Skip to content

त्या क्षणाला माणसं जवळ हवीत, मन मोकळं करण्यासाठी !!

माणसे जवळ हवीत !


शिवाजी भोसले I 9689964143


एकीकडे दिवसाला शेकडो-हजारो माणसं भेटतील पण मनाच्या अंतरंगात बोलण्यासाठी जवळच कोणीच नसावं, याची सल मनाला कायम बोचत असते. प्रत्येक मनाला व्यक्त व्हायचं असतं, पण व्यक्त होण्यासारखं समोरच्या व्यक्तीच व्यक्तिमत्व नसतं. मन हलकं करणारी व बोलणारी माणसं आजच्या क्षणाला जवळ हवीत. कधी, कसा, कोणता क्षण आणि प्रसंग माणसांवर येईल हे सांगता येणे अशक्य आहे.

त्या प्रसंगांना आणि संकटांना निर्भिडपणे सामोर जाण्याच आत्मबळ देणारी माणसं जपायला हवीत. माणसांचं जवळ असणं आणि एकमेकांना जपणं आजच्या काळात खूप गरजेचं झालंय. एक वेळ पैशानं आणि संपत्तीने श्रीमंत असणारी माणसं जवळ नसली तरी चालेल मात्र मनानं श्रीमंत असणारी आणि संकट काळात मदतीचा हात देणारी माणसं जवळ असावीत.
——
सद्यस्थितीत माणूस कधी नव्हे तो इतका प्रचंड स्थितीतून जात आहे. सध्याचा काळ हा माणसांच्या साठी प्रचंड त्रासदायक आणि समस्यांचा काळ म्हणून ओळखला जातो. माणसं कधी नव्हे ती प्रचंड संकट आणि समस्यांचा सामना करत आहे. येणारा काळ तर यापेक्षा अधिक भयंकर आणि अधिक वाईट असणार आहे. वर्तमानात त्याचा विचार सुद्धा करवत नाही. इतका प्रचंड भयंकर काळ सध्याच्या तरुण मुलामुलीत आणि येणाऱ्या पिढीमध्ये उभा ठाकला आहे. त्याची बोचरी सल ही प्रत्येक मनाला जाणवू लागली असून प्रत्येक माणसाच्या मनात उदिग्नतेचे भाव उमटत आहेत.

सद्यस्थितीत मानवी मनाची स्थिती समजून घेणं खूप कठीण होत चालले आहे. एकमेकांना समजून घेऊन माणसांना सोबत घेऊन चालणे आता कठीण होऊन बसले. माणूस आणि समाज एकमेकांपासून विखुरत चालला आहे. माणूस आणि समाजाचं असलेल दृढ नातं कमी होत चालल आहे. असं का होत असावं ? असे संवेदनशील मनाला प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. सातत्याने बदलत चाललेली समाजव्यवस्था, जीवनशैली, वाढती महागाई, हरवत चाललेली कुटुंबप्रणाली, नातेसंबंध, व्यक्ती केंद्रीपण, स्वार्थपणा यासह अनेक शेकडो बाबी यासाठी कारणीभूत ठरत असाव्यात. काळ बदलला तशी माणसे सुद्धा बदलू लागली आहेत. तसे समाज व्यवस्थेचे रूप व स्वरूप सुद्धा बदलल चालले आहे.

मुळात माणूस हा समाजशील प्राणी असून तो समाजाशिवाय राहू शकत नाही, हे शाश्वत सत्य केव्हाच नाकारता येणार नाही. आणि ते नाकारता येणारही नाही. माणसांच आणि समाजाचं अतूट असं एक घनिष्ठ नातं आहे. माणसांशिवाय समाज आणि समाजाशिवाय माणसं हे समीकरणच मानवी जीवनाला एकरूप करणारं ठरतं. मानवी मनाच्या भावनांना समाजाच्या विचारांचं कोंदण, संस्कृती, आचार-विचार व पद्धतीच घनिष्ट आवरणं असतं. मानवाला समाजाशिवाय राहणं अद्याप शक्य झालेले नाही आणि येणाऱ्या काळातही ते शक्य होणार नाही.

मानवाच्या प्रगतीचा आजवरचा इतिहास पाहिला असता माणसांना समाजाशिवाय राहता येणेही शक्य झालेले नाही. माणूस हा समाजात राहतो, असे वारंवार म्हटले जाते. मात्र समाज माणसांमध्ये राहतो का ? हा मूळ प्रश्न आहे. पूर्वी माणूस आणि समाज हे एक समीकरण होते. ते सद्यापन आहेच. मात्र आता हे समीकरण पूर्णता बिघडत चाललं आहे. कदाचित पाश्चिमात्य संस्कृतीच्या नावाखाली व मायदेशी संस्कृतीच्या विद्रूपाखाली हे सर्व खपवल्या जात असावं. त्यामुळे माणसाच्या मनाची वाढणारी घालमेल दिवसेंदिवस अधिक वाढायला लागली आहे. आणि त्यामध्ये माणसे टेन्शन, ताणतणाव व चिंताग्रस्त आयुष्य जगायला लागली आहेत.

येणाऱ्या काळात तर माणसांची खूपच विदारक स्थिती पाहायला मिळू शकते, त्याचे घोतक सद्यस्थितीत दिसायला लागली आहेत.

ज्या समाजव्यवस्थेत माणूस राहतो त्या समाजव्यवस्थेने माणसांना जवळ केलं आहे. मात्र आधुनिक काळात जगणाऱ्या माणसांनी या समाजव्यवस्थेला दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हे अनेक घटना, बाबीतून समोर येत आहे. बदलत्या काळात माणसांना बदलावेच लागते. बदल न केल्यास ती माणसे सुद्धा संपुष्टात येतात. मात्र माणसांनी इतके सुद्धा बदलू नये की आपली समाजव्यवस्थाच संपुष्टात येईल. यावर कुठेतरी प्रगल्भ विचाराने चिंतन, मंथन होणे आवश्यक आहे. मात्र तेवढा सकारात्मक विचार आजच्या पिढीचा आहे का? आजच्या तरुण पिढीकडे तेवढी सवड आहे का? याचासुद्धा विचार करणे आवश्यक आहे.

एकीकडे दिवसाला शेकडो-हजारो माणसं भेटतील पण मनाच्या अंतरंगात बोलण्यासाठी जवळच कोणीच नसावं, याची सल मनाला कायम बोचत असते. प्रत्येक मनाला व्यक्त व्हायचं असतं, पण व्यक्त होण्यासारखं समोरच्या व्यक्तीच व्यक्तिमत्व नसतं. याचं दुःख कित्येकांच्या मनात वर्षानुवर्ष दडलेलं असतं. बालपणी स्वच्छंदी आणि निरागसपणे जगणार मन तरुणपणात तणावाच्या व चिंतेच्या मानसिकतेत जगत असतं. अस का व्हावं? आयुष्यभराच्या या प्रवासात दिवसाला शेकडो-हजारो माणसं भेटतात तर वर्ष, महिन्याला हा आकडा लाखोंच्या घरात असतो.

कित्येकांची केवळ आपली तोंडओळख तर कित्येकांशी केवळ परिचय असतो. तर काही बोटावर मोजता यावी इतकी मूठभर माणसं ही आपली असतात. त्यातच प्रत्येकच व्यक्ती हा आपला हितचिंतक, आप्तेष्ट, सहकारी, जिवलग असतोच असे नाही. त्यातील काहीच म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता यावीत इतकीच आपली माणसं असतात. तीच माणसं जीवनाच्या अविभाज्य घटकात मनाच्या अंतरंगात दडून बसलेली असतात.

दररोज वाढत जाणारी धावपळ, चैनीच्या, भौतिक व अभौतिक गोष्टीची हव्यास, क्षणात सर्वकाही मिळविण्याची मानसिकता, एकांगी विचार करण्याची प्रणाली व स्वतःच्याच विश्वात हरवून आजूबाजूला काय घडतेय याचे सोयरसुतक न पाळणारी आजची तरुण पिढी प्रचंड मोठ्या दडपणाखाली जीवन जगत आहे. यातूनच क्षणाक्षणाला व दिवसा दिवसाला स्वतःला इजा पोहोचणे, स्वतःची बरेवाईट करणे पर्यायाने आत्महत्येकडे वळणे यासारखे प्रकार घडायला लागले आहेत. असे काही प्रकार का घडतात ?

याचा माणूस म्हणून विचार करणे आवश्यक आहे. दररोज प्रत्येक क्षणाला कित्येक माणसे भेटतात बोलतात आणि निघून जातात. दैनंदिन जीवनात अगदी सकाळपासून ते रात्री उशिरा झोपेपर्यंत प्रत्येक जण हा कुणाच्या न कुणाच्या संपर्कात येतच असतो. पण जीवनाच्या अडचणी, संकटं, समस्या, तणाव, चिंता कुणापुढे व्यक्त करावी? याबद्दल प्रत्येक मनात सांशकता असतेच. स्वतःचं काहीतरी सांगाव व इतरांनी त्याच ऐकून घ्यावं, असं प्रत्येकालाच वाटतं. पण समोरची व्यक्ती त्या योग्य आहे का ? याचीही तपासणी करणं गरजेचे आहे.

कित्येकांचा मोबाईल मध्ये शेकडो-हजारो नंबर असतात. पण जीवाभावाचं आणि हक्काचं बोलता यावं, असा एक तरी नंबर आहे का? ज्यांच्याकडे असे नंबर असावेत त्यांचं जगणं खूप सुखकर व आनंददायी होतं. हक्काचं आणि आपलेपणाचा स्थान असावं असं मोबाईल नंबरच्या पलीकडचंही व्यक्तिमत्व व मित्राचं स्थान आपल्या जीवनात असावं. मोबाईलने नव्हे तर प्रत्यक्ष भेटीन त्यांने आपलं दुःख समजून घ्यावं.

कसली औपचारिकतेच, स्थळाचं, सभोवतालच भान न बाळगता व्यक्त होता यायला हवं. केवळ शब्दांनाच नव्हे तर नजरेनं व स्पर्शानही आपलं दुःख समजून घेता यायला हवं. मनाच्या अंतरंगातील आवरण त्याच्या भेटीन व बोलण्याने मोकळं व्हावं. सुखात नव्हे तर दुःखात प्रत्येक क्षणाला धावून जाणार असं व्यक्तिमत्त्व प्रत्येकाजवळ असावं.

मन हलकं करणारी व बोलणारी माणसं आजच्या क्षणाला जवळ हवीत. कधी, कसा, कोणता क्षण आणि प्रसंग माणसांवर येईल हे सांगता येणे अशक्य आहे. त्या प्रसंगांना आणि संकटांना निर्भिडपणे सामोर जाण्याच आत्मबळ देणारी माणसं जपायला हवीत. माणसांचं जवळ असणं आणि एकमेकांना जपणं आजच्या काळात खूप गरजेचं झालंय. एक वेळ पैशानं आणि संपत्तीने श्रीमंत असणारी माणसं जवळ नसली तरी चालेल मात्र मनानं श्रीमंत असणारी आणि संकट काळात मदतीचा हात देणारी माणसं जवळ असावीत. संकट काळात पैशासोबत मन खंबीर करणारी व आत्मबळ देणारी माणसाचं पूर्णर्थाने जीवन जगतात. भूतकाळात झालेल्या मतभेदांना विसरून वर्तमान काळात मनात जोडणाऱ्या माणसांना जपता यायला हवं. अशा माणसांना जिवापाड जपता आलं की आनंदानं व हिंमतीने जगातही येत.

आत्मभान जगण्याचं !


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “त्या क्षणाला माणसं जवळ हवीत, मन मोकळं करण्यासाठी !!”

  1. खर आहे. आपल्याला योग्य वाटणारी माणसं भेटली तरच आपण आपल्या मनातील सर्व भावना सांगू शकतो. पण तिला पण ते समजून घेण्याची तयारी असली पाहिजे.नाही तर आपण थटटेचा विषय होऊ शकतो.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!