नको तिथे मन गुंतवले कि गुंता वाढतो….
मेराज बागवान
मानसशास्त्र आयुष्याचा आज एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. पूर्वी हा फक्त महाविद्यालयांमध्ये शिकविला जाणारा एक विषय होता. पण आज याच विषयाने सर्वांची आयुष्येच बदलली आहेत. हे एक शास्त्र आहे आणि सबंध आयुष्यच आज मानसशास्त्राने व्यापलेले आहे. याची अनेक कारणे आहेत. पण सध्याच्या परिस्थितिचा विचार केला तर , ‘कोरोना’ काळात हा विषय खूप महत्त्वाची भूमिका बजावतो आहे.
या संकटामुळे सर्वांचीच आयुष्ये एका नवीन वळणावरती आली आहेत. रोज नवनवीन वळणे आयुष्य घेत आहे. जीवनमान बदलत चालले आहे. परिस्थिती स्थिर नाही. हे संकट , अनेक आव्हाने घेऊन आलेले आहे.आपण सर्वच या सगळ्यांना तोंड देत आहोत. गरीब-श्रीमंत सर्वच जण यात होरपळे जात आहेत. या मध्ये, मुख्यतः आरोग्य आणि आर्थिक गोष्टी सामावलेल्या आहेत. पण ह्या सगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याकडे एक शस्त्र आहे, ते म्हणजे ‘मानसशास्त्र’. कारण मनाला एकदा का भरारी, प्रेरणा, आशा, उमेद, सकारात्मक ऊर्जा मिळाली की आयुष्याला जणू एक नवीन वळण च मिळते, एक जगण्याचा नवीन दृष्टिकोन मिळतो. आणि आयुष्याचा मार्ग सापडतो. पण या साठी हवे असते एक मानसिकरीत्या खंबीर असे मन.
ह्या जागतिक संकटकाळी , प्रत्येकाला मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जसे की एकटे वाटणे, विसरभोळेपणा, नैराश्य,अस्वस्थता , मानसिक गोंधळ , आणि ताण-तणाव इत्यादी.परंतु, आपण जर का मन सांभाळू शकलो तर ह्या सर्व समस्या आपण टाळू शकतो. या साठी जरुरी असते ती ‘सकारात्मकता’, भावनिक समतोल योग्य रित्या साधता येणे. आजकाल ‘वर्क फ्रॉम होम’ सगळीकडे सुरू आहे. परंतु, त्या मुळे कौटुंबिक जीवनावर अनेक परिणाम होत आहेत. जसे की चीडचिडेपणा, संवाद कमी होणे किंवा बंद होणे, एकमेकांना पुरेसा वेळ देता न येणे इत्यादी. आयुष्यातील निर्णय घेताना प्रचंड गोंधळ उडणे,आर्थिक समस्येत हतबल होणे, बाहेरील परिस्थिचा अतिरीक्त ताण घेणे, सर्व जगाचा ताण आपल्यावरच आहे अशी मानसिकता होणे अशा काही मानसिक समस्या आज आपण बरेच जण अनुभवत आहोत. तर अशा वेळी काय केले पाहिजे ?
सर्व प्रथम स्वतःशी संवाद साधता आला पाहिजे , माझे मन काय सांगत आहे हे प्रमाणिकरित्या स्वतःला ओळखता आले पाहिजे. मन शांत ठेवून ,आयुष्यात नक्की समस्या काय आहे आणि ती आपण कशी हाताळत आहोत हे समजून घेतले पाहिजे. मनाचे शास्त्र असे आहे की एकदा का ते स्वतःला उलगडे की समस्या ही समस्या राहत नाही तर आयुष्याचा आपला मार्ग स्पष्ट दिसू लागतो. या साठी हवे फक्त मनावर नियंत्रण आणि स्वतःच्या मनाशी ओळख.
प्रत्येक जण आज समस्यांमधून जात आहे. आणि कोरोनामुळे त्यात आणखीन भर पडत आहे. परंतु हीच ती वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. जसे की , या कठीण कळताच अनेक युवक-युवती नवीन उदयोग , स्टार्टअपस उभारत आहेत. त्यातून स्वतः बरोबर इतरांसाठी देखील रोजगाराच्या संधी ते निर्माण करीत आहेत आणि काही जण तर समाजपयोगी, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप सुरू करून सामाजिक जबाबदारी देखील पार पाडत आहेत आणि समाजापुढे एक आदर्श ठेवत आहेत. अशीच प्रेरणा आपण आपल्या मनाला देणे आजच्या काळात खूप जरुरी आहे.
तसे पाहीले तर , हे संकट आज कमी-जास्त प्रमाणात आहे, जणू आता आपल्या आयुष्याचा एक भाग च झाले आहे. परंतु , संकट कमी झाले तरी याचे माणसांवर होणारे परिणाम गंभीर आहेत. आणि जिथे मन च थार्यावर नसेल , मनशांती नसेल तिथे आयुष्य तरी कसे मार्गी लागू शकते? म्हणून हीच ती वेळ आहे स्वतःला सावरण्याची, स्वतःचे मन खंबीर करण्याची आणि एक सकारात्मक मानसशास्त्र घडविण्याची.
मन गुंतवता आले पाहिजे, ‘रिकामे मन शैतानाचे घर’ ही म्हण येथे खूप लागू होते. पण मन कुठे गुंतवायचे हे समजायला देखील शक्तिशाली मन च हवे. नाहीतर नको तिथे मन गुंतवून, फक्त गुंता वाढतो आणि मार्ग विस्कटून जातात. म्हणून स्वतःचे छंद झोकून देऊन जोपासता आले पाहिजेत. नाहीतर करायचे म्हणून करायचे असा दृष्टिकोन नको.
आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात. प्रत्येक वेळी आपल्या मनासारखे होईलच असे नाही. आणि जेव्हा कधी अशी वेळ येते, जिथे मनाला थोडे झुकावे लागते, तिथे मन घट्ट करून परस्थितीशी जुळवुन घेता आले पाहिजे आणि योग्य तो अंतिम निर्णय घेता आला पाहिजे. आणि समजा मनाला जे हवंय तेच आयुष्यात करायचे असेल तर तेवढाच धीटपणा तुमच्या मनाकडे हवा आणि त्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता देखील असली पाहिजे. मी घेतलेला निर्णय कसा योग्य आहे हे सिद्ध करण्याची धमक हवी. आणि मनाला जे हवंय ते मिळवण्यासाठी फक्त भावनिक असून उपयोगाचे नाही तर त्याला योग्य त्या कृतीची जोड देणे वास्तविक जीवनात गरजेचे असते.
स्वतःच्या मनाशी मोकळेपणाने बोलता यायला हवे.मन व्यक्त करता आले पाहिजे. स्वतः बरोबर प्रत्येक वेळी तडजोड ही केलीच पाहिजे , हा अट्टाहास नको.स्वतःच्या मनावर एकदा का ताबा मिळवला की आपोआप स्वतःच्या मनाच्या खऱ्या अर्थाने प्रेमात पडाल.
पण हे सर्व करायला हवा एक नवीन दृष्टिकोन, सकारात्मकता , सारासार विचार करण्याची वृत्ती खरी मानसिक , आत्मिक शांतता आणि खंबीर असे मन . मग बघा, मानसशास्त्र हे खऱ्या अर्थाने एक ‘शास्त्र’ आहे हे लक्षात येईल.
प्रयत्न करून पाहा!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

