” निर्णय “
हेमा यादव-कदम I 7875550789
निर्णय चुकत गेले कि,
आयुष्य चुकत जाते
दिशाहीन मन मग
वारा होऊन भरकटत जाते …
आपल्या आयुष्यात बरेच असे प्रसंग येतात कि , तेव्हा आपण काय निर्णय घ्यायला पाहिजे हे आपल्याला सुचत नाही , मग सल्ले देणारे शिकाऊ , अनुभवी किंवा अप्रशिक्षित – प्रशिक्षित असेच बरेच लोक आपल्याला त्यांच्या त्यांच्या अनुभवाप्रमाणे आणि त्याच्या बुद्धीच्या क्षमतेप्रमाणे सल्ले देऊ लागतात … कधी कधी आपण इतरांचे ऐकून आपल्या आयुष्याचे निर्णय घेतो हि आणि कधी कधी सर्व गोष्टी वेळेवर सोडून देतो …
खूप लोक तर निर्णय घ्यायला हि घाबरतात .. त्यामुळे अपयश त्यांची पाठ कधीच सोडत नाही शिवाय ते नेहमी इतरांना दोष देण्यात तत्पर असतात कि , ” तुम्ही सांगितले म्हणून मी असे केले ” आणि आज माझी परिस्थिती जी आहे त्याला कारण तुम्ही आहे “” पण खरचं असे असते का? तुम्ही स्वतः हि विचार करा या गोष्टीवर ..
मी एक उदाहरण सांगते … समजा तुमची एखादी मैत्रीण किंवा तुमचा एखादा मित्र घरी आला आणि तुम्हाला सांगितले कि , “अरे मला आज ना लॉटरी लागली आहे चल ना मस्त पार्टी करू ” त्यावर तुम्ही आनंदाने लगेच मान डोलावता कारण पार्टी म्हणजे मज्जा हे तुम्हाला चांगले माहित असते स्वतःचा वेळ आनंदात जाणार याची पूर्ण कल्पना तुम्हाला असते म्हणून क्षणाचा विलंब न करता कसले हि आढेवेढे ना घेता तुम्ही लगेच स्वतःचा होकार कळवता आणि पूर्ण तयारीने जाता देखील …
(हा प्रसंग नीट लक्षात घ्या कि तुम्ही स्व : इच्छेने स्वतःला आनंद मिळावा म्हणून हा निर्णय घेतलेला असतो)
पार्टी आनंदाने पूर्ण देखील होते . पार्टी करून परत घरी येताना तुमच्या गाडीचा अपघात होतो … जीवितहानी होत नाही पण एक जबरदस्त अपघात ज्यात तुमचे थोडे फार शारीरिक नुकसान होते … त्यानंतर बरेच लोक आयुष्यभर त्या मित्राला दोष देत बसतात “त्याचे ऐकून गेलो आणि आज हि अवस्था झाली ..
” गोष्ट सांगण्याचे तात्पर्य इतकेच कि , “चांगले तर माझ्या मुळे आणि वाईट झाले तर दुसऱ्यामुळे” हा आपला सर्वांचाच स्वभाव असतो .. पण या स्वभावात बदल करणे हे आपल्या हातात असते ..
मनात स्वार्थ , राग , अहंकार , लोभ , मत्सर असे भाव ठेऊन जेव्हा आपण एखादा निर्णय घेतो तेव्हा तो १००% आपल्याला त्रास दायक ठरतो , निर्णय घेताना तटस्थ पणे निर्णय घेण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये असायला पाहिजे , तुमच्या जवळची कोणतीही व्यक्ती तुम्हाला सल्ला देते तेव्हा त्याचा हेतू तुमचे कल्याण व्हावे हाच असतो , कोणतेही प्रियजन आपले वाईट व्हावे म्हणून सल्ला देत नाहीत त्यामुळे सर्वात आधी इतरांचे ऐकून निर्णय घेणे थांबवा आणि निर्णय घेतल्यावर इतरांना दोष देणे थांबवा …
तुमच्या मनाला पटते त्याच गोष्टी तुम्ही इतरांच्या ऐकता .. एखाद्या मित्राने तुम्हाला आत्महत्या करण्याचा सल्ला दिला तर तुम्ही ऐकाल का तो सल्ला नक्कीच नाही तुम्ही त्याला समजूतदारी शिकवायला जाणार … जिथे आपल्याला स्वतःचा फायदा दिसतो तिथेच आपण समोरच्या व्यक्तीचे ऐकतो .. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट घटनेला आपण स्वतः जबाबदार असतो …
1. त्यामुळे निर्णय छोटा असो वा मोठा तुम्ही तो स्वतःची सद्सदविवेकबुद्धी वापरून घ्या .
2. तुम्ही जो निर्णय घेणार आहात त्यामुळे चांगले आणि वाईट असे काय परिणाम होतील हे एका पानावर लिहून काढा ..
3. चांगल्या गोष्टीने अर्थातच तुम्हाला खूप आनंद मिळणार आहे पण वाईट गोष्टी घडल्या तर त्याचा सामना तुम्ही कसा कराल त्या साठी उपाययोजना तयार करून ठेवा.
4. आकाशात उंच भरारी जरूर घ्या अख्ख जग तुमच्या कौतुक सोहळ्यासाठी तयार आहे फक्त एक लक्षात ठेवा कि , भरारी घेताना ती फक्त तुमच्या पंखातील सामर्थ्यामुळे च असेल हे पहा .. उसन्या पंखांची भरारी फार जास्त काळ टिकत नाही.
धन्यवाद.



Khup ch sunder