स्वप्नातल्या कळ्यांनो…उमला!
माधुरी पाळणीटकर
पापण्यातली स्वप्नंपापण्यातच ठेवायची असतात स्वप्नं सत्यात साकार करताना काट्यांचीही फुले करायची असतात.कळ्यांना उमलू द्यायचे, काही असायचे काही नसायचे, हेच स्वप्नातले सत्य असायचेजीवन जणू स्वप्नच किती क्षण वेचायचे तुमच्या हातात स्वप्नं सुखाचा वर्षाव करणारी असतील तर का नाही बघायची?
स्वप्न हा शब्द आयुष्याचा अविभाज्य घटक. कधीही कुठल्याही गोष्टीचं स्वप्न पडलं नाही, स्वप्न पडत नाही, असं कधी होणारच नाही. कुणाला ही, कधी कशाचंही स्वप्न पडू शकतं आणि ज्या गोष्टी प्रत्यक्षात घडल्या नाहीत किंवा घडणार नाहीत, त्याची स्वप्नात का होईना पूर्तता होऊन समाधान मिळू शकतं.
स्वप्नं तुमच्या विचारांशी, भावनांशी, मनातल्या आंदोलनाशी निगडीत असतात. स्वप्ने तुमची मन:स्थिती ही सांगू शकतात. मनात भीती असेल तर भयकारक स्वप्ने पडतात. एखादी प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तिचे दर्शन स्वप्नात घडतं. प्रत्येकाच्या डोळ्यात स्वप्नं असतात. कुणी ती व्यक्त करतात, कुणी ती मनातच ठेवतात. स्वप्नं कधी स्वत:साठी, कधी दुसर्यासाठी बघितली जातात.
आपण लहान बाळाला थोपटतो. शांत झोप लागावी म्हणून अंगाई गीत म्हणतो. मग थोड्याच वेळात बाळाला झोप लागते. मध्येच ते गोड हसते, तर कधी दचकून जागे होतेे. मला वाटतं स्वप्नांचा प्रवास तेथूनच तर सुरू होतो.
आधी डोळ्यातलं स्वप्न मग ते प्रत्यक्ष साकार होण्यासाठी तुमची अविरत मेहनत आणि मग येणार यशस्वी जीवन हेच यशस्वी आयुष्याचं गमक आहे. म्हणूनच स्वप्नं बघावी का. हा प्रश्न उभा राहतो तेव्हा मात्र असं वाटतं खरंच स्वप्नांसारखी सुंदर गोष्ट आयुष्यात असताना ती का बघायची नाही.
जर स्वप्नं तुम्हाला आनंद देत असतील तर तो का नाही मिळवायचा? जगात अवतीभवती ज्या असामान्य कर्तृत्ववान व्यक्ती असतात त्यांची आत्मचरित्रे वाचली असता असे प्रकर्षाने लक्षात येते की, लहानपणी ज्या महत्वाकांक्षेने त्यांनी स्वप्न पाहिले असते ते प्रत्यक्षात यावे म्हणून त्यांनी स्वत:चे अवघे आयुष्य वेचले असते म्हणून ते स्वप्न सत्यात अवतरले असते.
स्वप्ने जीवनाचा ध्यास, जीवनाची ओळख असतात म्हणूनच ती पापण्यांमध्ये लपवायची असतात कारण तीच आयुष्य घडवत असतात. आई-वडिलांची मुलां- कडूनच अपेक्षा हा ही त्यांचा स्वप्नांचाच भाग असतो.
आपली मुलंं संस्कारी, यशस्वी, स्वकतृत्वावर जग जिंकणारी असावीत हेच तर प्रत्येक आई वडिलांच्या डोळ्यातलं स्वप्न असतं. त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी ते स्वत:चे आयुष्यचं पणाला लावतात पण काही मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करून त्यांना वृध्दाश्रमात ठेवतात तेव्हा स्वप्नांनीही आयुष्यात सुख दिले नाही असाच विचार त्यांच्या मनात येत असेल.
परदेशात शिक्षण घेणार्या मुलाला केवळ वर्ण द्वेषामुळे निरपराध असतानाही आपला जीव गमवावा लागतो तेव्हा त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यावर त्यांना किती यातना होत असतील, हा विचार मनात येऊन जातो. जग इतकं आत्मकेंद्री, स्वार्थी होत चाललंय की प्रत्येकजण जगताना स्वत:च्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी जगतो.
दुसर्यालाही स्वप्न बघण्याचा, सुख मिळवण्याचा हक्क आहे हेच विसरतो. आपलं स्वप्नांचं जग सुुंदर असतं पण जगताना दुसर्यांच्या स्वप्नांच्या जगातही डोकवायचं असतं. तुम्ही दुसर्यांची स्वप्नं साकार व्हायला थोडीशी मदत केली की तुमची स्वत:ची स्वप्नं खूप लवकर साकार होतात.
सर्वप्रथम तुमची प्रार्थना पूर्ण होते आणि ईश्वर कृपेने मग तुम्हाला अशा गोष्टी मिळतात ज्या तुम्ही कधी स्वप्नातही पाहिल्या नव्हत्या. स्वप्न आणि वास्तव यांची योग्य सांगड घातली की, आयुष्य जगायला सहज सोपं होऊन जातं. स्वप्नं साकार करताना मार्ग चांगले असले की स्वप्नं साकार होतातच.
स्वप्नं वास्तवात साकार झाली नाहीत की दु:ख पदरी येतं म्हणून स्वप्नं बघायची नाहीत. हा युक्तीवाद चुकीचा वाटतो. असे करणे म्हणजे आयुष्य जगण्याची जिद्दच सोडून देण्यासारखे आहे. कारण स्वप्नं जगण्याचा आधार आहे.
स्वीकार हे धोरण अवलंबले की स्वप्ने साकार झाली नाहीत, तरी खंत वाटत नाही. हा विचार मनात आणला तर सकारात्मक दृष्टिकोन मनाची ताकद वाढवतो आणि खरं सांगू जरा अवती भवती जग डोकावून बघा, जीवनातली आवश्यक मुलभूत सुख ही काही दुर्दैवी व्यक्तींना मिळत नाहीयेत.
म्हणजे ही सुख म्हणजे त्यांची स्वप्नं आहेत. हे जीवनाचे चित्र समोर आलं की आपलं अर्धवट रंगलेलं जीवनचं चित्रही खूप सुंदर पूर्ण आहे, याची जाणीव होते. एक स्वप्नं अपूर्ण राहिलं तर दुसरं पहायचं, पण स्वप्नं पहात रहायचं.
अपूर्ण स्वप्ने जर तुम्हाला दु:खे देत असतील तर ती लवकरात लवकर विसरायची आणि सुंदर आशावादी स्वप्नं परत बघायची. आपण जे बघतो, बोलतो त्याला वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते, म्हणूनच सुखाची स्वप्नं बघायची म्हणजे स्वप्नातलं सुख प्रत्यक्ष अवतरायला वेळ लागत नाही. त्या नंतर चेहर्यावरचा जो आनंद येतो त्याची सर कशालाही नाही.
स्वप्नं साकार व्हायला वेळ लागतो. हा लागणारा वेळ तुम्हाला वास्तवाचे दर्शन घडवतो. जीवन कसे जगायचे शिकवतो. स्वप्ना पली-कडलेही जग कसं आहे हे दाखवतो… आणि प्रतीक्षेनंतरचे येणारे फळ मधुरच असते. फक्त आपण नाउमेद व्हायचे नसते.
स्वप्नांच्या मागे सारखे पळायचे नसते. स्वप्नांच्या आहारी किती जायचे हे आपण ठरवायचे असते. नाहीतर आयुष्याचे क्षण स्वप्नांसारखेच निघून जातील आणि जगण्याचा आनंद घ्यायचेच राहून जाईल. आई सांगायची कळ्या तोडायच्या नाहीत हं. त्यांना उमलू दे, फुलू दे, मग फूल तोडताना कळी तुटली की मनाला हूरहूर लागायची.
वाटायचं जणू तिचं स्वप्नंच मी हिरावून घेतलंय. आयुष्य म्हणजे स्वप्नातल्या कळ्या, रात्री पाहिलेल्या सकाळी अलगद उमलणार्या जीवनाला आनंद, सुख देणार्या. मग त्या उमलू नकाच केव्हा असे म्हणणे म्हणजे स्वत:च स्वत:चा आनंद हिरावून घेण्यासारखे आहे, अशी वेळ नकोच म्हणून या कळ्यांना अलगद जपायचे. त्या फुलणारच असतात. आपण फक्त त्यांना जपायचे असते.


