Skip to content

झोप येत नाही ? हे घरगुती उपचार करून पहा !!

झोप येत नाही, हे घरगुती उपचार करून पहा !!


हरी कृष्ण बाखरू

(निसर्गोपचार तज्ज्ञ)


अजिबात झोप येत नाही याचाच अर्थ निद्रानाश. अर्थात निद्रानाश यामध्ये गाढ झोप न लागणे किंवा जास्त वेळ झोप न येणे, पटकन जाग येणे अशा झोपेबद्दलच्या सर्व तक्रारीचा समावेश आहे. सध्याच्या आधुनिक जगात शहरातील सुखवस्तू किंवा श्रीमंत लोकांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे.

कारणे आणि लक्षणे

एखादी व्यक्ती झोप येत नाही अशी तक्रार करते, याचाच अर्थ तिला निद्रानाशाचा त्रास सुरु झाला आहे, असे समजावे. अर्थात झोपेची वेळ, झोपेचा प्रकार यांमध्ये सतत बदल होत राहतात. झोपेच्या प्रकारांत सतत बदल होत राहणे, स्मरणशक्ती कमी होणे आणि दिवसा कामात लक्ष न लागणे हि रात्री उत्तम झोप न लागण्याची लक्षणे आहेत.

शांत, सलग झोप न मिळाल्यामुळे अशी व्यक्ती सतत चिडचिड करते, गोंधळलेल्या मनःस्थितीत असते. तसेच भावनिक अस्वस्थता राहिल्यामुळे वागणुकीत योग्य मेल राहत नाही.

निद्रानाशाचे मुख्य कारण मानसिक ताणतणाव हेच आहे. चिंता, दडपण आणि एखाद्या गोष्टीमुळे झालेला भावनिक उद्रेक या कारणांनी आपल्या मनावर दडपण येते. संताप, राग आणि कडवेपणाच्या भावना मनात दाबून टाकल्यामुळे झोप येत नाही.

बद्धकोष्ठता, अपचन, रात्रीच्या वेळी जास्त खाणे किंवा जास्त प्रमाणात चहा-कॉफी घेणे, धूम्रपान आणि भुकेल्या पोटाने अंथरुणावर पडणे अशा कारणांनीही निद्रानाश होतो. बहुतेक वेळा झोप येईल कि नाही हा मनातील विचार एवढे एक कारणही झोप न लागल्यास पुरेसे ठरते.

उपचार

शरीरामध्ये बी जीवनसत्व किंवा थायामिन याची कमतरता झाल्यास नैसर्गिकपणे स्वस्थता आणि झोप मिळू शकत नाही. स्नायू बळकट आणि सशक्त करण्याचे काम थायामीन करते. यासाठी कोंडामुक्त धान्य, पीठे, डाळी आणि सुकामेवा हि खाण्यात हवीत.

लेट्युस :

लेट्युसच्या पानांमध्ये ‘लाक्तूकॅरिअम’ हा झोप आणणारा घटक असतो. म्हणून लेट्युसची पाने निद्रानाशावर उपचार म्हणून वापरतात. लेट्युसच्या पानांच्या रसाने अफूप्रमाणे गुंगी येते. परंतु अफूसारखे दुष्परिणाम होत नाहीत.

लेट्युसच्या बियांचा काढा करून प्यायल्यानेही झोपेच्या तक्रारी कमी होतात. तीन कप पाण्यात एक मोठा चमचा बिया घालून पाणी एक तृतीयांश होईपर्यंत उकळवावे आणि ते प्यावे.

दूध :

रात्री झोपताना एक पेला दुधात एक चमचा मध घालून ते प्यावे. याचा उपयोग टॉनिक म्हणून तर होतोच, शिवाय स्वस्थता मिळून चांगली झोप लागते. पायाच्या तळव्यांना रोज रात्री झोपताना दूध चोळावे. चांगला उपयोग होतो.

दही :

झोप न येणाऱ्या व्यक्तीने भरपूर दही घ्यावे आणि डोक्याला चोळावे. चांगली झोप येऊ लागते व निद्रानाश बारा होतो.

दुधी भोपळा :

दुधी भोपळ्याचा रस आणि तिळाचे तेल सम प्रमाणात एकत्र करून डोक्यावर रोज रात्री चोळावे. चांगली झोप लागते. दुधी भोपळ्याची पाने शिजवून केलेली त्यांची भाजी खाल्ल्यानेही झोप चांगली लागते.

बडीशेप :

निद्रानाशाचा विकार घालविण्यासाठी बडीशेपेचा चहा करून प्यावा. अडीच कप पाण्यात एक चमचा बडीशेप घालून ते उकळवावे. त्यानंतर भांड्यावर ठेऊन १५ मिनिटे ते तसेच राहू द्यावे. चहा गाळून गरम गरम प्यावा. चहात थोडा मध आणि गरम दूध घातले तरी चालते. जेवणानंतर किंवा झोपण्यापूर्वी रात्री हा चहा प्यावा.

मध :

एक कप पाण्यात दोन चमचे मध घालून ते झोपण्यापूर्वी प्यावे. मधामुळे चांगली शांत झोप लागते. लहान बाळांना थोडासा मध चाटवला तरी त्यांना झोप येते.

सर्पगंधा :

गुंगी आणणारी सर्पगंधा हि औषधी वनस्पती निद्रानाशावर प्राचीन काळापासून वापरली जाते. सर्पगंधाच्या पहिल्याच डोसाने रोग्याला सुस्ती येईल. सर्पगंधाच्या मुळीची पूड ०.२५ ग्राम घेऊन त्यात वासासाठी थोडी दालचिनी मिसळावी आणि झोपण्यापूर्वी घ्यावी. रात्रभर छान झोप लागेल. झोप न येण्याची तक्रार बरीच जुनी असेल तर रोग्याला काही दिवस सकाळी व रात्री दोनदा हे औषध द्यावे.

आहार

शांत झोपेमध्ये मिठामुळे अडथळा येतो, असे म्हणतात. त्यासाठी रोग्याला कमी मीठ घालून केलेले पदार्थ खाण्यास द्यावे. संतुलित आहार आणि खाण्याच्या पद्धतीमध्ये केलेले सोपे बदल निद्रानाश बरा करण्यात महत्वाचा वाटा उचलतात. मैद्याचे व साखरेचे पदार्थ, चहा, कॉफी, चॉकलेट, शीतपेय, मद्य, तळलेले पदार्थ वर्ज्य करावे.

इतर उपाय

उत्तम आणि शांत झोप येण्यासाठी रोज सकाळी चांगले व्यायाम प्रकार करावे, तर रात्री सौम्य व्यायाम करावा. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगासने करावी. शीर्षासन, सर्वांगासन, उत्तानासन, शवासन हि आसने चांगली झोप येण्यासाठी करणे उपयुक्त ठरते.

रोग्याने मनावरील सर्व ताण घालविण्याचे प्रयत्न करावे. त्या दृष्टीने प्रयत्न करताना सर्वप्रथम ध्यान करण्याचे तंत्र शिकावे. खाणे, चालणे, बोलणे या रोजच्या क्रिया शांतपणे, सावकाशीने कराव्या. नऊ ते दहा तास काम करावे.आठवड्यात किमान पाच ते साडेपाच दिवस काम करण्याची सवय लावून घ्यावी.

एखादा छंद जोपासावा. त्यासाठी रोज थोडा वेळ द्यावा. त्यामुळे मन प्रफुल्लित राहते. तसेच अतीखडतर उद्दिष्टे समोर ठेऊ नयेत. कारण हि उद्दिष्टे किंवा साध्ये पूर्ण न झाल्यास नैराश्य येते आणि झोप उडते.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!