Skip to content

कष्टाला पर्याय नसतो आणि यशाला शॉर्टकट नसतो…

कष्टाला पर्याय नसतो आणि यशाला शॉर्टकट नसतो…


मिनल वरपे


हल्ली सकाळपासून ते रात्रीपर्यंत कधीही बातम्या पाहिल्या की एक बातमी तर हमखास पाहायला मिळते ती म्हणजे एका विद्यार्थ्याने परीक्षेत नापास झाल्यामुळे आत्महत्या केली, कमी गुण मिळाल्याने घरच्यांनी बडबड केली म्हणून एका विद्यार्थ्याने तणावात ट्रेन खाली जीव दिला, करिअर निवडताना चूक केल्यामुळे जे क्षेत्र आता निवडलं आहे त्यामधे यश मिळत नाही म्हणून एका विद्यार्थ्याने जीव दिला अशा भयंकर पण राग निर्माण करणाऱ्या बातम्या आपण रोजच पाहतो, ऐकतो.

खरचं इतकं सोप्पं आहे का आयुष्य संपवणे..????

मुळात जे आयुष्य एक उत्तम व्यक्ती म्हणून जगण्यासाठी मिळालं आहे, जे आयुष्य एकदाच मिळते आणि आपण अशा क्षुल्लक कारणामुळे आपलं किमती आयुष्य सहज संपवण्याचा विचार करतो, जे आयुष्य इतरांना प्रेरणा देणारे असायला हवे अशाच या सुंदर आयुष्याला आपण सहज गमावतो.

कधी कोणी जीव देण्याचा निर्णय घेतो आणि जीव देतो तर कधी कोणी असे घातक प्रयत्न करून समस्या संपवण्याचा प्रयत्न करतात. अभ्यास करिअर हे म्हणजे आपल्या मिळणाऱ्या यशाच्या परीक्षा आहेत आणि या परीक्षेत तोच उत्तीर्ण होतो जो अपयश मिळालं तरी न घाबरता, न लाजता, येणाऱ्या आव्हानांना न डगमगता पुढे जातो.

आजची वेळ थोडी वेगळी आहे, सध्याच्या परिस्थितीत आपलं सर्व ऑनलाईन चालू आहे मग तो अभ्यास असो किंवा परीक्षा पण या गोष्टीचा चुकीचा फायदा न घेता आपण खरेपणाने अभ्यास केला तर आपल्याला भविष्यात कुठेच आणि कोणत्याही ठिकाणी करिअर संबंधात भिती राहणार नाही. कारण आज आपण प्रयत्न करू आणि कष्ट करू तर पुढे हे यश आपलंच आहे.

आपल्यासमोर आज असे व्यक्तिमत्त्व आहेत ज्यांनी कोणत्याही समस्येला न घाबरता तोंड दिले,पुढे जाताना मागे वळून पाहिले नाही, ज्यांनी अनुभवातून शिकवण घेतली आणि प्रयत्नांतून वेगवेगळे मार्ग शोधून यश मिळवले.

जर हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर असताना आपण यश मिळवण्यासाठी धडपड न करता शॉर्टकट शोधायचा प्रयत्न केला तर आपण कायम तोंडघशी पडणार. कारण यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी तसे प्रयत्न केले पाहिजे, मार्ग शोधून त्यावर न घाबरता पुढे गेलो तरच यश हे आपलं असणार. कष्ट न करता कोणतीच गोष्ट सहज मिळत नाही आणि शॉर्टकट वापरून यश मिळवायचा प्रयत्न केला तर यश मिळणार नाही.

कारण कष्टाला पर्याय नसतो आणि यशाला शॉर्टकट नसतो.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!