काही गोष्टी आपण आपल्या वागण्यामुळे गमावतो.
मिनल वरपे
आज मी खूप प्रयत्न करून सुंदर रांगोळी काढली अगदी दोन तास लागले त्यासाठी.. पण काही वेळातच शेजारच्या लहान मुलाने एका क्षणाचाही वेळ न लावता ती रांगोळी अगदी सहज पुसली… खूप वाईट वाटलं..डोळ्यातून चटकन पाणी आले..
बघाना रांगोळी तर अगदी क्षुल्लक गोष्ट आहे जी पुन्हा नव्याने काढता येते पण…
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना ज्या आपल्याला पुन्हा बदलता येत नाहीत आणि त्यांचे ओरखडे मात्र कायमचे राहून जातात…
कोणतेही नाते असो मग ती रक्ताची असो, मानलेली असो वा मैत्रीचे पण ही नाती तयार व्हायला किंवा जुळवायला खूप वेळ लागतो मात्र तीच नाती क्षणार्धात तुटायला वेळ लागत नाही.आणि कायमची मनात कटुता निर्माण होते.
तसेच नोकरी असो किंवा शिक्षण… आपली प्रतिष्ठा असो अथवा आपल कर्तुत्व… कोणतीही गोष्ट सहज निर्माण होत नाही त्यासाठी लागणारे कष्ट, प्रयत्न, वेळ हे सुद्धा तितके सोपे नसतात.पण तेच नष्ट व्हायला एक क्षण सुद्धा पुरेसा ठरतो. पण हे सगळं घडायला कारणीभूत काही गोष्टी आहेत त्या म्हणजे..
राग : आपला राग हा आपल्या नुकसान करतो. कोणतीही गोष्ट घडली किंवा घडत असताना आपल्याला राग आला की आपल्याकडे अजिबात सहनशक्ती राहत नाही आणि आपण होत्याच नव्हत करायला कमी पडत नाहीत म्हणून आपल्या रागाला योग्य तिथेच वापरायचं पण त्या रागाचा दुष्परिणाम होणार नाही याची काळजी आपणच घ्यावी.
मीपणा : मी हे केलं, मी ते केलं, मी आहे म्हणून सगळं आहे, माझी इतकी ओळख, माझंच खर, माझं कोणाशिवाय अडत नाही,मला कोणाची गरज नाही आणि माझंच सगळं… अशा आपल्या मीपणाच्या स्वभावामुळे आपण बहुतेक गोष्टी, माणसं गमावतो आणि शेवटी एकटे पडतो.
उद्धटपणा: कुठेही वागताना बोलताना आपल्यातील नम्रता समोरच्याच मन वळवून घेते पण तेच जर आपण उद्धपणे वागलो किंवा बोललो तर सगळ्यांच्या मनात आपल्या बद्दल कायम तिरस्कार निर्माण होतो.त्यामुळे कायम नम्रतेची भूमिका घेतली तर माणसं जोडली जातील.
म्हणतात ना वेळ लागतो तो सृजनाला कारण विसर्जनाला वेळ लागत नाही…म्हणून जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी काही गोष्टींचे भान असणे कायम गरजेचे आहे.
नव्याने सगळं मिळवता येते, उभारता येते पण तोच आनंद तोच उत्साह आणि तेवढाच जिव्हाळा असेल याची खात्री नाही.कारण काही गोष्टी आपण आपल्या वागण्यामुळे गमावतो आणि त्याचा त्रास आपल्यालाच होतो.
म्हणूनच जे आहे ते सांभाळावं, जपावं आणि टिकवाव कारण Delete जितकं लवकर होते तेवढ्या लवकर Download होत नाही.


