Skip to content

आपल्या आयुष्यात हसत राहण्याचे फायदे !!

आपल्या आयुष्यात हसत राहण्याचे फायदे !!


मनिषा चौधरी I 9359960429

नाशिक


तुम इतना जो मुस्कुरा रहे हो,
क्या गम है ,जिसको छिपा रहे हो.

खळखळून हास्यामागे काहीतरी दुःख किंवा सल दडलेलं असते , असे म्हटले जात असले तरीही हास्य हे ताण- तणाव निवळण्यावरील प्रभावी औषध आहे.

सध्याचे वातावरण हे आजार, संसर्ग,औषधांचा तुटवडा, प्राणवायूची कमतरता, रोजगार, बेकारी,आप्तांचे गमावणे यामुळे मानव नखशिखांत हादरलेला आहे. तरीहि हे ही दिवस जातील म्हणत, स्वतः ला व इतरांना बळ देत जगण्याची धडपड सुरुच आहे. कुठल्याही बदलाने निसर्गचक्र थांबत नाही, तसेच ते आताही सुरुच आहे. हरवत चाललाय तो आनंद, हास्य.

शाळा बंद, दुकाने बंद, कामे बंद यामुळे हास्य बंद ठेवून कसे चालेल? प्रत्येकाला आपले हास्य पुन्हा गवसावेच लागेल. कारण हास्य ही एक नैसर्गिक भावना आहे. हास्य म्हणजे निरपेक्ष आनंद . त्याशिवाय जगण्याची कल्पनाच न केलेली बरी.

हास्य ही मानवाला लाभलेली देणगी आहे. खळखळून हसता येणे हे सुदैवी माणसाचे जिवंतपणाचे लक्षण आहे. हास्याची स्वतः ची एक भाषा असते. जगातील कोणत्याही कान्याकोपर्यात एका स्मितहास्याने तुम्ही कुणाशीही सहज मैत्री करु शकता.

हास्याचे विविध प्रकार आहेत. स्मितहास्य, खळखळून हसणे, मंद हास्य, गडगडाटी हास्य. प्रत्येक हास्याची तर्हा वेगळी असली तरी परिणाम हा एकच असतो तो म्हणजे तणावमुक्ती.

लहान बाळाचे खदखदने असो की, एखाद्या ललनेचे मंद हसणे असो, हसरा चेहरा आपला वेगळा प्रभाव समोरच्या व्यक्ती वर पाडतोचं.

आजच्या काळात मनमोकळे हसू शकणारे खरेतर नशीबवानच म्हणायला हवे. अगदी न कळत्या वयापासून ते आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत माणसाच्या अपेक्षा या कधीहि न संपणार्या अशाच आहेत. त्या हव्यासापोटी तणाव जणू प्रत्येकाला बोनस मिळाला आहे.

अभ्यास, मार्क्स, स्पर्धा , नोकरी , घर, गाडी प्रसिद्धी , हि यादी न संपणारी आहे. यात भरडताना हसणचं हरवून बसलोय आपण. लहानपणी खळखळून हसणारी मुले मोठेपणी जणू हसणं विसरतात की काय?

हसणं गमावलेल्यांना अनेक व्याधींचा सामना करावा लागतो. पुन्हा ते मिळवण्यासाठी हास्यक्लब जाँईन करुन उसने अवसान आणून गडगडाटी हसू मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.

त्यापेक्षा आयुष्यातील या मौल्यवान हास्याला आपण वेळीच गोळा करुन आपल्या सवयीच्या कप्प्यात आग्रक्रमावर ठेवायला हवे. दिवसभराच्या अनेक नित्याच्या सवयीत या खळखळून हसण्याला प्राधान्य द्यायला हवे.

हास्यामुळे शरीराला उर्जा मिळते. नैराश्य, ताण कमी होण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हास्यामुळे चेहरा टवटवीत रहातो. मनात सकारात्मक विचार येतात. हास्यामुळे मैत्रीपूर्ण संबध निर्माण होतात. हसणारी व्यक्ती आपल्या भोवतालच्या वातावरण उत्साहपूर्ण बनवते.

पूर्वी लाईट गेली किंवा रात्री च्या जेवणानंतर कुटुंबात , शेजारीपाजारी गप्पांच्या मैफीली जमत. चुटकुले, गमती सांगण्याची चढाओढ लागायची. हास्यांचे कारंजे फुलायचे. अगदी पोटदुखेपर्यंत लोळून हसणे व्हायचे.

परंतु स्पर्धात्मक युगामुळे व समाजमाध्यमांच्या आभासी दुनियेमुळे माणसाचे तणावग्रस्त जगणे वाढले आहे. अगदी लहान मुळे ही त्याला अपवाद नाहीत. वाढते नैराश्य चिंताजनक विषय झालाय.

हास्य हरवलेला माणूस तणावमुक्त जगणं विसरत चाललाय. त्यामुळे हास्य कमावणे व ते टिकवणे हे सुद्धा आनंदि जीवनासाठी महत्त्वाचे आहे. मे महिन्याचा पहिला रविवार “जागतिक हास्य दिन” या निमित्ताने प्रत्येकाने आपले हास्य जपण्याचा संकल्प करुन तो टिकवायला हवा.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपल्या आयुष्यात हसत राहण्याचे फायदे !!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!