” डबक्याला समुद्र समजून जगायची सवय कधी सुटणार .. “
हेमा यादव कदम I ७८७५५५०७८९
लॉक डाऊन सुरु झाल्यापासून बऱ्याच तरुणांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचनात आल्या .. एखादी व्यक्ती जेव्हा नैराश्याने ग्रासली जाते तेव्हा ती असा काहीतरी निर्णय घेऊन आयुष्यातील प्रश्न संपवण्या ऐवजी आयुष्यच संपवून टाकते .. आयुष्य संपवण्याइतक्या अशा कोणत्या समस्या मोठ्या असतात … मृत्यू पेक्षा मोठी समस्या कोणती असू शकते …. मुळात आपण जिवंत आहोत आणि जगत आहोत यश मिळवण्यासाठी झगडत आहोत.
याचाच अर्थ आपल्याला समस्या येणारच आहेत त्यातून मार्ग काढत आपल्याला ध्येय गाठायचे असते…. या जगात प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते फक्त शोधण्याची तयारी हवी …. आणि यासाठी तुम्ही मानसिक दृष्टया खंबीर असणे आवश्यक आहे .. जसे शरीर जिवंत राहण्यासाठी आणि चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला अन्न वस्त्र आणि निवारा याची गरज असते तसेच “मन खंबीर ठेवण्यासाठी तुम्हाला चांगल्या विचारांची” गरज असते .. तुम्हाला स्वतःच्या बाबतीत सुद्धा तटस्थ भूमिका घेता येणे आवश्यक असते. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही चांगले विचार आचरणात आणायला सुरवात कराल ..
आपल्या कडे प्रचंड प्रमाणात संत साहित्य उपलब्ध आहे. पण आपण कधीतरी ते वाचतो का ? खास करून आजची तरुण पिढी … या पिढीला संतांचे विचार अजून उमगलेलेच नाहीत. ग्रंथ वाचन किंवा अभंग वाचन याना अंधश्रद्धा वाटते. पण कधी खोलात जाऊन तुम्ही त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का ?
प्रत्येक मराठी शाळेत श्री मनाचे श्लोक वाचून घेतले जायचे पण शाळा संपली कि ते वाचन हि आपण संपवून टाकतो. लहान वयात सगळेच अर्थ आपल्याला समजतातच असे नाही. पण मोठे झाल्यानंतर ते समजून घेण्याचा हि प्रयत्न आपण करत नाही. संत साहित्य खूप अगाध ते समजून घ्यायला १०० वर्षाचा एक जन्म अपुरा पडेल खर तर त्यामुळे तुम्ही इतके सर्व काही नका वाचू पण तुम्हाला जर तुमचे मन आणि विचार खंबीर करायचे असतील ना तर फक्त पुन्हा एकदा “श्री मनाचे श्लोक” वाचून खोलात जाऊन समजून घ्या. तुमच्या मनात कधी हि आत्महत्येचा विचार येणार नाही. जगण्याचे सार त्यात दिले आहे.
परदेशातील लेखकांनी आपल्या संतांचे विचार त्यांच्या भाषेत मांडून अब्जावधी कमावले आहेत. आणि आपली मुले कामधंदा नाही म्हणून आत्महत्या करत बसले आहेत.. इतकी कमकुवत मन का आहेत तरुणाईची ? कदाचित मन नाही विचार कमकुवत आहेत. खरं तर मला नेहमी असे वाटते कि , ज्या महाराष्ट्रात मोठे मोठे विचारवंत आणि सुधारक यांनी जन्म घेतला त्या महाराष्ट्रात आत्महत्या व्हायलाच नाही पाहिजे .. पण कुठेतरी आपणच कमी पडतो लोकांना मोटिवेट करायला.
संतांनी ग्रंथ , अभंग , आरत्या , श्लोक , भारूड , कीर्तन अशा वेगवेगळ्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले . त्यांनी नेहमी जातिभेदाला , समाजातील अनिष्ट रूढींना विरोध केला. आणि समाजात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला . त्यांच्या विचारातून प्रवृत्त होऊन समाजसुधारक घडले .. स्वतःसोबत त्यांनी समाजातही आमूलाग्र बदल घडवून आणले. त्याकाळात सोशल मीडिया नव्हते. फक्त लिखाणातून संतांनी आणि सुधारकांनी क्रांती घडवून आणली.
आपल्याला इतके काही करायचे नाही कारण आपल्याला या लोकांनी सर्व काही मिळवून दिले आहे . आपल्याला फक्त स्वतःला सक्षम करायचे आहे. आत्महत्या न करता स्वतःचे कुटुंब फक्त एकच कुटुंब सांभाळायचे आहे. ते हि शक्य होत नाही आपल्याला …. तसे पाहायला गेले तर सुधारित तंद्रज्ञानामुळे आपण क्षणार्धात जगभर पोहचू शकतो. त्याचाही योग्य वापर आपल्याला करता येत नाही. आपल्या कुपमंडु वृत्तीमुळे आपण अयशस्वी ठरतो.
ज्या क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेतले त्या क्षेत्रात जर तुम्हाला यश नाही मिळाले तर दुसरे पर्याय शोधायला हवेत ना ? आपण आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावायला च तयार नाही. डबक्याला समुद्र समजून जगायची सवय कधी सुटणार ..
उदा. आपल्याकडील लोक सोशल मीडिया चांगले कि वाईट यावर सोशल मीडियावरच चर्चासत्र भरवतात खास करून व्हाट्सअप आणि फेसबुक आणि हे ज्यांनी तयार केले ते जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत जाऊन बसले आहेत .. आणि आपण काय करत आहोत .. ?
सर्व तज्ज्ञ लोक म्हणतात “विचार बदला नशीब बदलेल” समस्या संपवण्यासाठी आत्महत्या हा पर्याय कधीच असू शकत नाही . तुमच्या या एका निर्णयाने तुमचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते … लक्षात ठेवा तुमच्या जाण्याने समस्या सुटणार नाही वाढणार आहेत .. मन खंबीर करायचे असेल तर विचार खंबीर करा ..
धन्यवाद.

Online Counseling साठी !
लेख कसा वाटला नक्की सांगा. तसेच आपल्यालाही लिखाणाची आवड असल्यास आणि ते लिखाण साहित्य ‘आपलं मानसशास्त्र’ च्या संकेतस्थळावर प्रकाशित व्हावे असे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com या जीमेल आयडीवर मेल करा.
तुम्ही पाठवत असलेले लिखाण साहित्य यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर प्रकाशित झालेले नसावे. लिखाणाची फर्स्ट कॉपी च आपल्याला मेल करायची आहे. योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील.

