Skip to content

प्रत्येक ‘स्त्री’ साठी तिचा हा अनुभव खूप निराळाच असतो.

प्रत्येक ‘स्त्री’ साठी तिचा हा अनुभव खूप निराळाच असतो.


प्रमिला सरणकर

कांदिवली (मुबंई)


मैत्री एक संजीवनी

आज मला एकाने विचारले तुझ्या आयुष्यात सर्वात जास्त महत्वाचे काय आहे? मी म्हणाले ‘मैत्री’.

‘मैत्री’ हा शब्द जरी उच्चारला तरी मला स्वर्गिय आनंद मिळतो. आणि त्या आनंदात मी पूर्ण पणे न्हाऊन निघते.

किती नितळ आणि पवित्र आहे हे मैत्रीच नातं. मला तर ही देवाची देणगीच वाटते. रक्ताच्या नात्यात नसते तेवढी ओढ, आपुलकी, प्रेम या मैत्रीच्या नात्यात असते.

आई-बाबा, आजी-आजोबा, बहिण- भाऊ, काका-काकी, मामा-मामी ही नाती आपल्याला जन्मतःच मिळतात. पण मैत्रीच नातं आपण स्वतः मिळवतो,कमवतो. लहानपणापासून स्वतःच अस मिळवलेले काय असेल तर हे मैत्रीच नातं.

नकळत्या वयातही कितीही भांडणे झाली तरी थोड्याच वेळात पुन्हा त्याच्याशी खेळतो ते निरागस आणि पवित्र मैत्रीच नातं. मैत्री कर अस कोणीच आपल्याला कधीच सांगत नाही. ती आपोआप होते. ही देवाची सुंदर देणगी आहे. ज्यांचे सुर जुळवायचे असतात ते सुर बरोबरच जुळतात.

घर, शाळा,कॉलेज ही मैत्रीची मंदिरे आहेत. या मधूनच मैत्रीला सुरुवात होते. शाळा, कॉलेज मधली मैत्रीची दुनियाच निराळी असते. दंगा, मजा, मस्ती, खोड्या सगळ काही आपण याच वयात करत असतो आणि सोबतीला असतात आपले मित्र -मैत्रिणी.

त्यानंतरच्या काळात करीयर, लग्न, लग्नानंतरच्या जवाबदाऱ्या या नादाच हळूहळू अद्वितीय अशा या मैत्री पासून लांब व्हायला लागतो,अलिप्त होतो.

यामध्ये पुरुषांची मैत्री कित्येक वेळा तशीच राहते. पण स्त्रियांच्या बाबतीत जिच्या शिवाय आपलं पान सुध्दा हलत नसतं अशा मैत्रिणीशी बोलायलासुध्दा आपल्याला वेळ नसतो. स्त्री संसाराच्या रहाटगाड्यात स्वतःला एवढी गुरफटून घेते की मैत्री नावाच पानच हळूहळू कोमेजून जातं.

त्यातल्या त्यात एखादीचा नवरा किंवा सासर चांगल असेल तर स्त्रियांची मैत्री टिकते. पण समाजात अजून स्त्रियांच्या मैत्रीला तितकस महत्व दिलंच जात नाही. काय हा बावळट पणा असे म्हणून दरवेळेस तिला हिनावलं जातं आणि त्यामुळेच हळूहळू स्त्रियांची मैत्री संपुष्टात येते.

मित्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं लग्न झालं म्हणजे सगळं संपलं का? ज्या घरात लहानाचे मोठे झालो ते आपलं हक्काचं, मायेच आई-वडीलांच घर ती सोडून येते. आणि कित्येकिंना तर आपली मैत्रीही गमवायला लागली आहे.

मैत्रिणीनों, आयुष्याच्या संध्याकाळी कधीतरी निवांत बसा. डोळे बंद करा आणि फक्त एकदा ‘मैत्री’ हे नाव उच्चारा. बघा कशी जादू होईल. एका क्षणात तुमची दुःख, उदासीनता कुठच्याकुठे पळून जाईल. मैत्रीच्या जगात पुन्हा एकदा तुम्ही मनमोकळे फिरुन याल आणि तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. नवीन ताकद, नवी उमेद मिळेल. आणि या मुडमध्येच मोबाईल हातात घेऊन तुम्ही तुमच्या मैत्रिणीला फोन कराल. कित्येक वर्षांच्या गप्पा तुम्ही फक्त तुमच्या एका हॅलोवर कराल. न बोलताच सारं काही तुम्हाला मिळेल. तेव्हा स्वर्गीय सुखाची लहर तुमच्या अंतरंगात भिनून जाईल. मग कधीही तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही.

माझ्या आयुष्यात अशा अनेक सख्या आहेत.त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळते, मार्गदर्शन मिळतं आणि अडचणींच्या वेळी आधार मिळतो.आणि हो मी चुकली तर ओरडाही मिळतो.

प्रत्येकीच्या आयुष्यात एक तरी सखी हवी. जी तुमच्या जखमेवर मोरपिसासारखी हळूवार फुंकर घालून तुमच्या जखमेची वेदनाच नाहीशी करेल. तुमच्या आयुष्यात आनंदाची लहर आणेल आणि तिच्या जिंदादिलीने तुमच्यात जगण्याची नवी उमेद जागी होईल. तुमच्यातला हरवलेला सुर ती तुम्हाला मिळवून देईल. ती तुम्हाला तुमच्यावर प्रेम करायला शिकवेल.

कधीतरी तिच्या बरोबर एक कप चहा घेऊन बघा, पहिल्या पावसात तिचा हात हातात घेऊन छत्री शिवाय मनसोक्त बागडा, नाचा,गाणी गा. वयाच भान विसरुन त्या क्षणी फक्त आणि फक्त मैत्रीचे सुंदर क्षण अनुभवा. आणि हे क्षण फोटो काढून सतत तुमच्या जवळ ठेवा. मग बघा तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही. तुम्ही करत असलेली तुमची रोजची कामेही तुम्ही अगदी सहजपणे कराल आणि मनातून क्षणाक्षणाला तुम्ही तुमच्या सखी जवळ असाल. आणि मग हेच सुंदर अनुभव तुम्हाला तुमच्या सखीला भेटण्यासाठी आतुर करतील.

‘अरे यार,’ म्हणून सुरुवात तर करा. पलिकडून ‘बोल ना यार’ म्हणून उत्तर नक्कीच मिळेल. मग काय मैत्रिणींनो, विचार कसला करताय लगेच मोबाईल उचला आणि लावा तुमच्या सखीला फोन. ती ही कदाचित तुमच्या सारखीच तिच्या सखीची वाट बघत असेल.

रक्ताच्या नात्यात नसतो
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो
आयुष्याचा जिंदादिलपणा तेव्हा खऱ्या अर्थाने उमगतो….

एक क्षण ही पुरेसा असतो
तुझ्या माझ्या भेटीसाठी
जीवन जगण्याचा अनुभव देऊन जातो संपूर्ण आयुष्यासाठी….


 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!