तुमच्यातील कमतरताच तुमची सक्षमता होऊ शकते.. !!!
मिनल वरपे
आपण जन्मतःच सर्वगुण संपन्न नसतो. काही कलागुण आपण आत्मसात करतो आणि यश मिळवतो तर काही कमतरता आपल्याला मागे पडण्याचं कारण ठरतात. आपल्यातील कमतरता ही आपल्या अपयशाचे कारण ठरवण्यापेक्षा आपल्यातील याच कमतरता दूर करण्याचे प्रयत्न आपण केले तर नक्कीच एक नविन ऊर्जा आपल्याला जाणवेल. ज्याची आपल्यात कमतरता आहे त्याला नकारात्मक केंद्रबिंदू बनवून त्याचा न्यूनगंड बाळगणे चुकीचे आहे. त्यापेक्षा जे आहे त्यावर भर द्यावी.
आपल्यातील कमतरता ओळखा
आपल्याला बहुतेक वेळा आपल्यातील कमतरता ओळखता येत नाहीत.जस की मला सायकल चालवता येत नाही अस म्हणताना आपण जर आधी कधीच सायकल चालवण्याचा प्रयत्नच केला नसेल तर सायकल चालवता कशी येणार मग ही आपली कमतरता नाही ठरणार… पण जर मी बरेच प्रयत्न करून सुद्धा मला सायकल चालवणे जमतच नाही अस म्हटलं तर नक्कीच ती आपल्यातील कमतरता आहे असे बोलता येईल. यासाठी आपण आपल्यातील कमतरता ओळखणे महत्वाचे आहे.
कमतरतेवर विचार करण्यापेक्षा कृती करा
विचार करून बोलावे आणि विचार करून कृती करावी हे अगदी योग्य आहे पण विचार किती करावा याला सुद्धा मर्यादा असतात. आणि कृती न करता फक्त विचार करून काहीच साध्य होणार नाही. मला गणित हा विषय अजिबात जमत नाही पण पास होऊन पुढे जायचं आहे तर तो विषय मला जमलाच पाहिजे मग अशावेळी फक्त विचार करण्यामुळे मला आपोआप सगळं कळणार नाही तर त्या विषयाचा सतत अभ्यास करून मला त्यामधे पुढे जाता येईल.
मिळालेला वेळ ही संधी समजा
आपल्याला दिवसाचे चोवीस तास मिळालेले आहेत त्यातले काही तास आपली ठरलेली कामे, अभ्यास, झोप, जेवण वैगेरे यासाठी आपण वापरतोच पण मिळालेल्या वेळेचं नियोजन करणे गरजेचे असते. आपल्याकडे जेव्हा मोकळा वेळ असतो तेव्हा तो वेळ आपण आपल्यातील कमतरतांवर काम करायला दिला पाहिजे. वेळ वाया घालवण्यापेक्षा मिळालेली प्रत्येक वेळ ही संधी समजून तिचा फायदा घेणे गरजेचे आहे.
स्ट्रॉंग पॉईंट्सचा वापर करा
जशी आपल्यात कमतरता असते तसेच आपल्यात सुप्त गुण सुद्धा असतात. शिक्षण घेत असताना आपल्याला सगळेच विषय जमतात आणि आवडतात असे नाही काही विषय आपल्याला अगदी सहज समजतात आणि काही विषय म्हणजे आपली कमजोरी म्हणून आपण जे विषय आवडतात त्यांचा जास्तीत जास्त अभ्यास करून उत्तम गुण मिळवतो आणि जे विषय आपल्याला खूप अवघड वाटतात त्यांची एकतर घोकंपट्टी करणार नाहीतर जमेल तितका अभ्यास करून त्या विषयात पास होणार अगदी असच आपल्याला आपल्यातील कमतरता दूर करण्यासाठी आपल्यातील कलागुणांवर भर द्यायची.
नियोजन करा
कोणतीही गोष्ट करताना योग्य नियोजन केले तर ते सोप्पं जाते पण जर नियोजन केलं नसेल तर अचानक येणाऱ्या अडचणी दूर करणे आपल्याला अवघड जाईल. जर भिती ही माझ्यातील कमतरता आहे आणि ही कमतरता मला दूर करायची असेल तर मी त्यासाठी योग्य नियोजन केले पाहिजे. मला भिती कोणत्या गोष्टीची वाटते, का वाटते भिती वाटण्याचे कारण कोणती, ती कशी दूर करता येईल यांचं योग्य नियोजन असेल तर नक्कीच आपल्याला एका योग्य मार्गाने जात येईल.
प्रयत्न
कोणतीही गोष्ट प्रयत्न न करता सहज मिळत नाही. मला माझ्यातील कमतरता दूर करायची असेल तर मी हे कस करू, मला हे जमेल का असे विचार करून किंवा काहीच न करता आपल्याला कोणतीच गोष्ट मिळणार नाही. म्हणून प्रयत्न कधीच सोडू नयेत.
संयम राखणे
आज मी माझ्यातील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला पण मला नाही जमल असे म्हणून कधीच आपण यश मिळवू शकणार नाही. संयम राखला तर आपण आपण अजून प्रयत्न करणार आणि नक्कीच एक दिवस आपल्याला यश मिळेल. आपल्यातील कमतरता दूर करायची असेल तर प्रयत्न करणे न सोडता संयम राखला तर नक्कीच एक दिवस आपल्यातील कमतरता आपल्यातील ताकद होणार.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


लेख आवडला