मरण्याआधी एकदा जगून घ्या !
मिनल वरपे
प्रतिक आणि साक्षी यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम.. त्यांनी लग्न सुद्धा केले. घरच्यांनी विरोध केलेला पण त्या विरोधाला न जुमानता लग्न करून सर्व सोडून ते दूर निघून गेले. घरच्यांशी अजिबात संबंध राहिले नव्हते.
प्रतिक च शिक्षण पूर्ण झालेलं त्यामुळे त्याला नविन ठिकाणी चांगली नोकरी मिळाली. आणि साक्षीने शिक्षण पूर्ण करायचे ठरवले.पण काही महिने होत नाहीत तर साक्षी आणि प्रतिक ला एक गोंडस मुलगी झाली.
मुलगी एक वर्षाची झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की तिला बोलता ऐकता येत नाही. पण प्रतिक ला अशी मुलगी नको होती. त्या मुलीला एखाद्या आश्रमात सोड नाहीतर मीच घर सोडून जाईल अस बोलत प्रतिक ने त्याचा निर्णय दिला.पण साक्षी ला त्याचा निर्णय अमान्य होता. एक दिवस प्रतिक त्या दोघींना सोडून निघून गेला.
घरच्यांचा विरोध न जुमानता लग्न केल्यामुळे घरी माघारी जाऊ शकत नव्हती. शिक्षण सुद्धा पूर्ण झालं नव्हत त्यामुळे चांगली नोकरी मिळत नव्हती आणि इवल्याशा बाळाला सोडून नोकरी करणे हे साक्षीला जमतच नव्हते.
पण आलेल्या परिस्थितीत अजिबात न डगमगता एकटी खंबीर राहून तिने तिचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय घरी बसून करता येत होता. तिला उत्तम स्वयंपाक येत होता म्हणून काही ठराविक पदार्थ तिने विकायला सुरवात केली आणि हळूहळू त्यांची मागणी वाढत तिचा व्यवसाय सुद्धा वाढत गेला.तिला तिच्या मुलीकडे सुद्धा चांगले लक्ष देता येत होते.
आलेल्या या परिस्थितीत हताश न होता पुढे कस जायचं आणि नव्याने सुरवात कशी करायची हे साक्षीने जगाला शिकवल.साक्षी रडून आधार शोधत बसली असती तर आज तिने स्वतःला घडवलं नसत. तिची तिने ओळख निर्माण केली नसती.
मुलीसाठी तिला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागले असते.पण तिने तसं न करता मुलीची जबाबदारी स्वीकारत जगण्याची नविन सुरवात केली…
आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा आपण पूर्णपणे गोंधळतो, काहीच सुचेनासे होते, काहीवेळेस जीव देण्याचा चुकीचा मार्ग आपण अगदी सहज निवडतो.
पण चुकीचे मार्ग निवडून स्वतःला आणि दुसऱ्यांना दुःख देण्यापेक्षा आयुष्याची नव्याने सुरवात करा. आपण एकटे पडलो अशी भावना मनात ठेवून कमजोर होण्यापेक्षा मी स्वतःला नव्याने सिद्ध करू शकतो असा विचार करून प्रयत्न करायचे.
आयुष्य फक्त एकदाच मिळते आणि वाईट घटना घडली की मिळालेल्या या सुंदर आयुष्यात नव्याने जगायचा प्रयत्न करणे आपल्या हातात असते.
आपण फक्त सुरवात करायची…यश पुढे आपली वाट बघतच असेल.आणि यश मिळो अथवा न मिळो शेवट करण्यापेक्षा सुरवात करणे कधीही उत्तमच….
It’s true 👍
True