घटस्फोट आणि मानवी मन
भूषण कौशल्या लक्ष्मण मडके
विवाह ही मानवी जीवनातील सर्वात आनंददाई गोष्ट आहे. प्रेमविवाहात आपलं प्रेम आपल्या आयुष्यात येणार असतं तर जमवून केलेल्या विवाहात सर्वस्वी अनोळखी असलेला जोडीदार आपल्या आयुष्यात आलेला असतो.
प्रेमविवाहात आपला जोडीदार ओळखीचा असतो. त्याच्या सवयी, त्याच्या आवडीनिवडी आपल्याला आधीपासूनच माहिती असतात. त्याला येणारा राग, त्याचा आनंद सर्व काही आधीच माहिती असत तर दुसऱ्या विवाहात नंतरच सर्व काही जमवून घेतलं जात. आता यामध्ये कोणता विवाह चांगला हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असू शकतो. याच्यावर खरेतर वेगळा लेख होऊ शकतो. आजचा लेख हा घटस्फोट या विषयावर आहे. घटस्फोट का होतात आणि याचे होणारे मानवी मनावरील परिणाम.
घटस्फोट होण्याची मुख्य करणे
१) मुळात घटस्फोट होण्यामागे वैचारिक मतभेद हे मुख्य कारण आहे. विचारात असलेला फरक एकमेकांना समजून घेण्यात कमी पडतो. त्यामुळे दुरावा वाढत जातो आणि त्याचा शेवट घटस्फोटात होतो.
२) एकमेकांवर घेतला जाणारा संशय हे सुध्धा महत्वाचे कारण आहे.
दोघांपैकी एक दुसऱ्याशी प्रतारणा करत असेल तर एकमेकांवर असलेला विश्वास उडून जातो आणि त्याचा परिणाम संसार तुटण्यावर होतो.
३) लग्नाआधी आवडत असलेला स्वभाव किंवा सवयी काही दिवसांनी नावडत्या वाटू लागल्या की हळूहळू वाढत जाणारा दुरावा जर वेळीच लक्षात नाही घेतला तरीसुध्दा त्याचा शेवट वेगळाच होऊ शकतो.
४) पतीला असलेली व्यसने आणि इतर वाईट सवयीन त्रासून प्रकरण घटस्फोट घेण्यापर्यंत जाऊ शकते.
५) सतत स्त्रीच्या माहेरहून येणाऱ्या सूचना आणि माहेरचा संसारात होणारा सततचा हस्तक्षेप.
६) अगदी छुल्लक गोष्टी आणि पतीपत्नीचा खाजगी गोष्टी माहेराला सांगणे आणि त्यावरून केला जाणारा माहेरचा हस्तक्षेप.
७) आपली कुवत नसताना इतरांशी केली जाणारी सगळ्याच बाबतीतील तुलना. शक्यतो आर्थिक परिस्थिती यासाठी जास्त कारणीभूत असते.
८) एकमेकांना समजून न घेणे.
९) आपला पार्टनर पसंत नसताना बळजबरीने केले जाणारे विवाह.
१०) वैवाहिक संबंधामुळे होत असणाऱ्या अडचणी.
अशी अनेक कारणे यासाठी कारणीभूत असतात. मुळात घटस्फोट घेणे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा सगळ्यात मोठा अपमान आहे. काही वेळेस तो अपरिहार्य सुध्धा असू शकतो नाही अस नाही. परंतु तो टाळता येणे आपल्याच हातात आहे ना.
१) दोघात वैचारिक मतभेद असतील पण जर आपण आपल्या जोडीदाराशी समजून घेतले तर नात्यातील गाठ अजुन घट्ट होईल आणि त्यातील गोडवा आणखीन वाढेल.
२) आपल्याला आपल्या जोडीदारावर संशय येत असेल तर त्याच वेळी त्या संशयाच्या किडीला ठेचावे. म्हणजे तो वाढणारच नाही आणि जोडीदार सुध्धा आलेला अनुभव लक्षात ठेऊन पुढे नीट वागेल.
३) प्रेमविवाहात आपला जोडीदार कसा आहे हे माहिती असतं पण जमवून केलेल्या विवाहात ती शक्यता थोडी कमी असते. परंतु आपण जमवून घेतलं तर सर्वच गोष्टी जमून येतातच ना.
४) पतीला असलेलं व्यसन कधीही वाईटच असतं. आधी माहिती असेल तर विवाह टाळता येतो पण नंतर लागलेलं असेल तर पत्नीने अत्यंत काळजीपूर्वक त्याला अशा व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा. प्रसंगी सगळे हातखंडे वापरावे (साम, दाम,दंड,भेद). व्यसनमुक्ती केंद्र, इतर औषधी यांचा चांगला उपयोग करून घ्यावा.
५) आपल्या संसारात छोट्या छोट्या गोष्टत होत असलेला माहेरचा हस्तक्षेप कमी करावा.
६) पतीपत्नी मधील नाजूक गोष्टी माहेरी सांगून उगाच राईचा पर्वत करू नये.
७) आपली कुवत जेवढी आहे त्याच प्रमाणात आपले राहणीमान ठेवावे उगाच इतरांशी तुलना करू नये. आपले अंथरूण पाहूनच पाय पसरावे.
दुरून डोंगर साजरेच दिसतात.
८) शक्यतो विवाहाआधी मुलामुलींची पसंती जरूर पहावी. त्यांचे कोठे काही आधीच जमले असेल तर खातरजमा करावी. वेळ गेल्यावर विचार करून काही उपयोग नाही.
९) वैवाहिक संबंधात काही अडचणी असतील तर त्वरित डॉक्टरांची भेट घेऊन शंकानिरसन करवून घ्यावे.
१०) आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट संसार हा दोघांच्या विचारांनी चालणारा रथ आहे. त्यामुळे दोघांनी समतोल राखूनच वाटचाल करावी.
कोणी एक गरम झाल तर दुसऱ्याने नरमाईची बाजू घ्यायची आणि आपला संसार अजुन जास्त खुलवायचा.
टीप: मी काही कोणी मनोवैज्ञानिक नाही की कोणी मानसोपचार तज्ज्ञ नाही. वाचन आणि समाजात वावरत असताना डोळे उघडे ठेऊन वाचता येणारे अनुभव पाहून मी जे निरीक्षण केले आहे तेच मी या लेखात उतरवले आहे. ज्यांना विचार पटत असतील त्यांनी जरूर अमलात आणा आणि ज्यांना पटत नसतील त्यांनी कृपया दूरच राहा.

Online Counseling साठी !
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

