अवतीभवती आनंद असूनही आनंद का घेता येत नाही !!


टीम आपलं मानसशास्त्र


जीवनाची व्याख्या जराशी कुठेतरी कळते कि तिथपासुन ते अनंत काळापर्यंत आपण आनंद शोधत राहतो. खरंच सुखी आणि समाधानी जगणं हे इतकं अवघड काम आहे का ? काही वेळेस आपल्याला असं का वाटतं इतरांच्या आयुष्यात जे सुख आहे, ते आपल्या का नाही ?

का आपल्याला ते सुख किंवा तो आनंद मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. एखाद्या वेळेस ते सुख घरी किंवा मनी जरी नांदत असेल तर त्याचा हवा तसा अनुभव का घेता येत नाही. हे असं आयुष्य नक्की कुठपर्यंत जगायचं.

Advertisement

या सर्व प्रश्नांची उत्तरे खूपच कठीण आहे, असंही नाही. एकवेळेस आपल्याला कठीण जरी वाटत असली तरी ती आपणच जड करून कठीण केलेली असतात. सुखी आणि समाधानी आयुष्य जगणं हे खूपच सोप्प आहे. आपल्या अवास्तव गरजा आणि अवास्तव अपेक्षा यांचं योग्य नियमन आणि व्यवस्थापन करायला शिकलं पाहिजे.

या दोन गोष्टींकडे डोळसपणे पाहिल्यास किंवा हाताळण्यास किंवा त्याचा प्रामुख्याने अभ्यास केल्यास नको नको त्या निरर्थक गोष्टींचा साठा आपण करून ठेवला आहे, आणि त्यालाच कधी काळी आपण सुख मानून बसलो होतो, असेही वाटून जाण्याची शक्यता आहे.

आज आनंद देणारी गोष्ट तुम्हाला उद्या आनंद देईलच याची काही शाश्वती नसते. तुमच्या घरी कधी न येणारे पाहुणे आले तर तुम्ही खूप आनंदी होता परंतु हेच पाहुणे जर १५-२० दिवस कायम तुमच्या घरी राहिले तर तो आनंद पहिल्या दिवसासारखा राहिलंच याची काहीच शाश्वती नसते.

Advertisement

तुम्ही २ BHK फ्लॅट विकत घेतला. तुम्हाला आता असं वाटतंय कि तेथे गेल्यावर माझी मानसिकता आनंदी होण्यास आता मदत मिळू शकेल. ठरवल्याप्रमाणे तुमचे काही दिवस छानही जातात मग नंतर एकटेपणा, रितेपणा तुम्हाला खायला उठतो. जेव्हा चाळीत होतो तेव्हा माणसं तरी दिसायची, घरी यायची, विचारपूस करायची पण इथे मात्र ११ व्या मजल्यावर फार एकटेपणाची जाणीव होते.

वरील या दोन्ही उदाहरणावरून तुमचा आनंद हा बाह्य गोष्टींशी जास्त संबंधित असल्याने त्या आनंदाची व्हॅलिडिटी किती वेळ टिकेल हे आता आपणच अनुभवलं. म्हणजेच पाहुणे येतील आणि आता माझे काही दिवस छान जातील हि मनोवृत्ती परावलंबित्व दर्शविते. आणि तीच मनोवृत्ती १०-१५ दिवस पाहुण्यांचा आस्वाद घेऊ शकते त्यानंतर त्या मनोवृत्तीला सुद्धा कंटाळा येऊ लागेल.

दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा मी आता फ्लॅटमध्ये मस्त आलिशान एकटा जगेन हे सुद्धा बाह्य गोष्टीशी अवलंबून असल्याने तो आनंद जितका जोशाने उगवलेला असेल तितकाच तो जोशाने मावळणाराही असेल कारण तो आनंद भौतिक गोष्टीं बरोबर जास्त मिसळलेला आहे. खरंतर व्यक्ती १० बाय १० च्या खोलीत सुद्धा आनंदाने राहू शकतात हि जिवंत उदाहरणे आपण बघत आलेलो असतो.

Advertisement

परंतु काहीतरी घडेल किंवा कोणीतरी येईल आणि मी आनंदी होईल इथेच कुठेतरी आनंदाची भेसळयुक्त व्याख्या आपल्याला शोधून त्यावर काम करण्याची गरज आहे. लग्न होण्याआधी सुद्धा अशीच स्पप्ने रंगवली जातात. अपेक्षांचा भडीमार झाल्यामुळे, नको त्या गरजा वाढल्यामुळे आनंदापासून आपण कोसोदूर आहोत हि लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे.

अशी हि पुष्कळ माणसे आहेत, ज्यांच्याकडे भौतिक गोष्टींची कसलीच कमतरता नाही, प्रेम करणारी आणि देणारी माणसे आहेत, परंतु ते कोठेही वाहवत जाताना दिसत नाहीत. आनंदाचं अवलंबित्व पत्करणं त्यांच्या जगण्यात कोठेही आढळून येत नाही.

आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार जे मिळेल आणि जितकं मिळेल त्यात आनंद, सुख, समाधान शोधणं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं बाह्य गोष्टींमध्ये मिळणारा आनंद हा तात्पुरता असून जास्त वेळ त्यात गुरफटून न राहणं, म्हणून सतत नवनवीन प्रसंगाशी हातमिळवणी करत राहणं असा प्रवास साधल्यास आनंद आपल्यासोबत दीर्घकाळापर्यंत राहण्याची शक्यता हि वाढते.

Advertisement


Online Counseling साठी !

क्लिक करा“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.