Skip to content

अनेक दिवसापासून मी डिप्रेशनमध्ये आहे, यातून मी बाहेर पडेल का ??

अनेक दिवसापासून मी डिप्रेशनमध्ये आहे, यातून मी बाहेर पडेल का ??


टीम आपलं मानसशास्त्र


 

अनेक दिवसापासून मी डिप्रेशनमध्ये आहे. जवळजवळ आज ४-५ वर्ष झाली असावी. सतत डोक्यावर कसलंतरी प्रेशर असल्यासारखं वाटतं. कोणत्याच गोष्टी आनंद देत नाहीत. सारखं एकांतात कसलातरी विचार करत बसते. ज्यावेळी भानावर येते, तेव्हा नेमका मी कसला इतका विचार करत होते, हेच नेमकेपणाने सांगता येत नाही.

हल्ली मला नेमकं काय झालं आहे, हे लोकांना पटवून द्यायचं किंवा सांगायचं म्हटलं कि डोकं खूप जड वाटायला लागलं आहे. माझ्या अवतीभवती माझी काळजी करणारे, योग्य वेळी काय हवे-काय नको हे विचारणारे अगदी जवळची माणसे सुद्धा आहेत. आणि हल्ली मला त्याचं सुद्धा खूप टेन्शन यायला लागलं आहे.

टेन्शन असं कि, इतकी काळजी करणारी लोकं असून सुद्धा मी त्यांच्या काळजीच्या लायकच नाहीये, माझ्यामुळे मी त्यांना टेन्शनमध्ये अडकवून ठेवले आहे. हा विचार मनात आला कि खूप बैचेनी आणि सगळं काही हरल्यासारखं वाटून जातं.

आणि असे काही विचार दाटून येतात कि ते मला जीवन संपवण्याच्या सूचना देतात. पण जीवन संपवणे हे इतकं सोप्प आहे का ? मला दोन मुलं आहेत. दोघेही माध्यमिक शिक्षण घेत आहेत. कोरोनामुळे त्यांचा सगळा अभ्यास हा घरातूनच होतो आहे. आई कशी एका ठिकाणी अडकून पडलीये, हे ती दोघेही हळूच टिपून घेतात. त्याचंही खूप टेन्शन मला येतंय.

आणि अचानक जीवन संपण्याचे विचार जरी येत असले तरी मुलांकडे पाहून कित्येकवेळा मी हे विचार मनात दाबलेले आहेत. रात्रीची अजिबात झोप लागत नाही. एखाद्या वेळेस फार वेळाने विचारात अडकून झोप लागलीच तरी कालांतराने थोडासा जरी आवाज आला तरी पटकन जाग येते.

मग रात्री मुलांचे आणि पतीचे शांत निजलेले चेहरे पाहून अपसूक रडायला येतं. त्यावेळी जीव इतका घाबरलेला असतो कि असेही विचार येतात कि जर मला या क्षणी काय झालं तर या तिघांचं पुढे कसं होईल. म्हणून मनाला पुन्हा नव्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. अगदी कठोरतेने झोप लागलीच पाहिजे म्हणून डोळ्यासमोर अंधार आणते.

सकाळी सुद्धा काहीच फ्रेश वाटत नाही. मध्यरात्रीपर्यंत झोपेने दिलेली बगल आणि पहाटेपासून लागलेल्या झोपेमुळे डोळे जड झालेले असतात. या अवस्थेत घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करायला खूप जीवावर येतं. खूप आळस आणि कंटाळा येतो. कोणतेही काम हाती घ्यायचं म्हटलं तर ते पूर्ण होईल का ? अर्धवट तर राहणार नाही ना ? इथूनच सुरुवात होते.

डोक्यात फक्त विचार एके विचारच चालू असतात. एखाद्या आनंद देणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाणं हे एक आव्हान बनलं आहे. माझ्या मनात नेमकं काय सुरु आहे याबद्दल मलाही अद्याप पुरेशी माहिती नसताना इतरांपासून मी खूप काही लपवत आहे, हे असं वाटत राहतं.

मला लवकर बरं व्हायचं आहे. आधीसारखं नॉर्मल जीवन जगायचं आहे. असे मला खूप स्ट्रॉन्गली जरी वाटत असले तरी एकीकडे हि शंका सुद्धा मनात कायम येत राहते कि मी खरंच या विचक्यातुन मुक्त होईल का ?

टीप : फोटो प्रतीकात्मक आहे.


वरील संबंधित केस हि अनेकांबाबत घडत आहे. इतरांना त्रास नको म्हणून बऱ्याचशा गोष्टी सांगणे ते बंद करतात. आतल्या-आत झुरत राहतात. त्यामुळे त्यांच्यामधली ही समस्या दिवसेंदिवस वाढत जात आहे.

आपण त्यांना नक्की मदत करू शकतो. अशावेळी त्यांच्या जवळची माणसं हे काम चोख करू शकतात. पुष्कळ स्थितीत जवळच्या लोकांना हवा तसा वेळ देता येत नाही. किंवा त्या व्यक्तीशी सलगी जरी चांगली असली तरी अशा वेळी त्या व्यक्तीला कसं बोलतं करायचं हे त्यांना जमत नाही.

अशा वेळी समुपदेशनामार्फत (Counseling) त्यांच्या मनाचा निचरा करून वागण्या-बोलण्यात आणि एकंदरीत विचार करण्याच्या पद्धतीत तारतम्य आणता येणे सहज शक्य आहे. यासाठी ती व्यक्ती मनाने पूर्ण तयार असायला हवी.

‘आपलं मानसशास्त्र’ तज्ज्ञ मंडळींना संपर्क करण्यासाठी खाली दिलेला एक साधा फॉर्म भरा आणि आपली योग्य वेळ सांगा. क्षणातच आमची टीम तुम्हाला संपर्क करेल.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!