चुकांमधून धडा घेऊया आणि पुढे चालत राहूया..
चुका या जीवनाचा एक भाग आहे. प्रत्येकाकडून चुका होत असतात. काही वेळा त्या मोठ्या असतात, तर काही वेळा त्या अतिशय छोट्या असतात. अनेकदा चुकांमधून आपल्या जीवनाची दिशा बदलून जाते. काही वेळा अगदी छोट्या चुका देखील आपल्याला मोठा धडा शिकवून जातात. असे धडे आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात.
परंतु सगळी कामे सोडून केवळ चुकांची उजळणी करत बसणे योग्य ठरत नाही. नुसतेच बसून भूतकाळातील चुकांवर विचार करण्यातून काहीही साध्य होत नाही.
स्वतःला माफ करून पुढे जाण्यात काहीच गैर नाही. असे केवळ तुमच्या बाबतीतच घडते असे नव्हे. अशा प्रकारच्या घटना प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतात. व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनातही लोकांकडून चुका होत असतात. त्या चुकांमधून योग्य बोध घेऊन पुढे जाणारे यशस्वी ठरतात.
कारण जीवन जगण्याचा चांगला मार्ग म्हणजे पुढे जात राहणे. चुका तर प्रत्येकाकडूनच होत असतात, पण म्हणून तिथेच अडखळून पडणे योग्य नाही. चुकांमधून धडा घेऊन प्रत्येकजण उभा राहतो आणि पुढे चालू लागतो. सतत पुढे जात राहणे यालाच तर जीवन असे म्हटले जाते.
जीवन म्हणजे सतत पुढे जात राहणे. या वाटेवर काही वेळा खाचखळगे येतात. कधी तीव्र उतार तर कधी दमवणारा चढ येतो, पण काही त्यामुळे जीवन थांबत नसते. ते पुढे चालत राहते. या वाटचालीत प्रत्येकाकडून चुका घडतात ही वस्तुस्थिती आपण मान्य करणे गरजेची असते. भूतकाळातील चुका विसरून पुढे चालत राहणे यालाच जीवन असे म्हणतात.
स्वतःला त्रास करून घेऊ नका.
चूक घडते तेव्हा तुम्हाला त्या घटनेचा प्रत्यक्ष अनुभव मिळालेला असतो. त्याचा सतत विचार करत राहिलात तर तुमच्या हातून दुसरे काही घडत नाही. उगाचच त्यातील बारकाव्यांचा आणि तपशिलाचा विचार करत राहिल्यामुळे मनात वेगवेगळ्या भावना तयार होतात.
त्यातून दुःख आणि त्रास होतो. त्यामुळे उगाचच स्वतःला त्रास करत बसू नका. त्यामुळे या त्रासातून स्वतःला मुक्त करून घ्या.
घडलेल्या घटनेत बदल करता येत नाही.
घटना घडून गेल्यानंतर त्यामुळे होणारे नुकसान टाळता येणारे नसते. फार तर त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. झालेल्या घटनेत कोणताही बदल करणे शक्यच नसते. घडायचे ते घडून गेलेले असते.
आता त्यामध्ये बदल करता येणार नसतो. त्यात सुधारणा किंवा दुरुस्ती करता येणार नसते. मग उगाच अनुत्पादक आणि बदलता न येणाऱ्या गोष्टींवर आपली शक्ती का खर्च करत बसायची.
घटनेच्या नाकारात्मकतेचा परिणाम भविष्यावर होतो.
भूतकाळातील चुकांच्या वाईट लहरी आपण सांभाळत बसलो तर आठवणी काढत बसलो तर त्याचा आपल्या सध्याच्या मूडवर परिणाम होतो. त्यातून तुमची कार्यक्षमता कमी होते. आपल्या सगळ्या कामावर, आवडींवर त्याचा परिणाम होतो. त्याचा भविष्यावरही परिणाम होतो.
आपण काय धडा शिकतो ?
आपल्या हातून ज्या चुका घडतात त्या चुका आपल्याला धडा शिकवत असतात. आपले कुठे चुकले याची जाणीव होते. तेव्हा आपल्याला काय धडा मिळाला, तो घेऊन पुढे चालायला लागा.
आता आपल्या हातून पुन्हा ती चूक होणार नाही, याची काळजी घ्यायची असते. मग चुकांबाबत दक्ष राहून काम केल्याने तुम्ही यशाच्या मार्गावर चालू लागता.
जेव्हा परिस्थिती पाहून योग्य त्या दुरुस्त्या करत पुढे चालत राहण्याची भूमिका तुम्ही घेता तेव्हा भविष्यात चांगले घडणार असल्याची चाहूल लागते.
आता तुमचा फोकस शिफ्ट झालेला असतो.
तुम्ही भूतकाळातील चुकांमधून बाहेर पडता तेव्हा पुढे जाऊन आता भविष्याचे नियोजन करायचे असते. सतत मागे काय घडले, याचा विचार करत बसण्यापेक्षा पुढे जाण्याचा विचार करा. तुम्ही जेव्हा मागचे विसरून पुढे जाता तेव्हा तुमचा फोकस शिफ्ट होतो आणि आयुष्यात नव्याने काय करायचे याच्या तयारीला तुम्ही लागता.
सौजन्य – संध्यानंद


