मासिक पाळीच्या या तक्रारी पुरुषांनाही माहिती असाव्यात !!
हरी कृष्ण बाखरू
(निसर्गोपचार तज्ञ)
स्त्रियांमध्ये ‘इस्ट्रोजेन’ आणि ‘प्रोजेस्टेरॉन’ ही दोन महत्वाची हार्मोन्स असतात. बीजांडकोषातून हि हार्मोन्स पाझरतात. वयाच्या बाराव्या वर्षांपासून मुलींच्या बीजांडकोषातून इस्ट्रोजेन हे हार्मोन मोठ्या प्रमाणात पाझरू लागते. त्यामुळे त्यांची झपाट्याने वाढ होते. मुलगी वयात आल्याचे ते लक्षण असते.
साधारणपणे प्रत्येक २८ दिवसानंतर तिच्या शरीरातून ऋतुस्राव बाहेर टाकला जातो. मुलगी वयात आल्याचे, स्त्री प्रजननक्षम झाल्याचे ते लक्षण असते.
या ऋतुस्रावाशी निगडित असणाऱ्या काही तक्रारी स्त्रियांमध्ये आढळतात. ऋतुस्राव होण्यापूर्वीच दडपण, मासिक पाळीच्या वेळी पोटात वेदना होणे, ऋतुस्राव थांबणे किंवा त्यांचे प्रमाण वाढणे इत्यादी तक्रारी अनेक स्त्रियांमध्ये आढळतात.
कारणे आणि लक्षणे
ऋतुस्राव होण्यापूर्वी थोडे दिवस काही स्त्रियांमध्ये निराशेची भावना येते, तर काही खूप पटकन चिडतात रागावतात. डोकेदुखी, स्तन जाड होणे, झोप न येणे, ओटीपोट घट्ट वाटणे इ. लक्षणेही दिसून येतात. शरीरातील हार्मोन्सच्या असमतोलामुळे स्त्रियांमध्ये हे शारीरिक आणि मानसिक बदल घडतात.
ऋतुस्राव सुरु झाला कि एका दिवसात हि सर्व लक्षणे कमी होतात. ऋतुस्राव होण्यापूर्वी दोन-तीन दिवस आधी किंवा सुरु असताना काही स्त्रियांच्या पोटात दुखते. अर्थात हार्मोन्सचा असमतोल हेच यामागचे कारण असते.
गर्भावस्था आणि रजोनिवृत्ती या दन कारणांमुळे ऋतुस्राव नसर्गिकरित्या थांबतो. परंतु इतर वेळी जर ऋतुस्राव थांबला तर ते नैसर्गिक नसून शरीरात काही दोष निर्माण झाला आहे याचे लक्षण असते. अशक्तपणा, खूप काळजी, दुःख किंवा प्रचंड मानसिक उलथापालथ, गर्भाशयात दोष निर्माण होणे, क्षयाची बाधा, गर्भाशयाची जागा बदलणे, मोठ्या आजारामुळे आलेली कमजोरी अशा अनेक कारणांनी ऋतुस्राव थांबू शकतो.
बऱ्याच स्त्रियांना अंगावरून जास्त जाण्याचा त्रास होतो. त्यालाही बरीच शारीरिक आणि मानसिक कारणे असतात. शरीरातील नैसर्गिक हार्मोन्सच्या असमतोलामुळे काही स्त्रियांची पाठ खूप दुखते. शरीरातील हाडे कमकुवत झाल्यामुळे हा आजार उद्भवतो. ह्यालाच ‘ऑस्टिओपोरोसिस’ असे म्हणतात.
यावरील उपचार
अनेक घरगुती उपचारांमध्ये अजमोदा या वनस्पतीचा उपचार फार गुणकारी आहे. त्यात ‘अँपीओल’ नावाचा एक घटक असतो. हा घटक इस्ट्रोजेन या हार्मोनमध्येही असतो. त्यामुळे पाली नियमित येण्यासाठी आणि पाळीच्या इतर तक्रारींवर अजमोद्याचा रस घेतल्याने उपयोग होतो. बिट, गाजर, भोपळा आणि आजमोदा या चार भाज्यांचे प्रत्येकी अर्धा कप रस एकत्र करून प्यायल्याने पाळीच्या अनियमितपणामुळे होणाऱ्या शारीरिक तक्रारी दूर होतात.
यामध्ये प्रामुख्याने आले, तीळ, पपई, हरभऱ्याचे झाड, झेंडू, केळफूल, धने, आंब्याच्या झाडाची साल, अशोक वृक्ष, आघाडा, इंडियन बार्बेरी, हेमलि, अंबाडी इ गुणकारी ठरू शकतील.
आहार
दर २८ दिवसांनी नियमितपणे स्त्रियांच्या शरीरातून रजोस्राव होतो. ह्या नित्यनेमाने होणाऱ्या शरीरधर्मात काही वेळा अनेक समस्या निर्माण होतात. त्या कमी करण्यासाठी शरीरातील दूषित भाग काढून टाकून शरीर निरोगी राखणे महत्वाचे असते.
त्यासाठी एक उपचार पद्धती वापरावी लागते. मासिक पाळीच्या तक्रारी असणाऱ्या स्त्रियांनी उपचार पद्धतीत सर्वप्रथम पहिले पाच दिवस केवळ फलाहार घ्यावा. दिवसातून तीन वेळा ताजी, रसाळ फळे खावी. या काळात वजन कमी होते.
ज्या स्त्रिया मुळातच अशक्त असतात किंवा ज्यांचे वजन कमी असते त्यांनी दर फलाहारावेळी एक पेला दूध प्यावे. पाच दिवसांनी स्त्रियांनी व्यवस्थित जेवण घेण्यास सुरुवात करावी.
यामध्ये ताजी फळे, कच्चा भाज्या, कोंड्यासकट तृणधान्ये यांचा समावेश असावा. मैदा, साखर, केक, बिस्किटे, गोड खाणे, तळलेले, मसालेदार, तसेच खारवलेले पदार्थ, लोणचे, कडक चहा-कॉफी इ पदार्थ अजिबात खाऊ नयेत. यानंतर एक महिन्याच्या अंतराने दोन-तीन दिवस ओळीने फलाहार घ्यावा. गरजेनुसार हा उपचार करावा.
इतर उपाय
पहिल्या पाच दिवसांच्या फलाहाराच्या काळात स्त्रियांनी रोज कोमट पाण्याचा एनिमा घेऊन पोट साफ ठेवावे. रोज अंग चोळावे आणि सकाळी गार पाण्यात बसावे. पाळीच्या वेळी गार पाण्याने आंघोळ करू नये. धूम्रपानाची सवय असल्यास ती पूर्णपणे सोडून द्यावी. कारण धुम्रपानामुळे मासिक पाळीच्या तक्रारी वाढतात.
