माझ्यामुळे कोणाची मानसिक स्थिती बिघडणार नाही.
मिनल वरपे
आपण आपल्या आजूबाजूच्या माणसांना आपल्या सहवासात असणाऱ्या व्यक्तींना आपल्या वागण्या बोलण्यातून बरच काही शिकवून जात असतो. कळत-नकळतपणे काही गोष्टी या प्रेरणेच्या मार्फत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि त्याच व्यक्तीकडून आणखी तिसऱ्या व्यक्तीकडे हि ऊर्जा स्थलांतरीत होत असते.
एखादी आजारी व्यक्ती असेल आणि आपण त्या व्यक्तीला भेटायला गेल्यावर त्या व्यक्तीला आपण बोललो की काळजी घे, तू लवकर बरा होशील तर नक्कीच त्या व्यक्तीला दिलासा मिळेल पण तेच जर आपण बोललो की अरे बापरे माझ्या ओळखीत असाच एक व्यक्ती आजारी होता आणि अचानक त्याची तब्येत जास्त बिघडली मग त्याला पुढे पाठवायला सांगितलं.. अशा बोलण्यामुळे आपण आजारी व्यक्तीची अजून स्थिती बिघडवण्याच काम नक्कीच करणार.
एखादी व्यक्ती जर दुःखी असेल तर त्यावेळी आपण त्या दुखाच कारण विचारून त्या व्यक्तीला धीर द्यायचं सोडून अजून दुःखाची आठवण करून देत असतो अशावेळी आपण जर त्या व्यक्तीला हसवून आनंदी करण्याचा प्रयत्न केला तर उत्तमच. विषय बाजूला सारून बाकीच्या गप्पा केल्या तर त्यावेळी काही क्षणांसाठी का असेना पण ती व्यक्ती मोकळी होते.
आपण जेव्हा परीक्षेला जातो तेव्हा आपल्या घरचे कायम आपल्याला आशीर्वाद देतात आणि परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होशील अस म्हणत आपल्याला शुभेच्छा देतात यामुळे आपल्यातील आत्मविश्वास वाढतो. पण काही असेही मित्र भेटतात हे स्वतासुद्धा परीक्षेला घाबरतात आणि आपल्याला सुद्धा, काही जण तर असे असतात जे स्वतः पूर्ण अभ्यास करतात आणि आपल्याला मात्र परीक्षेची भिती दाखवून घाबरवतात.
परीक्षा असो किंवा मुलाखत.. जर आपल्याला प्रोत्साहन मिळेल असे कोणी बोलले तरी त्यांच्या बोलण्यातून आपल्यातला आत्मविश्वास वाढतो, मनातील भिती दूर होते आणि आपण बिनधास्त राहतो.
आपण जे अनुभवले आहे त्यातून जे आपल्याला शिकायला मिळाले त्यामधून आपण कायम समोरच्या व्यक्तीला धीर मिळेल असेच बोलावे. प्रत्येकाचे प्रसंग आणि अनुभव वेगवेगळे असू शकतात पण काहीवेळेस आपण चांगले अनुभव सोडून समोरची व्यक्ती माघार घेईल असे वाईट अनुभव सांगतो.
म्हणून आपण कायम लक्षात ठेवावं आपल्या वागण्यातून इतरांना जरी प्रेरणा, आत्मविश्वास, योग्य दिशा आणि शिकवण मिळाली नाही तरी चालेल पण कोणत्याही व्यक्तीची आपल्यामुळे वाट चुकेल, घाबरेल, माघार घेईल, भरकटून जाईल आणि मनस्थिती बिघडेल असे कधीच वागू नये.

Online Counseling साठी !
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

