आनंदाचा शोध घेणे संपवा !!
टीम आपलं मानसशास्त्र
एखादी व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल आणि मग मी आनंदी होईल, काही दिवसात माझी कामामध्ये बढती होईल आणि मी इतरांपेक्षा आनंदी असेन, फ्लॅटमध्ये राहायला गेलो कि मी मनापासून आनंदी असेल, आता मला लाख रुपये मिळतील आणि मी आनंदी होईल वगैरे वगैरे.
आनंद मिळविण्यासाठी आपण ज्याच्या शोधात असतो ते मिळाल्यानंतर सुद्धा आपण आनंदी असू याची काहीच शाश्वती देता येत नाही. एखाद्या शाळकरी मुलाला असे वाटत असते कि तो माध्यमिक शाळेत गेला कि त्याला जास्त आनंद होईल.
तसेच माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलाला वाटत असते कि तू कॉलेजमध्ये गेला कि त्याला सगळ्यात जास्त आनंद मिळेल. आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलाला वाटते कि नोकरी लागल्यावर तो आनंद घेऊ शकेल.
नोकरी करणाऱ्या तरुणांना वाटते कि लग्न झाले कि त्यांचा आनंदी प्रवास सुरु होईल. तसेच लग्न झालेल्यांना वाटते कि एखादे मुलं झाले कि तिकडून आनंदाची सुरुवात नक्की होईल. ज्यांना मुलं आहेत त्यांना तुम्ही विचारा कि तुम्ही नक्की आनंदी आहात का ?
त्यांना विचारण्याआधीच तुम्हाला सुद्धा एखादे मुल असल्यास या प्रश्नाची सुरुवात स्वतःपासून करा. कदाचित मुलांचं शिक्षण जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि मुले चांगल्या नोकरीवर लागत नाही, महत्वाचे म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्याचा योग्य जोडीदार मिळत नाही तोपर्यंत आम्हाला कसे आनंदी होता येईल, असेच काहीसे आपले उत्तर असेल.
म्हणजेच हे वर्तुळ अखंडितपणे आधीही सुरु होतं आणि आताही ते सुरूच आहे. केवळ आधीपेक्षा सध्याचं धकाधकीचं जीवन पाहता त्याची झळ जरा जास्तच तीक्ष्ण आहे.
भरपूर पैसे कमावून जी लोकं निवृत्त झाली आहेत, त्यांना तुम्ही एकदा हा प्रश्न जरूर विचारा कि, निवृत्तीनंतर खरंच तुम्ही समाधानी आहात का ? ते त्यांचे जुने लहानपणीचे अनुभव सांगत बसतील. पण ज्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याची ते आतुरतेने वाट पाहत होते, त्याबद्दल ते चकार शब्दही काढणार नाहीत.
म्हणजेच एक ठराविक वय ओलांडल्यानंतर लहानपणीचा काळच म्हणजे शाळा, कॉलेज इत्यादी आनंद देणारा होता असा साक्षात्कार आपल्याला होत जातो. आणि जोपर्यंत आपल्याकडे नसलेल्या गोष्टी आपल्याला मिळत नाही तोपर्यंत त्या गोष्टी मिळाल्या किंवा त्या गोष्टी आल्यानंतर आपण आनंदी होऊ असे वाटत राहते.
लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंत आनंदाबद्दल हि जी काही अस्थिरता आहे, यामध्ये आपण आनंदाचा शोध घेत आलेलो आहे. सगळं आयुष्य भविष्यात कधीतरी मिळणाऱ्या आनंदाची तयारी करण्यातच निघून जाते. हे म्हणजे असे झाले कि सगळी रात्र अंथरून नीट घालण्यातच गेली आणि झोपायला वेळच नाही.
मग आनंद नक्की आहे तरी कुठे ?
तर आनंद हा वर्तमानात आहे. तुमच्यात-आमच्यात साऱ्यात आहे. सध्याच्या परिस्थीतीमधल्या ऊर्जेत तो सामावलेला आहे. वास्तवात आहे. तो गेलेल्या क्षणांत एक आठवण म्हणून जरी उभा राहिला तरी त्यामागे हवंस आणि पच्छाताप खूप आहे. तो भविष्यात सुद्धा नाही, म्हणजे हे मिळेल, तो येईल, हा जाईल यात सुद्धा तो अजिबात नाही.
कारण हा आनंद आस लावतो आणि वर्तमानातली परिस्थिती स्वीकारण्याची क्षमता कमी करतो. आयुष्याकडे पाहण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे काहीतरी विशिष्ट ध्येय साध्य केल्यानंतर मी आनंदी होईल आणि दुसरे म्हणजे असे म्हणणे कि, काही झालं तरी मी आनंदीच आहे. आपल्याला कोणत्या प्रकारचे आयुष्य जगायचे आहे, ते आपण ठरवावे.
तुमच्या अवतीभवती सध्याच्या काळात जे काही घडतंय त्यात ८०% आनंद आहे आणि २०% दुःख आहे असे समजावे. पण आपण २०% लाच जखडून बसतो आणि त्याचे २००% करतो. हे आपण मुद्दाम करत नसून तर ते आपोआपच होते.
या जगात सगळे काही नेहमीच अगदी अचूक असू शकत नाही. अगदी उदात्त भावनेने, उत्तम, श्रेष्ठ अशा कृतीत सुद्धा काही त्रुटी असतात. ते अगदी साहजिकच आहे.
दुर्दैवाने आपल्या मनाची वृत्ती अशी असते कि त्या त्रुटींनाच पकडायचे आणि घट्ट धरून ठेवायचे आणि या सगळ्यात आपले मनःस्वास्थ्य बिघडून ठेवायचे.
म्हणून आपण जे आनंद शोधत आहोत, त्यात तो मुळीच वसत नाही.



लेख खुप सुंदर आहे