Skip to content

आपल्या मानसिक ऊर्जेवर आपलं सुख-दुःख अवलंबून आहे.

उर्जा नियोजन


मधुश्री देशपांडे गानू


ही चराचर सृष्टी , प्रत्येक सजीव एकाच ऊर्जेने बनलेले आहेत. हे तर सर्व मान्य आहेच. आज आपण फक्त मानवी उर्जे बद्दल विचार करणार आहोत.

प्रत्येक मानवातील ऊर्जा ही चराचर सृष्टीतील प्रत्येक घटकाशी जोडलेली आहे. ही ऊर्जा तुमचा श्वास , तुमचा प्राण , तुमची बुद्धिमत्ता , तुमची पंचेंद्रियांची क्षमता , तुमचे मन यामध्ये कार्यरत असते. आपण ही ऊर्जा कशी उपयोगात आणतो हे समजणे ,समजून घेणे खूपच गरजेचे आहे.

आपण लहानपणापासून काही ठराविक वाक्य ऐकत आलेलो आहोत. अगदी आपल्या आजी-आजोबांनी, आईने सांगितलेली. “नेहमी चांगलं , शुभ बोलावं घर, वास्तु तथास्तु म्हणते”. किंवा “भरल्या घरात कंटाळा आला असं म्हणू नये” असं बरंच काही. आता तर अध्यात्मिक दृष्टीनेही आपण बरंच काही वाचतो.

आपण जो काही विचार करतो.. साधक-बाधक त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. आपले विचार, आपली ऊर्जा या सृष्टीतील एकूण उर्जेवर परिणाम करते. आपण जो विचार करू तशी नकारात्मक , सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही सृष्टी त्याच प्रकारची ऊर्जा आपल्याकडे परत पाठवते. हे तंतोतंत खरं आहे.

आपल्या विचारांचा, कृतीचा आपल्या शरीरावर , आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक , नकारात्मक परिणाम होतो. आणि त्यातून आजार उद्भवतात. मनुष्यजन्म हा एकदाच मिळतो. आणि ही आपली अत्यंत मौलिक अशी ऊर्जा जर आपण नीट वापरली नाही तर त्याचे परिणाम आपल्याला, आपल्या प्रेमाच्या माणसांना आणि चराचर सृष्टी लाही भोगावे लागतात.

अर्थात हे समजायला , आचरणात आणायला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. मीही शिकतेच आहे. आपण सर्वच सामान्य , सांसारिक माणसं आहोत. त्यासाठी लागणारे कष्ट, येणाऱ्या अडचणी , त्यातून निर्माण होणारा ताण , राग-लोभ, रुसवे-फुगवे अपेक्षाभंग , विश्वास घात, सुख-दुःख आणि अनेक आनंदी भावना यातून आपली सुटका नाही आणि नकोच आहे. या सगळ्या कडू-गोड अनुभवांसकटच आपल्याला आयुष्य जगायचं आहे.

पण मग आपल्या ऊर्जेचं आपण योग्य नियोजन केलं तर! तर आपण आहे त्या परिस्थितीतही शांत, आनंदी, समाधानी राहू शकतो. आपली चेतना , ऊर्जा कशी आणि कुठे वापरायची याचे नियोजन करता आले पाहिजे. नीट विचार केला तर दिवसभरात आपण कितीतरी निरुपयोगी गोष्टी करतो.

विनाकारण चिडचिड , चिंता , काळजी करतो. निरर्थक बडबड करतो. आणि एखाद्याबद्दल प्रचंड असूया, ईर्ष्या, स्पर्धा , चढाओढ, एखाद्याच्या आयुष्यात नको तितकं लक्ष घालणे, उगाचच गाॅसिप करणे , भौतिक गोष्टींची बरोबरी करणे , तुच्छ लेखणे , हेटाळणी करणे, मित्र मैत्रिणीं मध्ये राजकारण करणे अशा कितीतरी नकारात्मक गोष्टींमध्ये आपण आपली ऊर्जा वाया घालवतो.

आणि याच विचारांचा आपल्या शरीरावर, मनावर अत्यंत वाईट परिणाम होतो. हीच ऊर्जा नीट मार्गी लावली तर आपले शारीरिक , मानसिक , बौद्धिक आरोग्य उत्तम राहते. परत एकदा सांगते अवघड आहे पण कठीण नाही. मीही प्रयत्न करते आहे. मलाही कधीतरी राग येतोच की.

सामान्य माणसं आपण.. कोणत्याही नात्यामध्ये अगदी किमान काही अपेक्षा असतात. त्याही जर पूर्ण झाल्या नाहीत तर राग येतो , दुःख होतं. पण हा राग कसा आणि कुठे व्यक्त करायचा हे या नियोजनाने समजतं. आपलं म्हणणं, आपला मुद्दा आपण नीटसपणे मांडूच शकतो.

आपलं शरीर आपल्या शब्दांनाही प्रतिक्रिया देत असतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणते शब्द उच्चारायचे याचेही नियोजन हवं. तुमचा मुद्दा पटवून देताना दुसऱ्याला कमी लेखू नका, अपमान होईल असं बोलू नका.

अनेकांना शिव्या देऊन बोललं की दमदार, मर्दुमकी गाजविली असं वाटतं. हे समोरच्या पेक्षाही आपल्याला घातक आहे. सौम्य बोलणारी माणसं बावळट, नेभळट वाटतात. हल्ली तर आगाऊ , उद्धट, मोठ्या माणसांचा सहज अपमान म्हणजे स्मार्ट असा गैरसमज आहे आपल्याकडे…

या संपूर्ण सृष्टीत फक्त ऊर्जा स्थिर, कायम आहे. आणि ऊर्जाच काम करते. तुम्ही चांगले सकारात्मक विचार करण्याची, बोलण्याची सवय जाणीवपूर्वक लावून घेतली तर तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं सकारात्मक घडू लागतं.

हा माझा अनुभव आहे. हे फक्त आणि फक्त ध्यानानेच शक्य आहे. कोणाला पटो अथवा ना पटो. अनेक फायदे आहेत ध्यानाचे. तुमची आभा, तुमचा भाव स्वच्छ , निर्मळ होतो. तुमची तब्येत उत्तम राहते. तुमचा दृष्टिकोन , प्रतिक्रिया देण्याची पद्धत बदलते.

सर्वात महत्त्वाचं मला जाणवलेले म्हणजे तुम्ही माणसं ओळखायला शिकता. आपसूकच सावध, सजग होता. माणसांतला खोटेपणा, खरेपणा, विश्वासू पणा, फसवेपणा, लबाडी, सचोटी तुमच्या लगेच लक्षात येते. तो द्रष्टेपणा तुमच्यात येतो.

तुम्ही प्रत्येक वेळी बोलून दाखवालच असं नाही. पण समोरच्या माणसाची मानसिकता, स्वार्थीपणा सच्ची मैत्री, प्रेम, तुमच्याबद्दलची काळजी लगेच लक्षात येते. अर्थात यावर तज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा. पण हा माझा अनुभव आहे.

तर आपल्यातील ऊर्जेचे नियोजन खूप गरजेचे आहे. योग्य व्यायाम, योग्य आहार , योग्य निद्रा याबरोबरच याची ही नितांत गरज आहे. “आत्ता हा क्षण माझा आहे आणि तो मी आनंदाने जगणार”.

भूतकाळाचं ओझं, भविष्यकाळाचा फार विचार, आपल्या हातात नसणाऱ्या गोष्टींची, घटनांची चिंता यासाठी ऊर्जा वाया घालवायची नाही. कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही. सहज मोकळेपणाने कौतुक करा.

आपली प्रेमाची माणसं आपल्यासाठी महत्वाची आहेत हे त्यांना जाणवून द्या. सकारात्मक, आनंदी विचारांची सवय लावून घ्यायची. मग एका पातळीवर तुम्ही आनंदी होता, आनंदी असता.. तुमचा आनंद आतून आलेला असतो.

तो बाह्य गोष्टींवर, व्यक्तींवर अवलंबून राहत नाही. परत एकदा सांगते, मीही विद्यार्थीच आहे. माझ्याकडूनही अजूनही चुका होतात. त्या दुरुस्त करायचा प्रयत्न नक्कीच करते. फक्त पैसा कमवायचं मशीन न बनता असं काहीतरी जे तुम्हाला आनंद देईल ..एखादा छंद, आवड याला जरूर, जरूर वेळ द्या. तुमच्या ऊर्जेचा इथे सदुपयोग करा. आणि बघा मिळणारा *आनंद अवर्णनीय असेल.

मला माहिती आहे ..लेख खूप मोठा झालाय म्हणून आता थांबते. तरीही नक्की यावर विचार करा, आचरणात आणा. मी सांगते म्हणून नाही तर त्याने खरंच तुमच्या रोजच्या जीवनात खूप चांगला बदल घडून येईल म्हणून करा. आणि मला नक्की सांगा बर का!.. परत असंच काही घेऊन येईनच.. तोपर्यंत मस्त राहा.. आनंदी राहा.. स्वस्थ राहा..



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपल्या मानसिक ऊर्जेवर आपलं सुख-दुःख अवलंबून आहे.”

  1. अनंत ठाकरे

    खूप छान मौलिक मार्गदर्शन,समुपदेशनपर विचार! खूप खूप धन्यवाद!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!