विवाहित पुरुषांना मैत्रीण असावी कि नाही ?


टीम आपलं मानसशास्त्र


या प्रश्नाचे उत्तर केवळ होय किंवा नाही यामध्ये देणे फार अवघड आहे. किंबहुना या दोन शब्दात या प्रश्नाचे उत्तर दिल्यास कोणत्याही विश्लेषणात हात न घालता एक ढोबळपणे ते दिलेले उत्तर असेल, यात शंका नाही.

काही जणांना असेही वाटेल कि, हा प्रश्न काय इतका महत्वाचा आहे काय. खरंतर या प्रश्नावर लेख लिहावासा वाटणं हे सुद्धा एक कोडं आहे. अनेक प्रकरणं गाजल्यानंतर जेव्हा पुरुष मंडळी शेवटी ठरवतात कि आता अशी मैत्रीण नको ठेवायला, तेव्हा अखंड पुरुष जातील हा प्रश्न नक्कीच भेडसावतो.

Advertisement

मग विवाहित पुरुषांना एखादी तरी मैत्रीण असावी का ? काय हरकत आहे असायला. याउलट विवाहित स्त्रियांना सुद्धा एखादा मित्र असणे, यात काय गैर आहे. जर ती दोघे नवरा-बायको या गोष्टीबद्दल म्युच्युअली अंडरस्टॅंड असतील तर कशाला हा निरर्थक प्रश्न उकरून काढायचा.

दोघेही सामंजस आहेत. त्या दोघांनाही संसाराचे प्रोटोकॉल माहित आहेत तर ती दोघेही नक्कीच एकमेकांसाठी उत्तम आणि चांगला निर्णय घेऊ शकतील. एकमेकांना आयुष्याचे साथीदार जरी मानलं असलं तरी दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे ढुंकूनही पहायचं नाही, याला संकुचित विचारसरणी म्हणतात.

तसं पाहिलं तर काही विकृत माथेफिरूंमुळे विवाहानंतरचं हे नातं अक्षरशः बदनाम झालेलं आहे. आणि त्यात फुंकर मारली आहे, उघड्या-नागड्या चित्रपटांनी. ‘शादी के बाद भी वो उससे मिलने जाती थी, पती जाने के बाद वो उसे घर पे बुलाती थी’ असे शॉर्ट फिल्म आजकाल फेसबुक आणि युट्युब वर खूप हिट होत आहेत.

Advertisement

आणि अशा चित्रपटांकडे अजिबात लक्ष जाणार नाही, अशी सध्याची पिढी अजिबात नाही. यामध्ये विवाहित तर आहेतच पण गंभीर बाब म्हणजे नुकताच मोबाईल हातात आलेले शालेय आणि महाविद्यालयीन मुलं-मुली सुद्धा आहेत.

म्हणून लग्नानंतर एखादी मैत्रीण असणं आणि स्त्रियांसाठी एखादा मित्र असणं हे महासंकट बनत चाललेलं आहे. मनात कोणता वाईट हेतू जरी नसला तरी आपल्या जोडीदाराच्या मनात कोणतेही पाप येऊ नये म्हणून अनेकजण विवाहानंतर मित्र-मैत्रिणींना तिलांजली देतात.

विवाहानंतर मित्र-मैत्रीण असावे कि नसावे हा ज्याचा-त्याचा व्यक्तिगत प्रश्न जरी असला. तरी एखाद्या प्रसंगात पुरुष असेल तर त्याला मैत्रिणीची गरज नेमकी का भासत आहे, याचा पुरुषांनी नक्की फेरविचार करणं आवश्यक आहे.

Advertisement

जर मुख्य हेतू हा समजून घेणारी सोबती, छान दिसणे, स्तुती करते, समजावून सांगते, वेळ काढून भरभरून बोलते, आयुष्यभर सोबत राहण्याच्या गोष्टी करते वगैरे असेल तर तुमचा मुख्य हेतू हा चुकीच्या ट्रॅकवर बेछूट चालतोय असे समजावे. तर तुम्हीच मैत्रीण म्हणून नात्याची बदनामी करताय असा त्याचा अर्थ होऊ शकतो.

अशा नात्याला पुढे कोणताही आकार-उकार नसतो. याने तुम्हीच तुमच्या वैवाहिक जोडीदाराची फसवणूक करीत आहात. त्यामुळे तुमचे तुमच्या पत्नीशी असलेले संबंध आणखीन बिकट होत जातील.

मान्य आहे काही वेळेस आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणीतरी जवळ हवं असतं आणि पत्नीशी असलेले नाते तितके समाधानी नसल्याने आपल्याला मन मोकळं सुद्धा करता येत नाही. अशावेळी मन मोकळं करण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबणे सुद्धा अयोग्यच. प्रशिक्षित समुपदेशकाची मदत घेऊन आपण हा प्रश्न मार्गी लावू शकता.

Advertisement

असे कित्येक विवाहित पुरुष मंडळी आहेत, ज्यांच्या अनेक मैत्रिणी सुद्धा आहेत. परंतु त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावर झालेला दिसत नाही. कारण ते अगदी ट्रान्सपरंट वागत असतील, मॅसेज आणि फोन कॉल डिलीट करत नसतील, रात्री उशिरापर्यंत पत्नीच्या पश्चात चॅटिंग करत नसतील, खोटे बोलून फिरायला जात नसतील…

आणि या गोष्टी ज्या वैवाहिक पुरुष मंडळी करत असतील…ती पुरुष मंडळी मैत्रीण नसून तर नजीकच्याच भविष्यात येणारं संकट पाळत आहेत एवढं मात्र नक्की!

म्हणून मैत्रीण नक्की असावी, पण ती आपल्या वैवाहिक जीवनासाठी एक संकट म्हणून आलेली नसावी.

Advertisement


Online Counseling साठी !

क्लिक करा“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.