Skip to content

मनामधली विचारांची गर्दी कमी करूया !! विचारांचं मॅनेजमेंट शिकूया !

मनामधली विचारांची गर्दी कमी करूया !!


मिनल वरपे


मनातले विचार… किती गर्दी असते मनात विचारांची.. चांगले वाईट सर्वच विचार एकमेकांवर कुरघोडी करत असतात आणि आपण उगाच त्यामधे अडकतो आणि स्वतःला त्रास करून घेतो.

अस कधी झालंय का की आज माझं मन एकदम शांत आहे , माझ्या मनात आता कोणतेच विचार नाहीत….शक्यच नाही,कारण आपणच त्या विचारांना मनात थारा देतो.

आता हा विचार मी अजिबात करणार नाही अस जितकं जिद्दीने ठरवतो तेवढ्याच ताकदीने तो विचार आपल्या मनात घर करून राहतो कारण आपण फक्त बोलतो की नाही विचार करायचा पण तशी कृती मात्र अजिबात करत नाही.

विचार आपल्याला पकडुन ठेवत नाहीत तर आपणच विचारांना धरून ठेवतो. चांगले विचार नक्कीच आनंद देतात पण ज्यामुळे आपल्याला त्रास होतो, आपली मनस्थिती बिघडते, आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम होतो अशा विचारांना परावृत्त कस करायचं????

कारण असे विचार आपल्याला धड जगू ही देत नाहीत आणि मरू सुद्धा देत नाहीत फक्त आपल्याला भिती दाखवण्याचं काम करतात.आणि मग ही भिती वाढली की आपल्याला दुसरं काहीच सुचत नाही.मग ही भिती कशी कमी होणार???

१) प्रत्येक गोष्टीला ज्याचा त्याला वेळ द्यायचा असतो.म्हणजेच कोणताही प्रसंग घडतो मग तो चांगला असो किंवा वाईट त्यातून जे विचार मनात येतात त्यांना तेवढ्यापुरती वेळ द्यायचा. जे झालंय ते सोडून पुढे जाण्यातच शहाणपण असते मग त्याचे विचार सुद्धा सोडून द्यायचे.

२) अस कधी झालंय का की तुम्ही खूपच तुमच्या आवडीच्या कामात आहात आणि या गडबडीत मनात खूप सारे विचार येत आहेत, तर याच उत्तर हे नाहीच असणार. कारण आपण आपल्या आवडीच्या कामात असताना आपल्या मनात विचारांना थारा मिळत नाही आपण इतके त्या कामात रमतो की आपल्याला आजूबाजूला काय घडतेय याच सुद्धा भान राहत नाही.म्हणून कायम आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा आणि आपल्याला आवडेल अशीच नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करा.

३) कोणत्या विचारांमुळे आपलं आणि आपल्या वेळेचं नुकसान होते याकडे लक्ष द्यावं. कारण आपण सर्व बाजूला ठेवून विचारांमध्ये इतके अडकतो की आपल्या जबाबदाऱ्या, आपली काम यांचा आपल्याला विसर पडतो.आणि एकदा गेलेली वेळ पुन्हा मिळत नसते.म्हणून ज्या विचारांमुळे माझा वेळ वाया जातोय आणि त्या विचार करण्याने माझ्या हाती काही लागत नसेल तर ते विचार मी अजिबात करणार नाही अस आपण ठरवावं.

४) आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींची एक वाईट सवय असते ती म्हणजे अशी की एखादी घडणारी गोष्ट अगदी छोटी असते आणि ती तेवढी महत्त्वाची सुद्धा नसते आणि ती घडून जाते पण आपण त्या छोट्याश्या गोष्टीला सुद्धा अति महत्त्व देऊन स्वतःला त्रास करून घेतो.अशावेळी आपणच ठरवावं की खरचं ती गोष्ट इतकी महत्त्वाची आहेका??

५) एखाद्या कपड्याला रंग लागला की आपण त्याला झटकल की तो कमी होतो पण तेच जर आपण पाणी लावलं की तो पसरतो.अगदी असच विचारांचं सुद्धा असते आपण त्या विचारांना एक एक करून बाजूला सारायच, जे महत्वाचे आहेत ते कृतीत आणायचे आणि जे बिनकामाचे आहेत त्यांना मनातून काढून टाकायचा प्रयत्न करायचा. नाहीतर आपणच त्याला अवास्तव महत्त्व देऊन त्याच नसलेलं महत्त्व वाढवतो.

५) विचारांचं व्यवस्थापन हे सुद्धा एक कौशल्य आहे. दिवसभरात आपल्या मनात खूप सारे विचार येतात पण त्यामधे कोणते विचार योग्य आहेत आणि कोणते अयोग्य यावर आपण लक्ष द्यावं.कारण त्यावर जर आपण लक्ष दिलं नाही तर मनातल्या विचारांची गर्दी ही वाढतच राहणार.

६) आपली जीवनशैली बदलणे सुद्धा गरजेचे असते. जेव्हा आपण येणाऱ्या बदलांना सामोरे जातो तेव्हा आपल्या मनात विचारांसाठी जगा उरत नाही. कारण काळानुसार आणि वेळेनुसार आपल्याला स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे असते जर तो बदल नाही केला तर येणाऱ्या आवाहनाना तोंड देता येत नाही आणि मनातील विचार वाढत जातात.

मनातील विचारांना कस मॅनेज करायचं हे आपल्या हातात असते आणि आपल्या वागण्यावर सुद्धा अवलंबून असते.कोणत्या वेळी कोणत्या गोष्टीला वेळ द्यायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. जर ते जमत असेल तर मनामध्ये निरर्थक विचार येण्याचा मार्ग बंद होईल.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “मनामधली विचारांची गर्दी कमी करूया !! विचारांचं मॅनेजमेंट शिकूया !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!