Skip to content

निरोप घेताना ती शेवटची मिठी नक्की घ्या !!

निरोप कि ब्रेकअप!


जागृती सारंग


सहसा आपण एखाद्याचा निरोप घेतो तेव्हा भविष्यात पुन्हा भेट होणार असते. पण जेव्हा एकमेकांसाठी कमिटेड असणाऱ्या दोन व्यक्ती पुन्हा न भेटण्याच्या तयारीने निरोप घेतात तेव्हा त्या दोन्ही व्यक्ती त्या निर्णयाने खरंतर मनातून प्रचंड कोसळलेल्या असतात. कुणी धाय मोकलून रडत असतं तर कुणी अबोलपणे आवंढे गिळत असतं.

परंतु दोन्ही व्यक्ती रडतात हे नक्की. शेवटी जेव्हा अगदीच निरोपाची वेळ येऊन ठेपते तेव्हा एक शेवटची मिठी मारली जाते आणि कितीही दुःखद विरह असला तरीही डोळ्यांतली आसवं लपवत ओठांवर उसनं हसू आणत एकमेकांचा निरोप घेतला जातो. खूप नाजूक क्षण असतो हा अशा निरोपाचा…!

कुणातरी एकाला किंवा बहुतांशी दोघांनाही निरोप घेताना वाटत असतं कि काहीतरी जादू घडावी आणि हा निरोप अंतिम असू नये. पण ज्या व्यक्तीने चूक केलेली असते ती व्यक्ती आपली चूक मान्य करायला तयार नसते अन् दुसरी व्यक्ती वारंवार घडणाऱ्या त्या चुकांना पोटात घालून घ्यायला मान्य नसते. एकाने दुसऱ्याला गृहित धरलेलं असतं अगदी शेवटच्या भेटीपर्यंत!

गृहित धरणाऱ्याला वाटत असतं कि समोरची व्यक्ती आत्ता आपल्यापासून दूर जात आहे पण हा दुरावा कदाचित काही काळापुरता असेल आणि समोरची व्यक्ती प्रेमापोटी पुन्हा माघारी वळून आपल्याकडे येईल.

पण काहींना प्रेम देण्याची सवय असते अन् त्यांना ते दिलेल्या प्रेमाच्या बदल्यात समोरच्याकडून ओरबाडून घेता येत नाही. प्रत्येकाला प्रेम हे सहज देता यायला हवं. प्रेमाची कधी कुणाला भिक मागावी लागू नये. खरंतर या गृहित धरण्यातच सगळा घोळ होतो आणि नात्यांना तिलांजली लागते.

कधीतरी जेव्हा चूक करणाऱ्या व्यक्तिला खाडकन झोपेतून जागं झाल्यासारखं होतं आणि स्वतःच्या चुकांची जाणीव होते. सर्व चुका मान्य करून पुन्हा नवी सुरूवात करायचा विचार मनात येतो. पण दुर्दैवाने तेव्हा फार उशीर झालेला असतो आणि आयुष्यभरासाठी आता फक्त पश्चातापच लाट्याला आलेला असतो.

दुसरी व्यक्ती मात्र तोपर्यंत काळजाच्या जखमेवर मलमपट्टी करून मुव्ह ऑन मंत्रा स्विकारून समोरच्या व्यक्तीच्या पोहोचण्याच्या कक्षेबाहेर निघून गेलेली असते.

म्हणूनच शेवटची भेट खूप महत्वाची! बाजी पलटता आली तर पलटून पहायची असते अन्यथा त्या शेवटच्या भेटीतली ती मिठी अखेरचीच ठरते. परंतु हे असे समंजस निरोप तेव्हाच घडतात जेव्हा त्या नात्यामधे कधीतरी खरंखुरं प्रेम होतं, निदान दोघांपैकी एकाचं तरी!

नंतर काळाचं औषध त्यावर चढलं की ते विस्मरणात जातंच किंवा त्याची रवानगी तळघरात करावीच लागते, पुढचं आयुष्य जगण्यासाठी. जखमा शरीराच्या असो वा मनाच्या उशीराने का होईना त्या भरुन निघतातच.

ज्या व्यक्तीची चूक नसते ती व्यक्ती वास्तव स्विकारून कालांतराने मुव्ह ऑन होते पण दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात मात्र आयुष्यभर त्या शेवटच्या चुकिचा पश्चाताप कायम सल म्हणून कोरला जातो.

म्हणूनच आधी हजार चुका केल्या असल्या तरी त्या मान्य करून शेवटच्या निरोपाच्या मिठीची चूक कधीही होऊ देऊ नये. निःस्वार्थ प्रेम उधळणारी माणसं आयुष्यात पुनः पुन्हा येत नसतात. जर तुमच्या आयुष्यात अशी तुमच्यावर कुठलीही अपेक्षा न ठेवता भरभरून प्रेम करणारी माणसं असतील तर त्यांना ती शेवटच्या निरोपाची मिठी चुकून देखिल देऊ नका.

प्रेम उधळणारी माणसं फक्त नात्यामधल्या प्रेमापोटीच चुकांकडे दुर्लक्ष करायला तयार असतात पण त्यासाठी तुम्ही मोठ्या मनाने चुका मान्यही करायला हव्यात. कारण माफ करायला मोठं मन लागत नाही तर माफी मागायला मोठं मन असावं लागतं.

बघा वेळ निघून जाण्याआधी तुम्ही स्वतः किंवा इतर कुणा तिसऱ्या व्यक्तींनी तुमच्या डोळ्यांवर पट्टी बांधली असेल तर ती सोडायचा प्रयत्न करा आणि हातातून निसटून जाणारे हक्काचे, प्रेमाच्या मायेचे हात घट्ट धरुन ठेवा. निरोपाला ब्रेकअप होऊ देऊ नका!



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “निरोप घेताना ती शेवटची मिठी नक्की घ्या !!”

  1. Vinod s. Panchbhai

    अगदी मनापासून प्रत्येकाच्या मनातलं लिहिलंय..!
    किप इट अप…

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!