Skip to content

स्वतःची स्वतःबरोबरची साथ कधीच सोडू नका, स्वतःला कधीच अलविदा म्हणू नका !!

स्वतःला कधीच अलविदा म्हणू नका !!


मेराज बागवान Ι 7397983505


आपण समाजात वावरतो, अनेक माणसं जोडतो. नवनवीन नाती, मैत्री निर्माण होते. संवाद साधला जातो. आणि आयुष्य हे असेच पुढे जात राहते. परंतु, हे कुठपर्यंत? आपण एक-मेकांशी बोलतो. नाती अगदी घट्ट होतात, मने जुळतात. काही जणांची तर आपल्याला सवयच होऊन जाते.

पण या मध्ये, आपण ‘स्वतः’ असतो का ? असतो , तर आपण स्वतःला, स्वतःची एक ‘स्पेस’ देतो का? जितके इतरांशी एकरूप होतो, तितके स्वतःशी एकरूप होतो का? बाकी सर्वांशी, गप्पा गोष्टी करतो, सोशल मीडिया वर ‘चॅटिंग’ करतो , तसेच स्वतःशी कधी बोलतो का? खरेच या वर आज विचार करण्याची गरज आहे.

एक माणूस म्हणून , आपल्याला प्रत्येकाला भावना असतात. आपण त्या व्यक्त देखील करतो, पण ते मात्र इतरांसाठीच. स्वतःला स्वतःबद्दल काय वाटते, हे कधी विचारतो का? आयुष्यात मला काय करायचे आहे, माझा जगण्याचा उद्देश काय आहे हे जणू कित्येकदा आपण विसरूनच जातो. आणि एखादया, यंत्रप्रमाणे आयुष्य जगू लागतो. हेच आपले आयुष्य, हेच माझं नशीब हे मनाशी जणू पक्केच करून टाकतो.

पण हे कुठे तरी थांबवले पाहिजे. हे खरे आहे की समाजाच्या प्रति, कुटुंबियांच्या प्रती, आपल्या काही जबाबदाऱ्या असतात आणि त्या आपल्याला पार पाडाव्याच लागतात. काही माणसे असतात देखील जी स्वतःची स्वतःशी ओळख करून घेतात आणि इतरांसाठी देखील झटत असतात. म्हणूच स्वतःला आधी ओळखले पाहिजे.

मी कोण आहे? मला आयुष्यात काय करायचे आहे हे मनाशी पक्के केले गेले पाहिजे. प्रत्येक वेळी कोणी आपल्या बरोबर असलेच असे नाही. किंबहुना, माणूस ह्या पृथ्वीवर एकटाच येतो आणि एकटाच जातो. म्हणून स्वतःच्या ‘सहवासाबरोबर’ जगता आले पाहिजे. स्वतःच स्वतःचा एक चांगला मित्र/ मैत्रीण बनून राहता आले पहिजे.

आजकाल ‘सोशल मीडिया’ चा अतिरेक होतो आहे. यातून अनेकदा ‘भावनिक गुंता’ वाढतो आहे. जसे की, ‘मी तिला किती मेसेज केले,पण तिने इकही रिप्लाय केला नाही’, ‘मी त्याच्यासाठी इतके छान स्टेटस ठेवले, पण त्याने शेवटपर्यंत पाहिलेच नाही’ असे काहीसे.जवळच्या व्यक्तीबाबत भावनिक असणे साहजिक असते, पण जवळची व्यक्ती असली तरीही तिला स्वतःचे असे काही प्रधान्यक्रम असतात, स्वतःचे एक खाजगी आयुष्य हे असतेच. आणि आपण हे विसरून जातो, आणि थोडा समजूतदारपणा दाखवण्यात कमी पडतो.

या उदाहरणावरून, एक गोष्ट सांगावीशी वाटते, स्वतःच स्वतःचा ‘प्राधान्यक्रम’ बना, म्हणजे कुणाकडून कधी अशा वायफळ अपेक्षा राहणार नाहीत.अपेक्षा ह्या स्वतः कडूनच ठेवा, इतरांकडून नाही.स्वतःला नेहमी बजावत राहा, “मी मला अमुक ह्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे”. स्वतःच स्वतःवर विश्वास ठेवा.

आयुष्यात ‘प्रेम’ ही अशी गोष्ट आहे, जी दिल्याने वाढते. म्हणूनच स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःशी एकरूप व्हा. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. स्वतःला समजून घ्या, ओळखा. स्वतःचा विकास करण्यात आयुष्य व्यतीत करा. म्हणजे कोणाकडून कसलीच तक्रार राहणार नाही. एकदा का स्वतःशी जुळून राहायला शिकलात की इतरांसाठी देखील खऱ्या अर्थाने जगायला शिकू लागाल.

फक्त, इतरांसाठी जगत असताना, स्वतःला हरवू देऊ नका. नाहीतर, स्वतःच आयुष्यच विसरून जाल. विधात्याने प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र अस्तित्व दिले आहे, प्रत्येकजण ‘युनिक’ ,एकमेव आहे, त्याचा आदर करा. म्हणजे आयुष्य सार्थकी लागेल.

बऱ्याच वेळा , काही जणांच्या बाबतीत असे होते की, “मी तुझ्यासाठी किती करते/ करतो, पण तुला त्याचे काहीच नाही, कौतुक नाही” . पण जेव्हा असे म्हणले जाते, तेव्हाच आपण स्वतःला कमी लेखतो, आणि जणू एक प्रकाराची ‘सहानुभूतीच’ समोरच्याकडून अपेक्षीतो. हे कुठे तरी थांबविले पाहिजे. स्वतःवर लक्ष केंद्रित केले, तर असे विचार च मनात येणार नाहीत.

इतरांचे कौतुक जरूर करा, इतरांना पाठिंबा द्या, पण या बरोबर स्वतःसाठी देखील जगा. एकदा का स्वतःशी ओळख झाली की , इतरांसाठी जगणे सोपे होऊन जाईल आणि मनावर कोणतेच दडपण राहणार नाही.

प्रत्येकाला स्वतःचा असा एक वेळ हवा असतो. म्हणून जर का कधी कोणी, स्वतःमध्ये व्यस्त असेल तर त्या व्यक्तीला वारंवार ‘डिस्टर्ब’ करू नका. उलट, आनंदी व्हा की ती व्यक्ती स्वतःसाठी वेळ काढत आहे. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान काही वेळ स्वतःसाठी दिलाच पाहिजे.

‘अमुक एका व्यक्तीवर फक्त माझाच हक्क आहे’, ही मानसिकता मोडून काढली पाहिजे. आणि हे तेव्हाच साध्य होईल जेव्हा आपण स्वतःवर प्रथम प्रेम करू लागू, स्वतःचा सहवास ‘एन्जॉय’ करू लागू.

ह्या जगात, फक्त दोन च गोष्टी आपल्यासोबत कायम, शेवटपर्यंत असतात, त्या म्हणजे आपले ‘शरीर’ आणि ‘मन’ . बाकी कोणीच आपल्यासोबत कायमचे नसते. म्हणूनच स्वतःच्या शरीराची काळजी घ्या, स्वतःच्या मनाला जपा, स्वतःला काय हवे-नको ते पाहा. आणि हे करू शकलात तर आणि तरच इतरांची काळजी घेऊ शकाल.

प्रत्येक व्यक्ति ‘स्वतंत्र’ आहे. याचा आदर करा. स्वतःबरोबर नेहमी राहा, स्वतःची स्वतःबरोबरची साथ कधीच सोडू नका. ते म्हणतात ना, ‘कभी अलविदा ना कहना’ असेच काहीसे जगा. मग पाहा, आत्मिक शांती चा अनुभव घेऊ शकाल आणि आयुष्य आणखीन सकारात्मकरित्या जगू शकाल.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “स्वतःची स्वतःबरोबरची साथ कधीच सोडू नका, स्वतःला कधीच अलविदा म्हणू नका !!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!