Skip to content

दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर खडकातूनही पाणी काढता येत !

दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर खडकातूनही पाणी काढता येत !


लालचंद कुंवर, पुणे.


आठराविश्व दारिद्र्य’ हा शब्द नुसता पुस्तकात वाचला नाही तर मी जगलोसुध्दा क्षणोक्षणी! माझ्या आयुष्यातलं हे एक कुणी न वाचलेलं पुस्तकच ! आजपर्यंत कधीच कोणासमोर न उलगडलेलं. पण ज्यांनी ह्या पुस्तकाच कधी कव्हर ही पाहिलं नाही, ते आज सहज बोलुन जातात,
” काय मोठा, बरं शे भाऊ तुनं आते, काही टेन्शन नही तुले. चांगली नोकरी शे, पगार शे. काय कमी शे भो तुले आते !”

पण हे सर्व कौतुकाने आणि जिव्हाळ्याचे बोल, म्हणून त्याचं एवढं शल्यं नाही वाटत, कारण ज्यांना माझा भूतकाळच माहीत नाही .
ते याच्या पेक्षा काय वेगळा विचार करणार ! खर तर , आतापर्यंत जे काही मिळवलं ती फक्त जीवनावश्यक आणि गरजेची साधनंच आहेत. या साधनांपर्यंत पोहचण्याच्या प्रवासात , काही देवदूताखारखी माणसं मला भेटत गेलीत. मायेची फुंकर माझ्या जख्मांवरुन, फिरवली, त्याक्षणी किमान जगणं थोडं सुसह्य तरी झालं होतं !

तर कधी कधी मदतीचा हात देऊन माणुसकीचं यथार्थ दर्शन हि घडवलं. आम्ही सात भावंड . बापाचा अर्थिक ओढाताणीचा संसार!
शेतीच्या उत्पन्नातुन कधीच संसाराचा मेळ उभ्या आयुष्यात बापाला बसवता आला नाही. मला आजही चांगल़ आठवतं, सातवी-आठवीत असेल, सावकारांकडून महिण्याला शेकडा तीन ते पाच टक्के व्याजाने पैसे फाटक्या संसाराला ठिगळं शिवण्यासाठी घेयायचीत .
‘ ऋण काढून सण ‘ या दुष्टचक्राने बापाचा कधी आयुष्यभर पिच्छा आणि पाठ सोडली नाही. शेवटी कर्जापायी बरीच शेती गेली.

माझं दहावीचं वर्ष. बापाला वाटायचं , ‘बस झालं शिक्षण! आता काहीतरी कामधंदा करावा.’ म्हणजेच मी आता शेती कामाला हातभार लावावा. अशी मनोमन इच्छा पण आईला मनातून वाटायच , मी शिकावं. यातच जुन महिना गेला. कधी कधी परिस्थिती समोर माणसं हतबल आणि असाह्य होतात ! ती उगीचच नाही.

शेवटी जुलै उजाडला आणि दोंडाईच्याला माझे आवडते इंग्रजीचे शिक्षक जे. आर. ठाकूर सर यांची बापाला घेऊन भेट घेतली. मी बाहेर थांबलो , स्टाफरुममध्ये सर बराच वेळ बापाशी बोलत होते. काय सांगितले कुणास ठाऊक !

पण बाप बाहेर येऊन एवढेच म्हणाले, “शिक गड्या , काय व्हायचं ते होऊ दे ” ठाकूर सरांकडे पाहिले अन नकळतपणे डोळे पाणावले.
सरांनी बोलवलं, ” चांगला अभ्यास कर, आणि तुझी राहण्याची पण सोय केली आहे होस्टेलला “.

बस्स! आता जे मिळेल ते खायायचं , जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करायचा आणि दहावी पास व्हायचं ! दहावी तर झाली पण आता पुढे काय ? होस्टेल फक्त दहावी पर्यंतच. पुन्हा बारावी पर्यंत राहण्याचा प्रश्न आ… वासुन पुढे उभा राहिला. आणि त्यावेळी याची जाणीव ही नव्हती कि येथून पुढचा प्रवास आणखी खडतर असेल !

मग बराच खटाटोप करुन शेवटी कसातरी एकदाचा राहण्याचा प्रश्न सुटला. दोंडाईच्यापासुन आकरा कि. मी. अंतरावर लंघाणे या खेड्यागावी राहायचं ठरलं. का तर , तेथे राहण्यासाठी पाच बाय पाच ची खोली मिळाली, ती ही भाडे न देता.

मग ये जा करण्यासाठी एक जुनी सायकल मिळवली फक्त रिपेअर करावी लागली. Practical संपल्यावर दोन वाजता college सुटायचं, रखरखीत उन्ह. तशीच सायकल डामचाळायची . घामाच्या धारा निथळायच्यात. विरुद्धदिशेने वारा असल्यावर तर मग, जोर लगागे हैय्या’ अस करत घर गाठायच.

तर कधी कधी आकाशात काळेकुट्ट ढग दाटून यायचेत . मग पाऊस चांगलाच बेधुंदपणे धो धो कोसळत धरणीमातेसह मला ही झोडपून काढायचा ! बाम्हणे या गावापासून चार पाच किलोमीटर कच्च्या रस्ता, पावसाळ्यात काळ्या मातीचा चिखल सायकलच्या चाकांत रुतून तर कधी रुसून बसायचा!

मग डबकाच्या शोधार्थ पाणी दिसेपर्यंत सायकलच खांद्यावर घेऊन निघायचं, मग सायकल धुवायची. एवढे सर्व दिव्य पार करुन घरी येईपर्यंत चार वाजायचेत. भुकेने पोटात खड्डा पडलेला असायचा. स्वयंपाक येत नव्हता, पण उपाशीपोटी राहण्यापेक्षा कशा तरी भाकरी करायला शिकलो. भाकरी सोबत जे मिळेल ते खायायचं. कधी कधी रडायला यायचंशेवटी मीच माझे डोळे पुसायचो.

या सर्वांचा परिणाम अभ्यासावर होत होता. शेवटी कसातरी एकदाचा बारावीतनं सुटलो. प्रतिकूल परिस्थिती माणसाला शिकवतेही आणि घडवतेही. पुढचं पदवी पर्यंतच शिक्षण आता दोंडाईच्यात राहूनच करायचं, हा निर्धार करुन घरी गेलो. तर घरी गेल्यावर कळालं कि नुकतेच दहा ते बारा एकर क्षेत्र कर्जबाजारी अन लोकांचा पैशांचा तगादामुळे अगदी कवडीमोल भावाने विकलेलं होतं. घरात अन्नपाणी कोणाला गोड लागत नव्हतं.

खरं तर, आयुष्यात कसलंच व्यसन बापाला माहीत नव्हतं. पण घरात खाणारी तोंड दहा बारा त्यात सारखेच दुष्काळ! उत्पन्नाच्या नावाने कायम शिमगा . माझीच अगदी द्विधामनस्थिती. वाटायच , बस्स आता लेखणी ! घ्यावा आता हातात औताचा दोरं ! पण त्याक्षणी एक विचार मनात चमकून गेला कि, ‘ गड्या, शिक्षणाशिवाय तरोणोपाय नाही, आणि गरिबीचे चटके आणि परिस्थितीचे फटके जर परतून लावायचे असतील तर शिक्षणाचा जागरण गोंधळ घालावाच लागेल. ‘

पुन्हा बाड बिस्तर बांधून निघालो दोंडाईच्याला. महिण्याला भाडं देवू शकत नव्हतो मग कुठेतरी हजार दोन हजार रुपयाने एखादी खोली गहाण ठेवायला मिळते का ! यासाठी वणवण भटकंती. तो काळ होता १९९४-९५ चा. शेवटी महादेवपुरा याठिकाणी एक आठ बाय आठ ची पत्र्याची खोली मिळाली . ना लाईट , ना फॅन, ना पाण्याचा नळ.

पण या अडचणींपेक्षा राहण्याचा प्रश्न सुटला , याचाच आनंद खुप मोठा होता. चार वर्षे एकाच ठिकाणी , एकाच खोलीत राहून दिवस काढलेत. शेजारच्यां मावशींनी ही मला एक त्यांच्या मुलाप्रमाणेच सांभाळ केला. हे चार वर्षे ही खुप जिकिरीचे आणि कसोटीचेच गेलेत! कधी पीठ नसायचं तर कधी मीठ नसायचं .

पण इच्छाशक्तीच्या जोरावर येणाऱ्या प्रत्येक अडचणी रेटून नेयायचो. एक जीवावर बेतणारा प्रसंग , मला आजही चांगला आठवतोय .
S. Y. ला असेन , लाईट नव्हती म्हणून मी दिवाच्या उजेड्यात अभ्यास करायचो. रात्री अभ्यास करता करता कधी झोप लागली कळालचं नाही. गाढ झोपेत असतांना अचानक पाय भाजायला लागलेत तेव्हा दचकून जागा झालो.

निम्मे अंथरुण आणि काही पुस्तकं जळत होती. कशीतरी आग विझवली . कदाचित झोपेत पायाचा धक्का लागुन दिवा कलंडला असावा.
पैशांचा तर नेहमी वणवा असायचा. मग सुट्टीच्या दिवशी छोटू मिस्त्री म्हणून सेंट्रिंग कामाचा ठेकेदार शेजारी राहात होता. त्याच्याकडे बिगारी म्हणून वाळू सिमेंट कालवायच, घमेली भरुन कारागीरांना द्यायाचीत , हि कामंही केलीत.
अशा अनंत अडचणींच्या छातडावर पाय देऊन ,

शेवटी थर्ड इयर फर्स्ट क्लास ने पास झालो. यादरम्यानच्या काळात माझ्या नंतर ची बहिण , तिने हि हालाखीचे दिवस काढून डि. एड. पुर्ण केलं. गावा शेजारी दुसाणे या गावी शिक्षिका म्हणून कामाला लागली. दोन नंबर बहिणीचं लग्न ही झालं. आणि दुसऱ्यांदा पुन्हा चार ते पाच एकर जमिनही विकली गेली.

मी, भानुदास रोकडे, भगवंत सुर्यवंशी , संजय गारुंगे असे चार पाच मित्र निघालो होतो , पुण्याच्या दिशेने, एम.ए. करण्यासाठी . माझ्यासाठी तर हा प्रवास आणखी खडतर होता. अगदी म्हणी प्रमाणेच आगीतनं निघून फफुट्याकडे निघालो होतो. काही दिवस सासवड , काही दिवस हडपसर ला राहून एम.ए. पुर्ण केलं.

पण या दोन वर्षानेही क्षणोक्षणी माझी कसोटीच पाहीली. मेस चे पैसे देता न आल्यामुळे , नंतर नाईलाजाने मेस हि बंद करावी लागली. मग रुमवरच काहीतरी बनवायच. पण तेथेही खाण्याची सारखीच अभळ होत होती . मला अभ्यासापेक्षा पोटानेच जास्त छळलं !
कुठुनच काही मार्ग दिसेना !

मग काही दिवस गावी , दोंडाईच्याला निघून आलो. तेथे राकेश जोशी नावाचा मित्र , तो अंबड ला बी. एड. करत होता. त्याची अभ्यासाची खोली होती तेथे चार पाच महीने राहून अभ्यास केला. नंतर थोडे फार पैसे घरुन मिळालेत मग परत पुण्याला निघुन आलो. असा हा ऊन पावसाचा खेळ दोन वर्षे सुरु होता.

२००१ ला बी. एड. ला नंबर लागला. कोल्हापूर युनिव्हर्सिटीत फ्री सीट मिळाली . पणआठ हजार भरावे लागणार होते. दोन दिवसाची मुदत मागुन कोल्हापूर हुन पुण्यात आलो.स्वारगेट बस स्थानकावर एका ठिकाणी दोन तास डोळे बंद करुन बसलो. शेवटी भानुदास रोकडे , या मित्राकडे आलो होस्टेलला . न सांगता बर्याच गोष्टी त्याच्या लक्षात आल्यात.

त्याने होस्टेलची भरलेली फि रद्द केली आणि तीन हजार रु. मला दिलेत. आता कुठे तरी आशेचा किरण मला उगवतांना दिसू लागला.
नंतर सातारा ला योगी कानडे या मित्राकडे आलो. त्याच एक वर्षी पुर्वी लग्न झालं होत, त्याची लग्नाची आंगठी त्याने तारण ठेवली , आणि काही रोख असे करुन सहा हजार रु मला करुन दिलेत. शेवटी एकदाचं बी. एड. ही पुर्ण केलं. कागल या ठिकाणी. नेहमी प्रमाणे, येथे ही अडचणी येत गेल्यात, मार्ग काढत गेलो.

शेवटी, तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल , तर परमेश्वर कोणत्याही रुपात येऊन , तुम्हाला मार्ग दाखवत असतो.
२४ मे २००२ ला बी. एड . चा निकाल लागला. आई सोनाराकडे मला घेऊन गेली. कानातले किल्लू मोडून , मला भाड्यासाठी आणि खर्चण्यासाठी एक हजार रु दिलेत. अस वाटलंही नव्हतं कि या खानदेशातल्या माझ्या जन्मभूमीचा तो शेवटचा दिवस ठरेल. पुढच्या प्रवासाला निघालो कोल्हापूरच्या दिशेने….। नवीन स्वप्नं पाठीशी घेऊन.

२८ मे ला निकाल घेऊन आलो. पुण्याला, दोन दिवस उरुळी देवाची , याठिकाणी सुनिल वाघमारे या मित्राकडे थांबलो.
परत गावी जाण्यासाठी शिवाजीनगरला आलो. रात्रीचे जवळपास आठ वाजले होते. नंदुरबार गाडीत बसलो गाडी सुरु झाली तसे विचारचक्र ही सुरु झालं.

गावी जावून काय करणार आहेस ? शेती करणार आहेस ? ……. नाही . मग ! न लढताच , रणांगण सोडून कुठे निघालास ? उतर खाली …… !
तोपर्यंत तिकीट तिकिट करत कंडक्टर माझ्या जवळ येऊन पोहोचले, ‘ तिकीट बोला’ ‘म्हटलं तुम्ही आधी गाडी थांबवा, मला उतरायचं आहे ‘.
कंडक्टर ने माझ्या कडे कुत्सित नजरेने पाहीलं आणि बेल मारली . तोपर्यंत पुणे स्टेशन हा एरिया आला होता.

गाडीतनं उतरलो. भेळ खाऊन मस्तपैकी पिशवीतनं लुंगी काढली, निवांत पुणे स्टेशनवर जाऊन झोपलो. जेव्हा तुम्ही निर्भय होता, तेव्हा भितीची सर्व लक्तरे गळून पडतात. एवढे नक्की. रोज वर्तमानपत्र उघडून बघायचं, जेथे शिक्षक भरती असेल तेथे इंटरव्ह्यू द्यायचा.

ऊन वारा पाऊस कशाचीच तमा न बाळगता काही दिवस पुणे स्टेशन, तर काही दिवस शिवाजीनगर बस स्थानक येथे रात्री काढाल्यात.
सोबतीला कधी झुणका भाकर, तर कधी भेळ. खरं तर हा खेळ इतका सोपा नव्हता. पण ज्याचा इथपर्यंतचा प्रवासच हा ठेचा खात झाला असेल, त्याला वादळाची भय कसल !. फक्त एकाच आशेवर हि वाटचाल सुरु होती,

‘ हे दिवस ही निघून जातील ‘ मार्केटयार्डला मुलाखतीला गेलो. तेथे दोंडाईचा येथील माजी राज्यमंत्री हेमंतराव देशमुख यांचे बंधु जयवंतराव देशमुख सर यांची भेट झाली. सरच मुलाखत घेत होते. सरांनी हडपसर येथे घरी बोलवलं. आपुलकीने विचारपुस केली. एकदा सरांशी फोनवर बोलतांना , शिंदेवाडी याठिकाणी 30 जुनला मला इंटरव्ह्यू साठी बोलवलं.

अर्थातच सरांनी माझी निवड केली. आणि संस्थेचे अध्यक्ष विकासराव लवांडे यांनी माझ्या वर विश्वास ठेवला. आजपर्यंत सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलो. सहकारी व मायेची माणसं, यांच्यामुळेच इथपर्यंतचा प्रवास हा सुखकर झाला आहे.४ जुलै २००२ रोजी , उरुळी कांचन पासुन १२ कि.मी. अंतरावर असलेले लोकनेते दादा जाधवराव विद्यालयात,

इंग्रजी विषय शिक्षक म्हणून रुजू झालो. आज जवळपास 20 वर्षे होताहेत, त्याच विद्यालयात समाधानाने अध्यापन करतोय. शेवटी एवढच सांगेन, प्रयत्न प्रामाणिक असतील अणि कष्ट करण्याची जिद्द आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर खडकातूनही पाणी काढता येत.

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर खडकातूनही पाणी काढता येत !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!