राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
कोणावरही अशी वेळ येऊ नये, म्हणून ‘टकाटक’ चित्रपट जरूर पहा !
आई-बाबा हे मुलांच्या आयुष्याचे Anti-Virus असतात. जेव्हा मुलं त्यांना आयुष्यातून Deactivate करतात. तेव्हा मुलांच्या आयुष्याच्या System मध्ये प्रॉब्लेम होतो.
हे वाक्य आहे नुकताच प्रदर्शित झालेला ‘टकाटक’ या मराठी चित्रपटातलं. एका खेडेगावातल्या दोन बहिणी. ज्यापैकी मोठीचं लग्न शहरात राहणाऱ्या एका वासनाधीन पुरुषासोबत होतं आणि दुसरी बहीण खऱ्या मित्राचं प्रेम समोर असतानाही केवळ प्रेमाची भाषा अर्धवट असल्यामूळे सतत पोरी फिरवणाऱ्या एका महाविद्यालयीन मुलाच्या आधीन जाते. जस-जसा चित्रपट हा विनोदी स्वरूपात पुढे सरकत जातो, त्यावेळी असं वाटतं की दिग्दर्शकाने केवळ एक मनोरंजन म्हणून आणि ‘बोल्ड सिनेमा’ ही संकल्पना लक्षात घेऊन चित्रपट बनवला आहे. पण हा भ्रम तुटतो चित्रपटाच्या मध्यंतरानंतर.
कारण हसत-हसत कधी गंभीरतेची चपराक गालावर बसते, हे उमगतच नाही. पण ती गंभीरता डोक्यात इतकी काहूरं माजवतात, की आपल्याला आपलं महाविद्यालयीन जीवन आणि लग्नाच्या सुरुवातीची काही दिवस आठवल्याशिवाय राहवत नाही. मग आपण मोबाईलमध्ये स्लाईड कसे आजूबाजूला सारत असतो, अगदी तसंच कुठे आपण चुकलो होतो, कुठे बरोबर होतो हे मनोमनी आजूबाजूला सारून ‘मी सुद्धा आयुष्यात या चुका केल्या होत्या किंवा बरं झालं मी या चुकांपासून दूर राहिले, असं काहीसं ठरवतो. आणि मग चित्रपटाच्या शेवटाची उत्कंठा वाढत जाते.
चित्रपट शेवटच्या सेकंदापर्यंत आपलं अवधान खेचून घेतो, यात माझं दुमत नाही. अत्यंत चलाखीने आणि हुशारीने दिग्दर्शकाने बोल्ड आणि वात्रट दृश्यांवर भर देऊन एकत्र कुटुंब म्हणून चित्रपट पहायला जाणाऱ्यांना याठिकाणी छेद दिली आहे. कारण प्रत्येक कुटुंबातील पात्रांची भूमिका आणि त्यांच्या जबाबदाऱ्या या काही वेळेस ‘एकत्र’ पेक्षा ‘एकांता’त जास्त समजतात, भिडतात, आणि तेव्हाच आत्मचिंतन करण्याची प्रक्रिया सुरू होते.
नुकतंच ज्यांचं लग्न झालंय आणि नुकतंच ज्या मुलांनी महाविद्यालयीन प्रवेश घेतलाय, त्यांच्यासाठी हा चित्रपट म्हणजे नव-संजीवनी आहे. कारण खऱ्या प्रेमाची व्याख्या आपल्याला ‘ठोक्या’ या पात्रात मिळते, ज्यांना ती व्याख्या सापडली त्यांना चित्रपट पावला.
बाकी हा सिनेमा बोल्ड आहे, त्यात शिव्या आहेत, अमुक आहे, तमुक आहे या सर्व क्षुल्लक तक्रारी आहेत. कारण या सर्व गोष्टी लपून-छपून आपण करतच असतो. एका जाणिपूर्वक आणि अतिसंवेदनशील विषयात हात घालून अशा लपून-छपून गोष्टींचा उलगडा या अडीच तासाच्या चित्रपटाने केलेला आहे. तसेच मराठी दिग्दर्शकांकडून हे अपेक्षित नाही, हे अति-स्वच्छतेचा स्वभाव म्हणून देखावा मिरवणाऱ्या प्रेक्षकांचा भ्रम हा चित्रपट नक्कीच तोडतो.
फक्त चित्रपट पाहताना एकच वाईट वाटलं की हा चित्रपट पाहायला मी फार उशीर केला, खरंतर फर्स्ट डे-फर्स्ट शो सारखा हा चित्रपट होता.
चित्रपटाचा शेवटचा डायलॉग इथे सांगितल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकत नाही…खेडेगावातील महाविद्यालयात शिकणारी लहान बहीण शेवटी म्हणते….
‘मी प्रोफेसर व्हायचं ठरवलंय, कारण मला कळून चुकलंय की आयुष्यात योग्य वाट दाखवणाऱ्या एका वाटाड्याची किती आवश्यकता असते.’
माझ्याकडून चित्रपटाला ⭐⭐⭐⭐⭐
पालकांच्या व्हाट्सऍप समूहात सामील व्हा !
मानसिक समस्येवर शास्त्रीय उपाय हवाय ???
आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.