अनुशासन (स्वयंशिस्त) जगण्याचा मंत्र व्हावा.
डाॅ. व्यंकट कोलपुके.
व्यवहारात कोणताही निर्णय घेणे सोपे नसते. त्याचे भलेबुरे परिणाम भोगावे लागतात. कोणत्या शाळेत जायचे, कोणता कोर्स निवडायचा, इथपासून ते कोणता धंदा करायचा, कुठे स्थायिक व्हायचे इथपर्यंत, विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. एकत्र कुटुंबात वडिलधार्याचा सल्ला महत्वाचा मानला जायचा.
1कारण व्यवसाय, स्थान व जीवनशैलीत दोन पिढीत फारसा फरक नसायचा. पण आज परिस्थिती बदलली आहे की, दोन पिढ्यामध्ये एकमत तर सोडाच, संवाद होणेही कठिण झाले आहे. जमेची बाजू अशी आहे की आज धंद्याचे विकल्पही भरपूर आहेत. बँकेचे कर्ज घेऊन भांडवल उभे करणे सोपे झाले आहे.
शिवाय प्रशिक्षण, सल्ला व मार्गदर्शन देणारेही मिळतात. कठिण बाजू अशी की, प्रत्येक धंद्यात स्पर्धा व संघर्ष खूप आहे. आपली गुणवत्ता व तत्परता सिध्द करावी लागणार आहे. नवे तंत्र घेऊनच मार्केटमध्ये उतरावे लागणार आहे. या सर्व अडचणीतून आजच्या तरुणाला मार्ग काढायचा आहे, विकास करायचा आहे, यशस्वी व्हायचे आहे.
आज माणूस सुधारला, असे आपण म्हणतो. पण ते पूर्णसत्य नाही. विज्ञान व तंत्रज्ञानाने भौतिक सुख दिले. श्रम, वेळ व अंतर कमी केले. माहीतीचे भंडार हाती दिले. पण मनाच्या विकारावर मात केली, असे म्हणता येणार नाही. नकली वस्तूचा वापर, विश्वासाचा अभाव, जाहिरातीचा प्रभाव, संशयाचे वातावरण, यामुळे जपून वावरावे लागते. नव्या अर्थव्यवस्थेत लायसन्स, कायदे, टॅक्स याची डोकेदुखी बरीच आहे.
मानवी विकासाचे तीन टप्पे (station) आहेत. जिवंत रहाण्यासाठी ज्या मूलभुत गोष्टी लागतात, त्या मिळविणे. अर्थात जगण्याची व्यवस्था करणे, हे पहिले व सर्वात खालचे स्टेशन. श्रीमंत देशातील थोडासा, पण गरीब देशातील बहुसंख्य वर्ग याच स्तरावर आहे. हा survival mode आहे.
मजूर, कामगार, शेतकरी, हमाल इत्यादीचा यात समावेश होतो. याच्या पुढचे स्टेशन आहे बाह्य विकासाचे. अर्थात स्थिर व सुविधापूर्ण स्थितीत जगणे. हा वर्ग development mode मध्ये आहे. सरकारी नोकर, व्यापारी, सेवा पुरविणारे, उद्योजक यात मोडतात. याच्या पुढील स्टेशनवर एक छोटासा वर्ग बुध्दीचा उपयोग करुन नवनिर्मिती करीत असतो. नवीन प्रकारची शेती, वृक्षाचे संगोपण, संगीत व कलेत सृजन, औषधी व वस्तूचे निर्माण यात संशोधन करतो.
हा माणूस तिसर्या स्तरावर जगतो. याला creative mode म्हणतात. हा माणसाचा आंतरिक विकास आहे. सर्वानाच तिसर्या स्टेशनवर जाण्याची संधी आहे. पण कांही पहिल्या स्टेशनवरच थकून जातात, तर कांही दुसर्या स्टेशनवर रेंगाळतात. थोडी माणसे तिसर्या स्टेशनवर जातात. हे आर्थिक स्तरावरचे सामान्य वर्गीकरण आहे. यात अपवाद असू शकतात. साधनाच्या अभावात संशोधन करणारे आहेत. प्रतिकूल परिस्थितीत कलेची साधना करणारे आहेत.
कामाकडे पहाण्याचा माझा दृष्टिकोण असा आहे. कमी देऊन अधिक घेतो तो धंदा. यात वस्तूचा व्यापार होतो. जेवढे घेतो तेवढे देतो, तो व्यवसाय. यात सेवेचा व्यापार आहे. पण कमी घेतो व अधिक देतो, ती सेवा. यात सहानुभूतीचा व्यवहार आहे. धंद्यात लोभ, व्यवसायात निष्ठा व सेवेत सहानुभूती आवश्यक तत्व आहे. धंद्यासाठी भांडवल लागते. व्यवसायात कौशल्य तर सेवेसाठी विनम्रता. याशिवाय इतरही साधने आहेत.
एक आहे शारीरिक शक्ती. योग्य वयात व योग्य वेळी या शक्तीचा उपयोग केला पाहिजे. तरुणपणी श्रम केले नाही, आळसात पडून राहिलात तर म्हातारपणी इच्छा व ज्ञान असूनही ऊर्जा रहात नाही. आजचे आरोग्य उद्या राहील याचा भरवसा नाही. म्हणून काम कोणतेही असो, श्रम टाळणे म्हणजे विकासाला नकार देणे होय.
निसर्गाने सर्वाना सारखाच वेळ दिला आहे. म्हणून वेळ मिळत नाही, ही सबब खोटी आहे. ती केवळ सांत्वना आहे. एक विषय पूर्ण जाणून घेण्यासाठी आयुष्य अपुरे पडते. त्यामुळे एकेक दिवस मोलाचा आहे. वेळ जागरुकता (time consciousness) जेवढी पाश्चिमात्य समाजात आहे, तेवढी भारतीयात दिसत नाही. जितकी शहरी भागात आहे, तितकी ग्रामीण भागात नाही.
एक जग घड्याळाप्रमाणे धावते, तर दुसरे कॅलेंडरप्रमाणे चालते. दुकान, परिवार व मनोरंजनात दिवस संपत असेल तर ती स्थिती चांगली नाही. जसे उत्पन्नाचे लेखापरिक्षण (audit) केले जाते, तसे वेळेचेही करायला हवे. वेळ धनाइतकीच, किंबहुना अधिक मूल्यवान आहे. गेलेले धन परत मिळू शकते, पण वेळ मिळविता येत नाही.
विकासाचे तिसरे साधन कौशल्य आहे. व्यवसायात कौशल्य (skill) असल्याशिवाय खाजगी क्षेत्रात यश मिळत नाही. त्यामुळे त्याना सतत अद्दयावत (update) रहावे लागते. पण सरकारी क्षेत्रात नोकरीची सुरक्षा असल्यामुळे ज्ञान व कौशल्य वाढविणे ( skill development) बंधनकारक रहात नाही. बहुसंख्य कर्मचारी नेमून दिलेले काम कसेतरी करुन दिवस ढकलीत असतात. यात कामाचे नुकसान तर होतेच, पण त्या व्यक्तीचा विकासही थांबतो.
दैनंदिन जगणे एका चाकोरीत बंदिस्त केल्यासारखे असते. अपेक्षेइतके नसले तरी बरे चालले आहे. यात एक feel good ची भावना असते. पाश्चात्य विचारवंत (स्टिफन कोवे) म्हणतो, ” Good is the enemy of best ” उत्तम उत्कृष्टचा शत्रू आहे. स्टिफनला उत्तम मध्ये विश्रांतीचा धोका दिसतो. उत्तम ही उत्कृष्टकडे जाण्याची पायरी व्हावी, भिंत नको, असा तो इषारा देतो.
कोणत्याही कामात सुधारणा करायला वाव नाही, असे होत नाही. उत्कृष्टचा ध्यास सतत असायलाच हवा. तो अनुशासनाने येतो, प्रशासनाने नव्हे. दुकान, परिवार, मनोरंजनाला चौथा आयाम जोडायला हवा. तो म्हणजे शिक्षण. त्यात प्रयोग, प्रशिक्षण, तंत्रज्ञान, नवनिर्माण, छंद, या गोष्टीचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे रोजचे यांत्रिक जगणे आनंदपूर्ण होऊ शकते. आज मनोरंजनात बराच वेळ वाया जातो आहे. कारण ते स्वस्त व सहज उपलब्ध झाले आहे. मनोरंजनाचे जीवनात किती स्थान असावे ? जितके जेवणात चटणी, लोणच्याचे आहे. असले तर ठीक, नसले तरी अडत नाही, बिघडत तर काहीच नाही.
आपली कामाची प्रेरणा काय आहे, हे तपासून पहा. भय किंवा लोभ, नाही का ? धंद्यात नुकसानीचे भय, किंवा नोकरीत मालकाच्या नाराजीचे भय असू शकते. धंद्यात नफ्याचा, यशाचा लोभ असतो. तर नोकरीत प्रमोशनचा, स्तुतीचा असू शकतो. शिक्षेच्या भयामुळे कामाचा उरक वाढतो, गुणवत्ता वाढत नाही. तेच लोभातून केलेल्या कामाचे होऊ शकते. बाहेरचा दबाब, मग तो ढकलणे (push) असो की ओढणे (pull), ते प्रशासनच आहे.
पण अनुशासनाने कामाची गुणवत्ता (quality) वाढते. नावडीच्या कामात एकाग्रता करावी लागते, आवडीच्या कामात आपोआप होते. शिवाय कामाची प्रेरणा आंतरिक असल्याने आनंद होतो, समाधान वाटते. मॅनेजमेंटमध्ये हल्ली Governance will rule, not government हा सिध्दांत प्रिय होऊ लागला आहे. ते उत्तम आहे. कुणीतरी काठी घेऊन मागे लागण्यापेक्षा, ठरविलेल्या नियमाने व पध्दतीने काम चालावे, असे त्यात अपेक्षित आहे.
चौकातील पोलीस हटविले, सिग्नल चालू केले. सुरक्षा गार्ड कमी केले, सीसीटिवी कॅमेरे बसविले. पण तेही प्रशासनच आहे. जीवंत माणसाची जागा यंत्राने घेतली. कामाशी निष्ठा असलेल्या व संवेदनशील माणसाला त्याने फरक पडत नाही. पण बेशिस्त व कामचुकार लोकाना आळा बसू शकतो. तंत्राने कामाची सवय लागू शकेल. कर्तव्यभावना वाढेल का, याबद्दल शंका वाटते.
जबाबदारी हा शब्द उपयोगी असला तरी मूल्यवान नाही. त्यासाठी प्रेम आणि कर्तव्य यातील फरक जाणून घ्यावा लागेल. कर्तव्यपूर्तीतून समाधान वाटते, प्रेमातून आनंद होतो. कर्तव्य किंवा जबाबदारी हे मनावरचे ओझे आहे. पण प्रेम हलके असते. त्याने थकवा येत नाही. जिथे प्रेम नाही, तिथे जबाबदारी उपयुक्त ठरते. जबाबदारीचे तत्व काल व परिस्थितीनुसार बदलते.
तो सामाजिक व नैतिक विषय आहे. पण प्रेम वैयक्तिक घटना आहे. अनुशासन माणसाचा अंतर्नाद आहे. प्रेम परमेश्वराचा प्रसाद आहे. प्रेम अनुशासनाच्याही वरची स्थिती आहे. प्रशासन, अनुशासन व प्रेम या विकासाच्या चढत्या पायर्या आहेत. जो जिथे आहे, तिथून सुरुवात करावी. त्याआधी विषय नीट समजून घ्यावा. अधिकाराचा रोग लागलेल्याना कर्तव्याचे औषध पचत नाही.
प्रशासनाचा दिमाख दाखविणार्याना अनुशासनाची मात्रा रुचत नाही. केल्याने सर्व काही आलबेल होईल, असेही नाही. पण केल्याशिवाय होत नाही, हे मात्र खरे. करणार्याकडे जग आशेने पहाते, आळशाकडून अपेक्षाच नसते. जो नवा विचार मांडतो, तो त्या वैचारिक मोहिमेचे नेतृत्व करतो. जो जबाबदारी घेतो, त्याचा आत्मविश्वास वाढत जातो. जो प्रेम करतो, तो आनंदी राहू शकतो. विज्ञान व तंत्रज्ञानाने व्यवस्थेचा विकास होतो, माणसाचा नव्हे. जेंव्हा प्रशासन किमान दायित्व असेल व अनुशासन प्रगतीचे तत्व होईल, तेंव्हाच माणसाचा विकास झाला, असे म्हणता येईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

