Skip to content

घरातील समस्यांना कंटाळलेले असाल, तर हे करून पहा !!

घराबाहेर उंबरठ्यापलीकडे, प्रगतीच्या नवयुगाकडे


सौ. माधुरी पळणिटकर


घरात पती, मुलं आणि नातेवाईकांसाठी वेळ खर्ची घालणं ही आपल्या सुखी संसाराची आवश्यक प्राथमिकता असली तरी आपल्या अंगभूत कलागुणांना व ध्येयाला विकसित करण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर पाऊल टाकावंच लागतं. हे ओळखून घरात आणि घराबाहेरही आपलं व्यक्तिमत्व फुलविण्याचा प्रयत्न करा. कर्तृत्ववान स्त्रीचा संसार केवळ घरापुरताच मर्यादित नसतो हे लक्षात ठेवा.

समाजात अशा कितीतरी स्त्रिया आहेत, की ज्यांनी स्वत:ला घराच्या उंबरठ्याच्या आत कैद करून घेतलं आहे. पती, मुलं आणि घराची जबाबदारी पार पाडताना त्या कदाचित हेदेखील विसरून जातात की घराच्या उंबरठ्याबाहेरही मोठं जग आहे.

समंजस आणि कार्यक्षम स्त्री आपल्या घरात जर उत्तमरित्या गृहिणीची भूमिका बजावत असेल, तर ती बाहेरील जगातही यशस्वी होऊ शकते. स्त्रीने धाडसी आणि हुशार असणं वाईट गोष्ट नाही. फक्त या गुणांचा उपयोग योग्य रितीने केला गेला पाहिजे. जर तुमच्यामध्ये समाजाला देण्याची काही योग्यता आणि क्षमता असेल, तर ती लपविण्याची काही आवश्यकता नाही. उलट त्याचं उघडपणे प्रदर्शन करायला हवं.

समाजहिताच्या दृष्टीने तुमची प्रतिमा त्यांच्यापर्यंत पोहोचणं अधिक उचित ठरेल. फक्त उंबरठ्याच्या आत स्वत:ला जखडून घेऊन निराशा आणि दु:खाशिवाय काहीच पदरात पडणार नाही.

आपल्या प्रतिभेचं योग्य मूल्यमापन करा. जर तुमच्यामध्ये एखादं कौशल्य असेल, तर ते दुसर्‍यांपासून न लपविता समाजासाठी त्याचा उपयोग होऊ दे, जेणेकरून तुमच्या बुध्दिमत्तेचा फायदा इतरांनाही होईल. तुमच्या प्रतिभाशाली व्यक्ति-मत्त्वाचा योग्य उपयोग करा. तुमच्या प्रतिभेचा उपयोग करा. ती निरर्थक घालवू नका. तुमच्या प्रतिभेचा उपयोग समाजाच्या हितासाठी न केल्यास, समाजाच्या उन्नतीसाठी तुमचा हातभार कसा काय लागणार?

तुम्ही एकदा घराबाहेर पडून तर पहा, एवढ्या मोठ्या जगात तुमच्यासाठी कितीतरी संधी उपलब्ध आहेत. जणू त्या तुमची वाट पाहत आहेत असं तुम्हाला वाटेल. साधं-सरळ गणित आहे की तुम्ही जर आपलं कौशल्य दाखवून दिलं नाहीत तर ते दुसर्‍याला कसं काय कळणार? आपल्याकडे अशी काही जादूची कांडी नाही की जी तुमच्या गुणांचं वर्णन लोकांपर्यंत पोहोचवू शकेल.

तुम्हाला नवीन काही शिकण्याची इच्छा असेल तर शिकण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते. तुम्ही कोणत्याही वयात शिकू शकता. आपल्याला कोणत्या गोष्टीची आवड आहे, हे आधी मनाशी पक्कं ठरवा आणि मग ते शिकण्यासाठी घराबाहेर पडा. असं केल्याने तुमच्या मनाला केवळ शांतीच नाही, तर काही क्षण घराबाहेर पडल्यामुळे व बाहेरील लोकांशी संबंध आल्यामुळे तुमचा आत्मविश्‍वासही वाढेल.

नवीन ज्ञानाची तुमच्या बुध्दिमत्तेत भर पडेल आणि तुमच्या मनाला आलेेली मरगळ दूर होईल. अशा व्यक्तीच्या अंतर्मनात काहीतरी नवीन करण्याची उमेद निर्माण झाली की त्याचा आत्मविश्‍वास आपोआप वाढतो आणि त्याला जीवनात स्वारस्य वाटू लागतं.

आमचं म्हणणं असं नाही की उंबरठ्याच्या आतील जीवन हे निरर्थक असून तुम्ही त्याचा अव्हेर करून फक्त समाजामध्येच आपलं स्थान मजबूत निर्माण करावं. आम्हाला असंही म्हणायचं नाही की, घरातील समस्यांना कंटाळून थोडावेळ घराबाहेर पडा म्हणजे तुम्हाला विश्रांती मिळेल. उलट, संसारात काही समस्या निर्माण झाल्या तर त्यांचं निवारण करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला आपलं स्थान घरात आणि घराबाहेरही निश्‍चित करायला हवं.

आई, पत्नी आणि स्वत:चं करिअर या तिन्हींचा ताळमेळ बसविणं आवश्यक आहे. हे तुमचं कर्तव्य यशस्वीरित्या पार पाडल्यास नक्कीच तुमच्या मनाला समाधान मिळेल. तुमच्यातील आत्मविश्‍वास अधिक दृढ होईल. समाजातील अधिकाधिक स्त्रिया या आपली योग्यता लक्षात न घेता स्वत:ला घराच्या चार भिंतीत कैद करून घेतात आणि आपण घरामध्ये राहणं अधिक योग्य ठरेल, अशी स्वत:ची समजूत करून घेतात किंवा आपल्या नशिबी घरातच राहणं आहे, असा गैरसमज करून घेऊन घराबाहेर पडण्यास तयार नसतात.

पण जोपर्यंत तुमच्या मनात काही करून दाखवि-ण्याची उत्कंठा निर्माण होत नाही, तोपर्यंत तुमची प्रतिभा चूल आणि मूल या चौकटीतच सीमित राहील. मग घरात राहणंच बरं असा स्वत:च्या मनाला खोटा दिलासा देत रहाल.

लग्नानंतर लिहिण्या, वाचण्याकडे दुर्लक्ष न करता नियमित वर्तमानपत्रं व मासिकं वाचा, जेणेकरून तुमच्या बुध्दिमत्तेला चालना मिळेल आणि तुमची बौध्दिक क्षमता वाढेल. लग्न झाल्यानंतर घर, पती व मुलांसाठी तुम्ही आपल्या इच्छा, आकांक्षांना मूठमाती देता आणि बाहेरील जगापासून अलिप्त राहता. पण यामुळेच समाजात तुम्हाला काहीच किंमत मिळत नाही आणि लोक तुमची चेष्टा करतात.

यासाठीच आपण आपल्या बुध्दिमत्तेचा योग्य वापर करून घेतला पाहिजे. आपल्या बुध्दिचा योग्य वापर केला नाही तर बुध्दिला गंज चढण्यास वेळ लागत नाही. तुमची जर आधुनिक स्त्री बनण्याची इच्छा असेल तर केवळ संसारात मग्न न राहता आपल्या वैयक्तिक जीवनाकडेही लक्ष द्या आणि आपलं इप्सित पूर्ण करा.

सुखी संसारासाठी पती-पत्नीमधील संबंधसुध्दा सुदृढ असावेत. पण हे केवळ एकतर्फी नसावं. यासाठी आपण आपली आवड, योग्यता आणि अस्तित्व पणाला लावू नये. यात शंका नाही की, स्त्रीला आपलं स्थान आणि स्वत:ची क्षमता सिध्द करून दाखविण्यासाठी लोकांना ओरडून सांगावं लागतं. पुरुषांप्रमाणे सहजरित्या तिची कोणीही दखल घेत नाही.

तिच्याकडून प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण मागितलं जातं आणि पदोपदी स्वत:ची प्रतिभा सिध्द करावी लागते. पण अशा वेळेस आपण आपल्या ध्येयासाठी ठाम राहून समाजातील विभिन्न घटकांविरुध्द झगडण्याची तयारी ठेवावी. तुमच्यावर अधिक जबाबदार्‍या सोपविल्या तर विचलित होऊ नका. प्रत्येक संकटाला निकराने समोरे जा.

घराबाहेर पडल्यास अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल. म्हणून घरात राहणं बरं, असा विचार मनातसुध्दा आणू नका. एकदा स्वत:ची योग्यता सिध्द करून दाखवा आणि मग पहा तुमच्या जीवनात कसं

नवचैतन्य निर्माण होईल. पुढे व्हा, कारण घराच्या उंबरठ्याबाहेरचं जग तुमच्या स्वागता-साठी सज्ज आहे.

 



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “घरातील समस्यांना कंटाळलेले असाल, तर हे करून पहा !!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!