एकमेकांमधील उणिवा शोधण्यात वेळ वाया घालवू नका!
श्री. राकेश वरपे I ९१७५४२९००६
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीनाकाही उणीवा या असतातच. या जगात धुतल्या तांदळासारखा कोणीच नसतो. प्रत्येक जण सर्वच बाबतीत अचूक किंवा बिनचूक असाही नसतो. प्रत्येकामध्ये कोणती ना कोणती तरी उणीव हि असतेच, असं म्हणतात.
त्यामुळे एकमेकांमधील उणीव शोधण्यात वेळ घालवण्यात काहीही अर्थ नसतो. अशा उणिवा शोधात राहिल्यानं एकतर आपला वेळ वाया जातो, शिवाय आपल्या अशा स्वभावामुळे आपल्या जवळची लोकं सुद्धा नाराज होतात.
सतत आपण कोणाच्या ना कोणाच्या तरी उणिवा शोधत राहतो, अशी आपली प्रतिमा बनत जाते. त्यामुळे आपल्याशी कोणीही फारसे मनमोकळे बोलताना सुद्धा आढळत नाही. कारण समोरच्याला भीती असते कि हि व्यक्ती एक दिवस माझ्या उणिवा सर्वत्र पसरवेल.
त्यामुळे कोणीही आपल्याशी मनमोकळा संवाद साधत नाही. त्याचा आपल्याला पुढच्या आयुष्यातही त्रास होतो. म्हणूनच उणीवा शोधण्यापेक्षा एखाद्याचे गुण शोधले पाहिजेत.
कारण उणिवांकडे सतत लक्ष देणारा हा तोच आहे ज्याचा अर्धा पेला नेहमी रिकामाच असतो. खरंतर आपल्याला भरलेल्या अर्ध्या पेल्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचे आहे. ज्याचा उपयोग आपल्याला तर होईलच शिवाय आपण ज्याचे अनुकरण करू किंवा ज्याची स्तुती करू त्यालाही आपल्यामुळे स्फूर्ती मिळेल.
एखाद्याच्या उणीवांचा सर्वांसमोर उल्लेख करण्यापेक्षा त्याच्यातील तुम्हाला दिसलेले गुण इतरांना सांगा. असेही होऊ शकते कि सतत उणीवा पाहण्याची सवय जडल्याने एखाद्याचे गुणच आपल्या दृष्टीस पडणार नाही. हा आपल्या दृष्टिकोनावर पडलेला सर्वात मोठा अडथळा असेल. इथे आपल्याला आत्मचिंतनाची गरज आहे.
आपलं जागृत मन जितकं पूर्वग्रह दूषित असेल त्याप्रमाणे अवतीभवती असणाऱ्या बऱ्याच सकारात्मक बाबींपासून आपण वंचित असू. एखाद्यामध्ये चांगले गुण शोधणाऱ्या व्यक्तीला सतत तिच्या अवतीभवती उत्तम, चांगले, विनोदी लोक, प्रसंग आणि परिस्थिती अनुभवायला मिळतात. त्यामुळे त्यांचा परिसर सतत सकारात्मक ऊर्जेने व्यापलेला असतो.
याउलट सतत दोष शोधणाऱ्या व्यक्ती चिडलेले, कंटाळलेले, वैतागलेले, हक्क गाजवणारे आढळतात. त्यामुळे त्यांच्या अवतीभवती असणारी नकारात्मक ऊर्जा त्यांना आकर्षित करीत असते. त्यामुळे आपण मनात कोणत्या गोष्टी पाठवतोय, अमुक अमुक प्रसंगांचा आपण कसा विचार करतोय यावरून आपल्याजवळ काय आकर्षित होईल हे ठरत असतं.
दुसऱ्यांच्या उणिवा शोधण्यासाठी जसा वेळ घालवू नये, अगदी तसंच दुसऱ्याला आपल्या उणिवांची चिरफाड करण्याची संधी सुद्धा देऊ नये. कारण उणिवा शोधणाऱ्याला जसा त्रास होतो अगदी तसाच उणिवा असणाऱ्याला सुद्धा होतो.
माझ्या उणीवांचा पाढा सर्वांसमोर वाचला जातोय, हे सहसा आपल्याला पचत नाही. उणिवा बाहेर काढून ती सुधारण्याची योग्य परिस्थिती असल्यास चालून जातं, पण प्रत्यक्ष तसा काही संबंध नसताना त्या उणिवा चार-चौघात बाहेर काढल्या जात असतील तर त्या सुधारण्यापेक्षा आणखीन बिघडतील.
याठिकाणी आपण जर संकुचित असू तर या गोष्टींचा ताप आपल्याला होणार आणि हे सर्कल सुरूच राहणार. मनमोकळ्या आणि मनाने अतिशय लॉजिकल व्यक्ती अशा व्यक्तींना फारसे स्थान देत नाही. कारण त्यांचा विश्वास त्यांच्या कर्तृत्वावर सर्वात जास्त असतो.
म्हणून ते स्वतःला या गोष्टींमध्ये घुटमळत ठेवत नाहीत. प्रत्येक व्यक्तीमध्ये उणिवा असतात, माझ्यातही आहेत आणि पुढेही राहणार, हे त्यांनी कधीच स्वीकारलेले असते. इतकं लॉजिकल सेटअप त्यांनी स्वतःच्या मनाचं केलेलं असतं.
त्यांच्यासाठी हा काही चर्चेचा किंवा वादाचा विषय मुळीच नसतो. स्वतःला कुठे अडकवून ठेवायचं नाही आणि कुठे इन्व्हेस्ट करायचं हे ते ओळखून असतात. त्यामुळे नकारार्थी लोकं त्यांच्या अवतीभवती फार काळ टिकत नाहीत.
हे विज्ञान एकदा उमगलं आणि ते प्रत्यक्षात अमलात आणण्याची कला आत्मसात केली कि पुढचं सर्व अवघड राहत नाही.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

