पणती जपून ठेवा, अंधार फार झाला.
लालचंद कुंवर | 9657835771
प्रेम ! हो प्रेमच !
काय असतं हो प्रेम ?
जेव्हा दैनंदिन जगण्यामध्ये दो जिस्म एक जान , हि सुंदर, तरल भावना असेल . आयुष्याची प्रत्येक सकाळं सोनेरी किरणांनी उजळून निघेल . दोन नात्यांमध्ये फक्त आणि फक्त समर्पणाची भावना असेल…..
खर तरं ज्या नात्यांना प्रेमातलं समर्पण कळालं, ती नाती अजरामर ही झालीतं इतिहासाच्या पटलावर. …….. !
आणि तीच नाती अधिराज्यही गाजवतात , दोन ह्रदयांवर.
तेथे मनाचं तळ स्वच्छ आणि निर्मळ दिसतो, अगदीच लपवाछपवीचा खेळ नाही . फसव्या आणाभाका नाहीत.
प्ररतारणा ना देहाची ना मनाची !
ना दोन जीवांची !
फक्त पूर्ण आचार विचारांचा विश्वासहार्तारुपी अंकुर फुलत असतो दोन ह्दयात ! हिच तर प्रेमाची अनुभूती.
पण…..
नको त्या वयात……
खर तरं , आता वयाची पण बंधन गळुन पडलीत म्हणा ! एक वासनांध , आकर्षानाने निर्माण झालेल्या हिणकस वृत्तीलाच प्रेम समजलं जात.
जे जगतात प्रेमाच्या धुंदीत ! आणि त्या धुंदीनेच ‘ प्रेम’ या शब्दाचीच माती केली. मग त्या धुंदीतच एक नवीन भावनेचा मनात जन्म होतो,
‘डर’ या चित्रपटातील गाण्याप्रमाणे,
‘ तु हा कर या ना कर , तु है मेरी किरण ‘
मग या किरण ला जाळ्यात ओढण्यासाठी
सारख्याच मर्यादा सोडल्या जातात , वागण्याच्या अन बोलण्याच्या सुध्दा.
तर कधी डोळ्याला झापडं बांधुन पायत घुंघरुचा थयथयाट चालू असतो . खुप भावुक होण्याचा आव आणतात , आनाभाका घेतल्या जातात , डोक्यात एकच विचार, किरण फक्त माझीच झाली पाहिजे.
आज ह्याच वृत्तीने ‘ प्रेम ‘ या शब्दाचीच विटंबना केली.
खुप मोठी शोकांतिका आहे कि एक ‘ हिन ‘ वृत्ती आज जन्माला येवू पाहाते आहे , ज्या घरात किरण आहे, मग काही गिधाडं टपून बसलेली असतात , त्या किरणवर म्हणे प्रेम करण्यासाठी ! अर्थात झडप घालण्यासाठीच.
मग ते ‘ प्रेम निर्माण करण्यासाठी अर्थात मिळवण्यासाठी वाट्टेल ते,’ अशा हिन भावनेचं जन्म होतो. ह्माच वृत्तीने आज कितीतरी किरण सारख्या कळ्यांचा उमलण्याआधीच बळी घेतले. काहींनी मोहात अडकून आयुष्याची माती ही केली तर काही किरण एकतर्फी प्रेमाच्या शिकार ही ठरल्यात !
हे कधीच भरुन न येणारे काळजावर होणारे घाव !
एक जन्मदात्यांशिवाय कधीच कुणीही समजू शकणार नाही. लेकीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचं. काळजाचा तुकडा लहानाचा मोठा करायचा,
अचानक लांडग्यांनी झडप घालावी, होत्याचं नव्हतं कराव .
ज्या वेळी अख्ख जग चिरनिद्रेने गाढ झोपलेलं असतं, तेव्हा हा उपवर मुलीचा बाप जागा असतो तर कधी झोपेतनं दचकून उठतो…., विवंचना मात्र एकच !
ह्या घरट्यातुनं लेकरू सुखरूपपणे नवीन सासरी सुखी समाधानाने संसाराचं माप ओलांडाव अन आनंदाने जगावं. पण तोपर्यत हि पणती जपून ठेवण्यासाठी घालमेल सुरु असते.
अशा वेळी हिमांशू कुलकर्णी यांच्या कवितेतल्या काही ओळी खुप काही सांगून जातात……
पणती जपून ठेवा. अंधार फार झाला.
काळ्या ढगात वीज आहे, पुन्हा टपून,
घरटी जपून ठेवा, अंधार फार झाला.
शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे
हरणे जपून ठेवा , अंधार फार झाला.
ह्रदयात पाळलेल्या जखमातुनीच आता
कंदील एक लावा , अंधार फार झाला.
कोणीतरी भ्रमर , भुंगे पणतींवर झडप घालण्यापूर्वीच पणती जपण्याचं आव्हानाला क्षणोक्षणी समोरं जाव लागतं.
या सारखे कसोटीचे क्षण कोणते असतील बरं .
जगाने ही निर्विवादपणे आदर्श घ्यावा , अशा
भारतीय संस्कृतीचा झेंडा अख्खा जगात नभी डौलदारपणे फडकत असतो.
मग संस्काराची शिदोरी लेकरांना देण्यास , समाज कुठे कमी तर पडत नाही ना ?
” परस्री माते समान ” हा शिवाजी महाराजांनी दिलेला वैचारिक वारसेचा विसर तर होत नाही ना ?
जेव्हा दुसऱ्यांच्या घरावर आम्ही दगड भिरकवतो,
तेव्हा आपल्याही घरात खिडक्यांना काचा आहेत,
याचा विसर का पडावा ?
जन्मभर पुरेल एवढी , एक माणूस म्हणून जगण्याची , संस्काराची शिदोरी लेकरांना बांधुन द्यावीच लागेल.
नाहीतर
भस्मासुर राक्षसासारखं स्वतःच्याच कर्माच्या फळाने एक दिवस स्वतःलाच भस्म होण्याची वेळ येईल……
हा काळाचा महिमा ओळखुन , घराघरातून निस्सीम निस्वार्थी एक प्रगल्भ प्रेमाचा दिप प्रज्वलित व्हावा,
जेथे थारा नसावा आकर्षणाला आणि वासनांधतेला…


