पती-पत्नीच्या नात्यात ज्यावेळी एकाचा जुना भूतकाळ डोकावतो…
टीम आपलं मानसशास्त्र
प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा भूतकाळ असतो मग तो भूतकाळ चांगला असो किंवा वाईट.. पण त्यातून अनुभव घेऊन आपण पुढे सरकत असतो. आपण जर त्या भूतकाळात अडकलो तर त्याचा त्रास इतरांपेक्षा आपल्याला जास्त होतो.
पण हाच भूतकाळ कोणत्याही मुलाचा किंवा मुलीचा आपल्या प्रियकरासोबतचा असेल तर ते आयुष्याला वेगळं वळण देतो. म्हणजे अशाच ज्यांना ते प्रेम करतात त्याच्यासोबत लग्न करता येत नाही. आणि मग त्यांच्या आयुष्यात एक वेगळी व्यक्ती जोडीदार म्हणून येते.
जे झालं ते चांगलं होत की वाईट याचा विचार करण्यात काहीच अर्थ राहिलेला नसतो कारण आता आपल्यासमोर जे आहे ते स्वीकारण्यातच शहाणपण असते. कारण आता कितीही काहीही ठरवलं तरी त्यामध्ये बदल होणार नाही याची कल्पना आपल्याला असते.
मग अशावेळी फक्त काय करायचं तर गेलेल्या वेळेत अजिबात अडकायच नाही. आठवणी काढून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. कारण जे गेलं ते आपलं कधी नव्हतंच अस समजून जे आता आपल्यासमोर आहे तेच माझं वर्तमान आणि भविष्य आहे हे मनाशी पक्क करायचं.
कारण जर वाईट भूतकाळ असेल तर यापुढे मी कोणावर प्रेम करणार नाही.. कोणाशीच लग्न करणार नाही अशा आपल्या विचारांमुळे आपलं वागणं सुद्धा बदलते. आपण स्वतःला इतकं कठोर बनवतो की प्रेम हे द्यायचं सुद्धा असते हे आपण विसरतो.
आणि जर भूतकाळ हा चांगला असेल आणि ते मला मिळालं नाही तर त्या आठवणीत राहून रडत आणि घुटमळत बसून आपल्या हातात काहीच मिळणार नाही. सतत तोच विचार केल्याने आपण भावनिक आणि हळवे होतो.
आणि या सर्वाचा परिणाम मात्र आपल्या वर्तमानावर होऊ शकतो.कारण आज आपल्यासोबत जी व्यक्ती आहे ती जर आपल्याला जीव लावत असेल,आपल्यासोबत संसाराचे स्वप्न रंगवत असेल तर आपल्यामुळे सर्वात मोठा त्रास त्या व्यक्तीला होतो.
जर आपण जुन्या मित्रासोबत/ मैत्रिणीसोबत त्याच प्रकारे बोलत असू जसे आधी बोलायचो, भेटत असू हे तर काय साधं आठवणीत जरी राहत असू तर तो तुमच्या जोडीदाराचा विश्वासघात ठरेल.
म्हणून जे बदलू शकत नाही त्यामध्ये अडकायच की जे आज आहे त्याला जपायच हे आपल्या हातात असते. आपण आपलं वागणं आपले विचार बदलावे आणि हाच विचार करावा की जर आता मी हे गमावलं तर माझ्या सारखा कमनशिबी मीच असेल..
प्रेम मिळालं नाही म्हणून प्रेम द्यायचं, करायचं विसरू नका.. आपण प्रेम करू तीच व्यक्ती आयुष्यात नाही मिळाली तर आज जी व्यक्ती आपल्यासोबत आहे ती जर आपल्यावर मनापासून प्रेम करत असेल, विश्वास ठेवत असेल, आदर करत असेल तर त्याचा आनंदाने स्वीकार करा.
आपल्या जोडीदाराला आपला भूतकाळ कळेल की नाही माहीत नाही.. त्याला आपल्या वागण्याबोलण्यात वेगळेपणा जाणवेल की नाही माहीत नाही.. आपण जर आजही आपल्या भूतकाळात अडकलेले असू आणि याची कल्पनाही आपल्या जोडीदाराला नसेल तर आपण जोडीदाराला तर नंतर फसवू , पण असच वागणं आपलं राहील तर पाहिले आपण स्वतःला फसवतोय हे लक्षात घ्या.
नात्यात प्रामाणिक राहील तर ते नात कायम टिकणार. आणि प्रामाणिक राहणे म्हणजे काय तर चुकूनसुद्धा चुकीचे, कोणाची फसगत होईल असे वागू नये. पहिले आपण स्वतःशी प्रामाणिक राहावं. ते कस तर स्वतःला कायम विचारा की मी जे वागत आहे ते योग्य आहे का.. चुकीचे वागतोय हे जाणवलं तर तिथेच आपली चूक सुधारली तर पुढे त्याचा त्रास कोणालाच होणार नाही.आणि मिळालेलं प्रेम , विश्वास , आपुलकी कशी जपता येईल याची आपण काळजी घ्यावी.
कारण नात बनवताना जरी वेळ लागत असला तरी तुटायला एक क्षण सुद्धा पुरेसा असतो. आणि समोरची व्यक्ती मनापासून आपल्याला एक जोडीदार म्हणून सर्व देण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण चुकीचे वागून त्या नात्याचा अनादर करण्याची चूक करू नये.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


Beautiful ☝️