Skip to content

नवऱ्याला किंवा बायकोला धाकात ठेवण्याचे परिणाम माहितीयेत का ??

नवऱ्याला किंवा बायकोला धाकात ठेवण्याचे परिणाम माहितीयेत का ??


मिनल वरपे


नात्यात मोकळेपणा कायम असावा तो असेल तरच नात हे खुलते.. आपण अनेकदा असे घर बघतो की किती छान वातावरण आहे या घरातलं, सर्व माणसं हसत खेळत जगतात पण हे वातावरण तेव्हाच असते जेव्हा नवरा बायको हे नात उत्तम असेल.

माझ्या बायकोने माझ्या धाकात राहायला हवं किंवा माझा नवरा माझ्या मुठीत राहिला पाहिजे म्हणून धाक दाखवणे यातूनच मनात आणि नात्यात दुरावा येतो.

आणि हा धाक कसला तर तू जर असा/ अशी वागशील तर मी जीवाच बर वाईट करून घेइन.. तू माझ्या मनाप्रमाणे नाही वागलास/वागलीस तर मी कायमच घर सोडून जाईन..आणि अशा या धाकामुळे नात्यात उरते ती फक्त नजरकैद ..
आणि अशा धाकात ठेवण्याचे परिणाम सुद्धा होतात.

१) संवाद कमी होतो

एकमेकांना दोष देत राहिलो सतत वाद करत राहिलो की दोघांमधील संवाद कुठे हरवतो कळतच नाही.आणि नात्यातली संवाद हा फक्त नवरा बायकोसाठी नाही तर प्रत्येक नात्यात गरजेचा असतो. जर संवाद नसेल तर एकमेकांची ओळख, मते, आवडीनिवडी काहीच कळत नाही. आणि यामुळेच दुरावा संशय, वाद, अविश्वास वाढत जातो.

२) मानसिक त्रास

जर दोघं एकमेकांना मनातलं काही सांगू शकत नसतील तर आतल्या आत नकोते विचार आपल्याला त्रास द्यायचं काम करतात. अतिविचार, दडपण , नैराश्य या मानसिक समस्या निर्माण होतात कारण सगळं मनात साठवलं जाते. मोकळं होण्यासाठी प्रयत्न केले नाही तर हे प्रश्न असेच वाढतात.

३) मोकळेपणा उरत नाही

जर एकमेकांना धाकात ठेवून नात टिकवायचा प्रयत्न करत असू तर फक्त एकमेकांकडे वेगळ्या नजरेने आपण बघत असतो. जर आपण काही बोललो तर समोरचा वेगळाच अर्थ लावेल आणि पुन्हा वाद होतील असे विचार येतात आणि त्यामुळेच नात्यात मोकळेपणा उरतच नाही.

४) निर्णय घेताना एकमेकांचे मत घेत नाही

जिथे नात्यात संवाद नसेल तिथे त्याला काय वाटते, तिला काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा होत नाही आणि काहीही ठरवायचं असेल तर एकमेकांना गृहीत धरून निर्णय घेतले जातात.

५) प्रेम आणि विश्वास कमी होतो

म्हणतात ना एकदा दोरी तुटली की तिला जोडण्यासाठी गाठी बांधाव्या लागतात त्यामुळे ती दोरी पूर्वीसारखी होत नाही.अगदी तसच जरी किती एकमेकांवर प्रेम असेल विश्वास असेल पण जर मनात एकमेकांना धाकात ठेवायचे विचार असतील तर प्रेम विश्वास हे फक्त शब्दातच उरतात मनात नाही.कारण त्या नात्यात राग, त्रास , अविश्वास यांना जागा मिळते.

६) कुटुंबावर परिणाम

एक व्यक्ती जरी आजारी असेल तरी घरातलं वातावरण बदलते अगदी हेच स्वभाव विचार आणि मानसिकता यामुळे सुद्धा घडते. जेव्हा एखादं नात योग्य दिशेने जात नसेल..चुकीचं वळण घेत असेल तर त्याचा परिणाम फक्त त्या नात्यावर नसून पूर्ण कुटुंबावर होत असतो.

७) एकमेकांकडे दुर्लक्ष

एकमेकांना धाकात ठेवण्याच्या नादात दोघंसुद्धा नको तिथे लक्ष देतात आणि जिथे गरज आहे एकमेकांची तिथे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येते. आणि एकमेकांचे महत्त्व दोघांच्याही मनात कमी होते.

८) नात्यातली ओढ कमी होते

जेव्हा मनासारखं दोघंही वागत नसतील त्यावेळी दोघांच्या मनातील प्रेम विश्वास तसेच शारीरिक भावना सुद्धा उरत नाही. तो तसा वागेल तर मी सुद्धा तसच वागेल हा विचार नात्यातील एकमेकांची ओढ कमी करतो.

९) प्रगती खुंटते

ऑफिस मधे असताना आता ती काय करत असेल नक्की मी सांगितलं तसच वागत असेल की नाही.. घरी किचन मधे असताना तो आता काय करत असेल .. याचा सतत विचार केल्यामुळे आपल्या कामाकडे लक्ष लागत नाही. आणि आपल आपल्या ध्येयापासून लांब होतो.

१०) एकमेकांना गमावण्याची शक्यता

जर धाकात ठेवण्याच्या स्वभावात काहीच बदल होत नसेल तर एक दिवस अशा स्वभावाला कंटाळून त्या व्यक्तीला कायमच सोडून जाण्याची शक्यता वाढते.

म्हणून हे परिणाम आपल्या नात्यावर होऊ नयेत यासाठी जास्तीत जास्त मोकळेपणा ठेवण्याचा प्रयत्न करा. जितकं ताणू तितकं लवकर तुटते हे माहीत असूनसुद्धा आपल्या या स्वभावामुळे जर नात तुटायची वेळ येत असेल, आपल्याला एकटेपणा येऊ शकतो तर मग आपल्या स्वभावात बदल करा.

मोकळेपणा गरजेचा आहेच पण दोघांनीही एकमेकांना धाकात ठेवण्यापेक्षा एकमेकांचा विश्वास तुटणार नाही असं वागण्याचा प्रयत्न करा. मोकळेपणाचा गैरफायदा आपण घेणार नाही आणि नात कायमच सुंदर राहील यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल असं वागण्याचा प्रत्येकाने ठरवलं पाहिजे.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “नवऱ्याला किंवा बायकोला धाकात ठेवण्याचे परिणाम माहितीयेत का ??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!