Skip to content

या क्षणभंगुर आयुष्यात उद्या दारावर येऊन काय घडेल माहीत नाही.

या क्षणभंगुर आयुष्यात उद्या दारावर येऊन काय घडेल माहीत नाही.


विशाल भागवत पाटील,

भराडी ,जामनेर, जळगाव.


आपल्याला मिळालेली सर्वात मौल्यवान गोष्ट जर कोणती असेल तर ते आहे आपले जीवन. जीवन खरंच किती सुंदर आहे , तितकेच क्षणभंगुर सुद्धा. जन्म आणि मृत्यु आपल्या हातात नाही , आपल्या हातात आहे जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आनंदात जगणे व दुसऱ्यांना आनंद देणे.
आता आपण बघत आहोत कारोना विषाणूच्या महामारीमुळे सर्व विश्वच ठप्प झाले आहे. यामुळे लोकांना समजले की पद ,पैसा , प्रतिष्ठा यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपले जीवन.

आज आपण जीवंत आहोत हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपला हा जणू पुनर्जन्मच म्हणावा लागेल, कारण आपण बघितले आहे की या महामारीत किती लोक मृत्युमुखी पडले आहेत.

तर चला मग आपले आयुष्य आता नव्याने सुरू करूया. आपली सर्वात महत्वाची संपत्ती आहे आपले शरीर. कारण शरीर चांगले असेल तरच आपण कोणत्याही गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. म्हणून शरीरासाठी वेळ द्या. व्यायाम , प्राणायाम , योगा , रंनिंग , सायकलिंग , स्विमिंग तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. त्यासोबत सकस आहार , फळे , दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात समावेश करा.म्हणून जीवनाचा परिपूर्ण आनंद घेण्यासाठी तुमच्या अनमोल शरीराकडे लक्ष द्या.

जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे नेहमी आनंदी राहणे. परंतु आपण नेहमी आनंदी राहतो का ? नाही. कारण आपण आपला आनंद हा वेगवेगळ्या इच्छा पुर्ण होण्यावर अवलंबून असतो. जसे की मला नोकरी लागली की मी आनंदी होईल, माझे घर बांधले की मी आनंदी होईल याप्रमाणे.आणि आपल्याला माहित आहे की मानवी इच्छा ह्या अमर्याद आहेत , एक पुर्ण झाल्यावर दुसऱ्या वाढतच जातात.

तसाच आपला आनंदही मृगजळाप्रमाणे दूर दूर जातो. आणि इच्छा , स्वप्ने पूर्ण झाली नाहीत तर आपण दुःखी होतो. यावर एक उपाय आहे आपल्याजवळ जे आहे त्यात आनंदी राहणे.कारण आपल्याजवळ जे असते ते बहुतेक जणाजवळ नसते.याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वप्ने बघू नये. नक्कीच स्वप्ने बघायला हवीत , ती पूर्ण करण्यासाठी 100% प्रयत्न करा. पण ती स्वप्ने पूर्ण नाही झाली तरी दुःखी होऊ नका.कारण प्रत्येकाला सर्वच गोष्टी नाही मिळत. आणि तसेही हे जीवन दुःखी राहण्यासाठी मिळालेले नाहीच.

आता वळूया आपल्या जीवनाकडे. आपण प्रत्येकजण जीवनाबद्दल विचार करतोच. जीवनात प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत जसे की पैसा,पद ,नोकरी , प्रतिष्ठा, संपत्ती इ. या सर्व गोष्टींमध्ये प्रत्येकाचा एक उद्देश आहे तो म्हणजे आनंद मिळवणे. पण खरंच यामुळे माणूस आनंदी झाला का ?

जर आनंदी झाला असेल तर मग हे ताणतणाव, आत्महत्या, गुन्हेगारी का वाढली आहे. कारण आजकाल सर्वच क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे त्यामुळे ताणतणाव व आत्महत्या यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच शॉर्टकट पैसा कमविण्यासाठी अनैतिक मार्ग जसेकी खून, दरोडे, किडण्यापिंग यांचा अवलंब केला जातो. पण खरंच अशाप्रकारे पैसा कमवून आपण आनंद मिळवू शकतो का? मुळीच नाही.

आपला आनंद हा आपल्या मानसिकतेवर व आपल्या विचारांवर अवलंबून असतो. त्यामुळे तुम्हाला जे आवडते ते करा. तुम्हाला पर्यटन, लेखन, वाचन, खेळ , गायन , मूव्ही बघणे यासारखे जे आवडत असेल ते करा. जीवनातील प्रत्येक दिवस , प्रत्येक क्षण शेवटला असल्यासारखा आनंदाने जगा.

कारण कोणता क्षण हा शेवटला असेल हे कोणालाच माहित नसते. मरतांना आपले जीवन हे आपल्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारख निघून जात. त्यामुळे त्या अंतिम क्षणाला तुमचा जीवनरुपी चित्रपट आनंदाने बघण्यासारखा असायला हवा. कारण मेल्यानंतर आपण काय कमवले यापेक्षा आपण आनंदी जीवन जगलो का? दुसऱ्यांना आनंद देऊ शकलो का? हेच महत्वाचे असते.

त्यामुळे ह्या क्षणभंगुर जीवनात नेहमी आनंदी रहा व दुसऱ्यांना आनंद द्या. जर दुसऱ्यांना आनंद नाही देऊ शकलात तरीही काही हरकत नाही. पण दुसऱ्यांना दुःख मात्र देऊ नका. ह्या माझ्या छोट्याश्या प्रयत्नाने जर एका व्यक्तीचाही जीवनाविषयी दृष्टिकोन बदलला तरीही मला आनंद होईल.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!