वागण्याने अणि गृहीत धरण्याने !

आता खुप उशीर होण्याआधीच आज काहीही झालं तरी मनातली घालमेल श्री शी बोललीच पहीजे! ……….

समाप्त



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “एका पत्नीच्या आपल्या पतीकडून या माफक अपेक्षा असतात !!”

  1. चंद्रशेखर लक्ष्मणराव बरडे

    होय छान लेख आहे पण भाव भावना ह्या केवळ बायकांना च का? काही पुरुष दोन दोन महिने, चार महिने कुटुंबाशी संबंध येत नाही, त्यांची अवस्था तर घरातल्या भाजीच्या भांडी सारखी होतेय, जी बाहेरून खूप तापते, आणि आतून पण खूप घासते. तो मात्र या सुखी संसारा साठी ” दिवा सारखा तेवत राहतो, आणि सारा त्या ताप पणती सारखा मुकाट पने सहन करतो”
    वागण्यात, बोलण्यात, श्रृंगारात, प्रणयात, खूप नाही पण मंद मंद व्यक्त होणे, म्हणजे मोगरा आणि त्याचा वाऱ्याने दिलेला मंद सुवास.
    * मेघराज**

  2. खुप सुंदर आहे लेख…. पण हा पुरुषांपर्यंत पोचायला हवा ना… तो लेख वाचून तरी निदान त्यांना काही जाणीव झाली तर होईल…

  3. छान लेख आहे पण आता पुरुषांना ह्याची जाणीव झाली आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!