Skip to content

मानसिक स्वास्थ्य बिघडलंय हे कसे ओळखावे ?

मानसिक स्वास्थ्य बिघडलंय हे कसे ओळखावे ?


श्री. राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


मानसिक स्वास्थ्य घडणे आणि बिघडणे या निसर्गाच्या क्रिया-प्रक्रिया आहेत. पुष्कळ वेळेस असेही अनुभव आहेत की मानसिक स्वास्थ्य उत्तमरित्या घडण्यासाठी काही काळापुरते बिघडावं लागतं.

‘बिघडलं तर पुढे घडतं’ सृष्टीच्या या नियमावर आपण सर्वच भावी आहोत. आपण आजपर्यंत असा एकतरी व्यक्ती पाहिलात का, जो नुसता घडतंच चालला आहे. त्यांच्या अंतर्गत मानसिक गुणधर्मांचा जर बारकाईने अभ्यास केला तर कळेल की मनातून तो किती बिघडलेला आहे.

मानसिक स्वास्थ्य आपलं काम हे इतकं प्रामाणिकपणे करतं की तेथे आपल्याला खोटा आव दीर्घकाळापर्यंत राखून ठेवता येत नाही.

जरी आपण सतत घडत राहणारी व्यक्ती पाहिली नसेल पण सतत बिघडत राहणारी व्यक्ती ?

अशा व्यक्तींचा गोतावळा तर आपल्या अवतीभवती सतत असतो. आपले नातेवाईक, घरातली व्यक्ती किंवा खुद्द आपणही त्यात असू शकतो.

म्हणून मानसिक स्वास्थ्य बिघडलंय हे ओळखणं महत्वाचं झालेलं आहे. हे समजून घेण्यासाठी आधी मानसिक समस्या समजून घेऊ. एक साधं गणित आहे. मानसिक समस्या खूप काळापर्यंत सोबत राहिल्या तर मानसिक स्वास्थ्य हे बिघडते.

आता मानसिक समस्या निर्माण झाली आहे, याची चाहूल लागणं फार कठीण नाहीच. याची अनेक लक्षणे आहेत. त्यामार्फत आपल्याला मानसिक समस्येने पछाडलेले आहे. हे कळू शकेल. जसं की,

झोप न लागणे किंवा खूपच झोपत राहणे, सतत एकाच गोष्टींचा अतिविचार येणे, भूक कमी होणे किंवा खूप खावेसे वाटणे, कोणत्याही कामात रस न वाटणे, भविष्याबद्दल सतत चिंता, आत्मविश्वास गमाविणे, एकाग्रता मंदावणे, चिडचिड वाढणे, सतत नकारार्थी भावनांमध्ये असणे इत्यादी.

ही लक्षणे आपण सामान्यपणे अनुभवत असू तर ठीक मानली जाते. म्हणजेच या लक्षणांचा अनुभव आपण कधीतरी, कोणत्यातरी प्रसंगात किंवा प्रसंग घडल्यानंतर घेतच असतो.

परंतु ही लक्षणे जर दीर्घकाळापर्यंत आपल्या सोबत नांदत असतील तर मानसिक समस्या निर्माण झालीये, असे म्हणता येईल. ती मानसिक समस्या आता तुम्हाला सामान्यपणे जगू देत नाही.

तुम्हाला घराबाहेर पडू वाटत नाही, तुम्हाला हसू वाटत नाही. कोणत्याही कामात रस वाटत नाही. किंबहुना तुम्ही तुमचं व्यक्तिगत, सामाजिक, व्यावसायिक आणि मानसिक प्रचंड अडथळे सहन करत असाल. याचाच अर्थ तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होतोय.

लक्षणांची तीव्रता जोपर्यंत सौम्य असतील तोपर्यंत आपण त्यांचा आपल्या जाणिवेत सामान्य अनुभव घेत असतो. या लक्षणांची होणारी सातत्यता लक्षणांची तीव्रता वाढवण्याचे प्रमुख कारण बनते.

आणि आपणही मनाच्या होणाऱ्या या नकारार्थी बदलांकडे दुर्लक्ष करतो. ज्यावेळी मानसिक स्वास्थ्य बिघडलंय हा जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं कळलेलं महत्व वळत नसतं.

योग्य वेळी एका प्रशिक्षित समुपदेशकाकडून, मानसशास्त्र तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बिघडलेलं हे मानसिक स्वास्थ्य आपण पुन्हा पूर्ववत आणू शकतो. यासाठी आपली मानसिक तयारी सुद्धा सकारात्मक असायला हवी.

मानसिक समस्या आणि मानसिक स्वास्थ्य यांची सांगड घालून ते बिघडलंय, बिघडतंय की बिघडणार आहे, याबद्दल आपल्याला स्पष्टता येणे, हा या लेखाचा मुख्य हेतू होता.

पुढच्या समुपदेशनासाठी किंवा मानसशास्त्र तज्ज्ञांचा सल्ला (Counselling) घेण्यासाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!