Skip to content

उशिरा का होईना, पण सुरुवात करणं महत्वाचं आहे!!

उशिरा का होईना, पण सुरुवात करणं महत्वाचं आहे!!


मिनल वरपे


तू चाल पुढं तुला र गड्या भिती कुणाची.. पर्वा बी कुणाची… अस म्हणतात ते काही चुकीचं नाही. मनातल्या आणि लोकांच्या भीतीने कोणतेही निर्णय घेताना माघार घेणे आणि नंतर चुकीची जाणिव होणे यापेक्षा आहे वेळ तर एक पाऊल पुढे टाकण्यात अजून कसला वेगळा विचार करायला हवा…

काहीच न करता नंतर डोक्याला हात लावण्यापेक्षा कोणत्याही गोष्टीची सुरवात केलेली केव्हाही उत्तम…

बहुतांश वेळा आपण कोणतेही निर्णय घेताना उशीर करतो आणि आता वेळ निघून गेली आता काहीही करून उपयोग नाही असा विचार करून निराश होतो.पण ही निराशा बाळगण्यापेक्षा प्रयत्नांच एक पाऊल पुढे टाकले तर मनात नविन आशा निर्माण होते.

निर्णय कोणतेही असुदेत त्यांना टाळून नंतर पछाताप करण्यापेक्षा मार्ग निवडून सुरवात करणे कायम उत्तम ठरेल.

कोणतेही निर्णय उशिरा घेण्यासाठी खालील बाबी नक्कीच कारणीभूत असतात जस की,

मनातली भीती

कोणतीही गोष्ट करायची असली की ते मला जमेल की नाही, मी चुकलो तर, मला कोण काय म्हणेल,जर मी घेतलेला निर्णय चुकीचा ठरला तर मला कोणी हसलं तर, यासारख्या असंख्य मनातील भीती यामुळे आपण निर्णय घेताना घाबरतो.

पण अशा भीती मुळे नुकसान हे आपलंच होते.त्यापेक्षा ती गोष्ट करून अनुभव घेतलेलं योग्य ठरेल.कारण जो पर्यंत आपण ती गोष्ट न घाबरता करत नाही तोपर्यंत आपल्या मनातील भिती दूर होणार नाही.

यशाची अपेक्षा

प्रत्येक वेळी मी जे करणार त्यामधे मला यश मिळायलाच पाहिजे अशी अपेक्षा करणे आणि या अपेक्षा पूर्ण होतील की नाही याचा विचार करून निर्णय घ्यायला उशीर करणे.

पण यश मिळेल की नाही हा विचार करत वेळ घालवण्यापेक्षा कृती करून मोकळं व्हायचं. यश किंवा अपयश हे आपली प्रयत्नांवर अवलंबून असतात.

अपयशाचा अनुभव

याआधी घेतलेल्या काही निर्णयांमध्ये आपल्याला काहीवेळेस अपयश मिळते आणि त्या अपयशाची भीती मनात बाळगणे त्याचबरोबर पुन्हा अपयश पदरी पडू नये याची भीती.

एकदा अपयश मिळालं म्हणून कायम तसच होणार ही नकारात्मक भावना मनातून काढून आलेल्या अनुभवातून शिकवण घेऊन प्रयत्न करायचे. अपयश ही यशाची पायरी असते हा विचार कायम आपल्यासोबत असावा.

पुढची चिंता करणे

घेतलेला प्रत्येक निर्णय हा भविष्यात उपयोगी होईल .आणि भविष्याची काळजी करत पुढे कस होईल, घेतलेला निर्णय अचूक ठरेल का, तसेच घेतलेल्या निर्णयाचे भविष्यावर होणारे परिणाम याचा आताच विचार करून निर्णय घेताना गोंधळने.

भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमान कसा उत्तम घडवता येईल यावर आपण लक्ष केंद्रित केले तर भविष्य आपोआपच उत्तम असेल.आता या क्षणाला मला जे योग्य वाटते ते मी करणार आणि माझा निर्णय जरी चुकला तरी मला पुढे त्यामधे बदल करता येतील अशी सकारात्मक विचारसरणी केली तर उत्तमच.

आळस

एखादी गोष्ट आपल्याला करायची तर असतेच पण त्यावेळी मात्र आपण त्या गोष्टीला तेवढं महत्व न देता पुढे ढकलत दिवस वाढवतो.आणि शेवटी उशीर होतो.म्हणून ज्या वेळेचं त्यावेळी कोणतेही काम केलेले कायम उत्तम.

आपण निर्णय पुढे ढकलू शकतो पण वेळ नाही.गेलेली वेळ पुन्हा मिळत नसते.म्हणून आळस न करता निर्णय घेऊन मोकळं झालेलं बर.

या सर्व विचारांमुळे, मानसिकतेमुळे आपण निर्णय घेताना उशीर करतो. वेळ कोणासाठी थांबत नाही हे जितकं खर असल तरी उशिरा का होईना पण सुरवात करणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं..



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “उशिरा का होईना, पण सुरुवात करणं महत्वाचं आहे!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!