लग्न की अपेक्षांचं ओझं ??
मेराज बागवान | ७३९७९८३५०५
‘रेशीमगाठी’ हा शब्द वाचला की अर्थातच एक महत्वाचा विषय डोळ्यासमोर येतो , तो म्हणजे अर्थातच ‘लग्न’. तसं पाहायला गेलं तर , आपल्याकडे ‘लग्न’ हा विषय पारंपरिक च आहे, आपल्या संस्कृती शी निगडित आहे. पूर्वी, लग्न म्हणजे फक्त , ‘ठरवून केलेले’ म्हणजेच ‘अरेंज म्यारेज’ अशा स्वरूपाचे असायचे. परंतु आता याचे स्वरूप खूप बदलले आहे,
‘अरेंज म्यारेज’ ही पध्दत तर आहेच , पण या बरोबर आता ‘प्रेम विवाह’ ‘लिव्ह इन’ , ‘कॉनट्रॅक्ट म्यारेज’ अशा काही लग्न पद्धती देखील समाजात दिसून येत आहेत. पण लग्न कोणत्याही पद्धतीने केलेले असो, त्यात महत्वाचा असतो तो सारासार विचार करून घेतलेला अंतिम निर्णय.
पूर्वी च्या काळी, आई-वडील ठरवतील त्याच मुलीशी/ मुलाशी विवाह ठरत असत आणि पार देखील पडत असत. परंतु , आता मुलगा-मुलगी शिकलेले असतात, शैक्षणिक पार्श्वभूमी असल्याने स्वतः विचार करून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते.असे असले तरी देखील , घटस्फोटाचे प्रमाण आज भयंकर वाढलेले दिसते. त्यामुळेच लग्न जुळविताना काही महत्वाच्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत.
सर्व प्रथम मुलीने/ मुलाने आपल्याला कसा जोडीदार हवा आहे, हे मनाशी पक्के केले पाहिजे. काही सुशिक्षित मुली-मुले देखील लग्नाचा विषय आला की लाजतात आणि आई-वडिलांना म्हणतात, ‘तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा’ आणि जवळ जवळ विषय च बंद करून टाकतात.मान्य आहे की , ‘लग्न’ ही खूप हळवी ,भावनिक गोष्ट आहे, त्या लग्नाच्या वयात लाजणे वगैरे ह्या सर्व गोष्टी होतात. पण आज समाज बदलतो आहे,
प्रगल्भ होतो आहे. त्यामुळे प्रत्येक लग्नाळू मुला-मुलींनी आपण स्वतः मानसिकरित्या लग्नाला तयार आहोत की नाही ते तपासले पाहिजे, आणि जर तयार असू तर जोडीदाराबद्दल आपल्या मनात स्पष्टपणे विचार केला पाहिजे, जोडीदारविषयीची प्रतिमा पक्की केली पाहिजे आणि आपल्या पाल्यांकडे हे बोलून देखील दाखविले पाहिजे.
‘जोडीदार कसा हवा?’ आणि ‘अपेक्षा’ ह्या तशा परस्पर पूरक गोष्टी आहेत. ‘जोडदार कसा हवा’ हे विचार केला तर ,मनाशी पक्के असते. पण ‘अपेक्षा’ ह्या न संपणाऱ्या असतात. म्हणून दोन्हीन मधील फरक समजून घेतला पाहिजे. ‘समजूतदारपणा हवा , पण मागण्या नकोत’ ही विचारसरणी अवलंबण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.
आजकाल , लग्न ठरण्याआधी, मुले-मुली एकमेकांशी बोलतात , त्यावेळेस काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपल्या आवडी-निवडी , करिअर , जोडदार कसा हवा या विषयी चर्चा केली गेली पाहिजे. यातून एकमेकांना समजून उमजून घेता येते, स्वभाव समजतात. इथे एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते ती म्हणजे , ‘स्पष्टवक्तेपणा’. आयुष्याबद्दलचा तुमचा दृष्टिकोन , तुमचे विचार एकमेकांसमोर मांडले गेले पाहिजेत.
आता शिक्षणामुळे,” मी कसे बोलू तिच्याशी/त्याच्याशी” हा विषय राहिलेला नाही. पण नेमके काय बोलावे हे मात्र फार महत्वाचे आहे.म्हणूनच ‘लग्न’ ह्या अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी ‘ संवाद’ हा झालाच पाहिजे, किंबहुना ते गरजेचे देखील आहे.तसेच ह्या लग्नापूर्वी होणाऱ्या संवादमध्ये दोघांनी देखील एकमेकांची ‘स्पेस’ जपली पाहिजे. कुणीही कुणाला गृहीत धरता कामा नये.
पण या ‘संवादातून’ आणखीन एक मुद्दा ऐरणीवर येतो. मुले-मुली एकमेकांशी बोलत असताना, काही वेळेस असेही होते की , दोघांमधील एकाला जोडीदार लगेच पसंतीस पडतो, विचार आवडू लागतात इत्यादी. परंतु, हेच त्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल होईलच असे नाही. कदाचित त्या व्यक्तीला अजूनही त्या स्थळामध्ये हवी तशी ‘कंप्याटीबीलिटी’ जाणवत नाही आणि त्यामुळे ती व्यक्ती ‘लग्न’ ह्या अंतिम निर्णयावर येऊ शकत नाही.
मग यामध्ये कोणीच कोणावर जबरदस्ती करू नये. मला तू अवडलास/पसंत पडलास/पडलीस म्हणजे लग्न जमले असे होत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपापला वेळ हवा असतो, आणि तो दिला गेला पाहिजे. शेवटी ‘लग्न’ हा आयुष्यभराचा प्रश्न असतो. आयुष्य त्या मुलीचे/मुलाचे असते. त्यामुळे आयुष्यभराचा निर्णय असा तडकाफडकी घेऊन चालत नाही.
तसेच, कुटुंबीय हो म्हणत आहेत/फोर्स करीत आहेत म्हणून देखील मुला-मुलींनी लग्नास तयार होऊ नये. नाहीतर पुन्हा पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते, किंवा आयुष्य देखील बिघडू शकते. आई-वडील नेहमी मुलांसाठी चांगलेच चिंतीत असतात. पण याच बरोबर मुला-मुलींची पसंती खूप गरजेची असते. आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेत असताना, एवढा तर विचार सर्वांनीच केला पाहिजे.
मुली-मुले आज दोघेही कमावते असतात,करिअर करणारे असतात.त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होणे गरजेचे असते. आपण आज बघतो , ‘प्रेम विवाह’ मध्ये घटस्फोटाचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. मग इथे विषय येतो तो , ‘अपेक्षांचा’.काळ बदलतो तशा अपेक्षा बदलत जातात, तसेच पूर्वी पूर्ण केल्या जाणाऱ्या अपेक्षा , लग्नानंतर मग पूर्ण होऊ शकत नाहित, मग पुन्हा कलह, भांडण आणि शेवटी घटस्फोट.
आणि ‘घटस्फोट’ ही अत्यंत वेदनादायी आणि नकारात्मक गोष्ट आहे , जी नात्यांमध्ये, कुटुंबियांमध्ये मोठी उलथापालथ घडवून आणते. तसेच समाजाच्या दृष्टीने देखील ही खूप घातक गोष्ट आहे. म्हणूनच लग्न जुळण्याआधी आपली मते, विचार मांडले गेले पाहिजेत आणि काही बाबतीत त्या वर ठाम देखील राहता आले पाहिजे.
‘लग्न’ नावाची रेशीमगाठ जुळविताना, ‘अपेक्षांचा’ ढीग मांडून देखील चालत नाही. कारण त्या कितीही पूर्ण झाल्या तरी देखील आयुष्यभर कमीच पडतात. ‘जोडीदाराविषयीची’ प्रतिमा मनात पक्की असावी, मात्र अपेक्षांमध्ये थोडा समजूतदारपणा हवाच. आजकाल , मुले-मुली हा समजूतदारपणा दाखवत देखील आहेत. तरी देखील काही ठिकाणी ,’वेल सेटलड मुलगा’ , ‘गोरी , अत्यंत सुंदर मुलगी’ ह्या अशा अपेक्षा सर्रास पाहायला मिळतात.
पण सध्याची परिस्थिती पहिली तर , कितीही शिकले तरी देखील अत्यंत कमी पगारात नोकरी करावी लागते आहे, व्यवसाय म्हटला तर त्यात देखील स्पर्धा, आर्थिक आव्हाने या सगळ्या गोष्टी आहेत. शरीराने सुंदर असणे , ह्या अपेक्षाचा विचार केला तर , शरीर तर वय वाढत जाईल तसे बदलत जात असते. त्यामुळे वर उल्लेखित केलेल्या अपेक्षा आता थोड्या बाजूला ठेवल्या पहिजेत , नाहीतर लग्न होणेच मुश्किल होईल किंवा कदाचित लग्न देखील होणार नाही.
आयुष्यात कोणतीच परिस्थिती, गोष्ट कायमची नसते. आज असणारी आर्थिक बेताची परिस्थिती उद्या अत्यंत चांगली होऊ शकते. तसेच आता असणारी श्रीमंती उद्या मातीमोल देखील होऊ शकते. हे आपल्याला आताच्या ‘कोरोना’ संकटाने दाखवून दिलेच आहे. आणि शारीरिक सुंदरता तर दिवसेंदिवस लोपच पावत असते.
आजकाल मुला-मुलींचे लग्नाचे वय देखील वाढते आहे. काही जणांचे लग्न वर उल्लेख केलेल्या अपेक्षांमुळे वेळेवर होत नाहीत, तर काही जणांचे लग्न ,काही इतर कारणे जसे की वैचारिक मतभिन्नता असणे, जीवनाविषयचा दोघांचा दृष्टिकोन खूप वेगळा असणे आशा काही गोष्टी. पण इथे एक महत्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे , ‘वैचारिक दृष्ट्या एकमेकांना पूरक असणे, एकमेकांशी एकरूप असणे’. सध्याच्या परिस्थितीत ,’विचार जुळणे आणि त्यामुळे एकमेकांना समजून घेता येणे’ हा विचार लग्न जुळविताना सर्वात जास्त महत्वाचा आहे.
म्हणूनच लग्न जुळविताना फक्त वरवरच्या गोष्टी म्हणजे, नोकरी , पैसा, घरदार , संपत्ती , शेती इत्यादी गोष्टी पाहण्यापेक्षा, एकमेकांचा, दोन्ही कुटुंबीयांचा ‘वैचारिक दृष्टिकोन’ विचारात घेतला गेला पाहिजे. मान्य आहे, जगण्यासाठी पैसा हा गरजेचा आहे, पण समजूतदारपणा दोघांकडे असेल तर ‘आर्थिक’ प्रश्न देखील मार्गी लागू शकतात आणि एक सुंदर संसार फुलू शकतो.
‘शून्यातून विश्व’ निर्माण करण्याचा दृष्टिकोन असेल, मेहनत करण्याची तयारी असेल , संयमी वृत्ती असेल आणि कोणत्याही परिस्थितीत एक-मेकांना समजून घेण्याची , एकमेकांची खचून न जाता साथ देण्याची तयारी असेल तर लग्न, संसार यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत.
शेवटी एकच सांगावेसे वाटते, “लग्न आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते, फक्त एकमेकांसाठी समजूतदारपणा दाखवायला हवा. लग्न ही भावनांशी, प्रेमाशी निगडित गोष्ट आहे, पण तरी देखील भावनांचा योग्य तो समतोल साधून सुयोग्य, काही प्रमाणात ‘प्रॅक्टिकल’ निर्णय घेता आला पाहिजे, कारण शेवटी आयुष्यभराचा प्रश्न असतो. आणि आयुष्य सुकर होण्यासाठी हे गरजेचे देखील असते.
सोssss, लग्नाळू मुला-मुलींनो ,बेस्ट ऑफ लक आणि “नांदा सौख्यभरे”!!!!

Online Counseling साठी !
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

