Skip to content

आपली ओळख ही आपल्या कामावरून होते आणि तीच आयुष्यभर राहते.

आपली ओळख ही आपल्या कामावरून होते आणि तीच आयुष्यभर राहते.


मिनल वरपे


आपण जिथे काम करतो तिथे आपली ओळख ही आपल्या पदावरून, दिसण्यावरून किंवा आपल्याकडे किती श्रीमंती आहे यावरून कमी पण आपल्या वागण्यावरून कायमची होते.

म्हणून आपली वागणूक ही कशी असावी हे आपलं आपल्यालाच कळायला हवं. कारण काम करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. कोणी खरेपणाने काम करतात, कोणी खूपच नमतेपणा घेऊन काम करतात,कोणी अगदीच टोकापर्यंत कठोर वागतात तर कोणी चुकीचे मार्ग निवडतात आणि मग ज्याचं जस काम तशी त्याची ओळख होते.

जर आपण अगदी खरेपणाने मेहनत घेऊन आणि सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत काम करत असू तर आपली ओळख ही कायम चांगलीच होते. कोणी आपल्या विरुद्ध काही बोलण्याची चूक करू शकणार नाही आणि यामुळेच आपण आपल काम अगदी चोख पार पाडू शकतो आणि त्यामुळेच आपली ध्येय पूर्ण करायला कुठेच व्यत्यय येत नाही.

जर आपली चूक नसेल तरीसुद्धा मला कामाची गरज आहे, समोरचा काय म्हणेल, जर मी काही बोललो तर मला त्याचे परिणाम माझ्या नोकरीवर होतील त्यापेक्षा चूक नसताना सुद्धा काही लोक नमतेपणा घेऊन निमूटपणे काम करतात. पण तर जर कायम असेच वागले तर जे चुकीचं वागत आहेत, जे त्यांच्यावर चुकीचे आळ घेत आहेत असे व्यक्ती अजून बिनधास्त वागतील आणि हा काय , याला काहीही बोललं , ओरडल तरी याच्याकडून आपल्याला काम करून घेता येते अशी आपली ओळख होते आणि त्याचा त्रास आपल्याला कायम सहन करावा लागतो.

काहीजण कामाच्या बाबतीत खरेपणाने जरी काम करत असले, कामाच्या बाबतीत तत्पर जरी असले तरी इतके टोकाचं वागतात की त्यांच्या या वागण्याचा इतरांना खूप त्रास होतो. प्रत्येक काम हे वेळेत झालच पाहिजे असं असलं तरी जर काही तांत्रिक अडचणी असतील, कधी अगदीच मोठ्या कारणाने सुट्टी घेतल्याने ते काम राहील असेल तर अशी माणस त्याच्या हाताखाली काम करणाऱ्यांना धारेवर धरतात.

आणि यामुळेच त्यांच्या हाताखाली काम करणारे त्यांना घाबरून काम करतात. जरी अस वागून काम होत असले तरी त्या कामाचं समाधान कोणालाच नाही मिळत. भीतीने केलेल्या कामात कोणालाच आनंद मिळत नाही. आणि मनापासून काम केल्यावर जितके चांगले परिणाम मिळतात तितके चांगले परिणाम भीतीने किंवा जबरदस्तीने केलेल्या कामात नसतात.

काही लोक चुकीच्या पद्धतीने काम करतात. याला त्याला फसवून, खोट बोलून, कामाचं आळस करून, इतरांना त्रास देऊन,. दुसऱ्याने केलेलं काम स्वतःच आहे अस पटवून देऊन आणि मग अशा त्यांच्या वागण्यामुळे त्यांची ओळख ही वाईटच होते. आणि अशा लोकांना ते करताना जरी काही वाटत नसले तरी त्याचे परिणाम पुढे जाऊन सहन करावे लागतात.

म्हणून आता आपणच ठरवावं की आपल्याला कशा प्रकारचे काम करायचे आहे. कष्ट तर प्रत्येकाला आहेतच, अडचणी सुद्धा येणारच, वेळ आली तर कोणता स्टँड घ्यायचा हे आपल्याला कळलं की आपलं काम हे नक्कीच योग्य पद्धतीने आपण करणार.

घरी असताना, सामाजिक ठिकाणी वावरताना, नातेसंबंध जोपासताना, जोडीदारासोबत संसार करताना, आपल्या मुलांच्या सानिध्यात असताना सगळ्या ठिकाणी आपली अशाप्रकारची प्रतिमा हि तयार होत असते. याचं भान ठेऊन आपल्याला कोणत्या प्रकारची प्रतिमा आकर्षित करायची आहे ते ठरवून त्यावर ठोस काम करण्याची गरज आहे.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “आपली ओळख ही आपल्या कामावरून होते आणि तीच आयुष्यभर राहते.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!