सकाळ ….
मिनल वरपे
सकाळ या शब्दातच चेतना आणि स्फूर्ती जाणवते. निसर्गाचं चक्र कधीच थांबत नाही. सूर्य उगवायचा कधी विसरत नाही आणि मावळताना त्याची वेळ चुकत नाही. चंद्र, चांदणे, ऊन, पाऊस, वारा या सगळ्या निसर्गापासून आपल्याला किती छान शिकवण मिळते.
काहीही झालं तरी निसर्ग त्याच चक्र नित्यनेमाने चालवतो. ज्याला हसता बोलता येत नाही, भावना व्यक्त करता येत नाही, रागावणे रुसने याचा त्याच्याशी संबंध नाही असे पशू पक्षी सुद्धा आपल्याला कळत नकळत जगण्याचे धडे देतात.
सकाळ झाली की घरट्यातून बाहेर पडणे आणि संध्याकाळची चाहूल लागली की कितीही आवडीचा दाना असेल तरी तो सोडून घरट्याकडे झेप घ्यायची. खाली पडलं तरी उंच उडायचा प्रयत्न करायचा हे सगळं पक्षी आपल्याला शिकवतात.
पण ज्याला हसता बोलता येते, जो दुसऱ्याच्या मनातलं सुद्धा ओळखू शकतो, ज्याला जाणीवा आहेत, ज्याला भावना आहेत,जो व्यक्त होऊ शकतो असा मनुष्य मात्र का मागे पडतो?????
दु:खामागे सुख आणि सुखामागे दुःख हे आयुष्याचं चक्र आहे आणि ते अविरतपणे चालणारच हे माहीत असताना सुद्धा का जगण्याला घाबरतो.
सुख आल तर बेभान होतो आणि दुःख आल की इतकं ढासळतो की सांभाळणं कठीण जाते. इतकं शिकून सुद्धा शहाणपण मनुष्याला का येत नाही???
यश-अपयश हे नशिबावर अवलंबून असते हा मोठा भ्रम घेऊन माणूस जगतोय. कारण नशिबाचा काय संबंध.. यश त्यालाच मिळते जो त्याच्यासाठी प्रयत्न करतो हालचाल करतो आणि अपयश हे तेव्हा मिळते जिथे प्रयत्न करण्याची सुद्धा तयारी नसते.
पण केलेल्या प्रत्येक प्रयत्नात यश मिळेलच असे नाही काहीवेळेस अपयश सुद्धा मिळू शकते. म्हणून काय प्रयत्न करायचे सोडायचे का???
मित्र मैत्रिणी, नाती हे सगळं माणसांना असतात.ना प्राण्यांना ना पक्षांना पण याची जाणीव ठेवून नाती तसेच माणसं जपणे आपल्याला का जमत नाही???
या सगळ्याच एकच कारण आहे ते म्हणजे आपण निसर्गाकडून काही शिकायचा विचार सुद्धा करत नाही.जस निसर्ग चक्र अविरत चालू असते अगदी तसच सुख येऊदेत नाहीतर दुःख आपलं आयुष्य जगायचं नाही सोडायचं. दुःखांना कंटाळून जीव देणं असा मूर्खपणा कधीच करायचा नाही.
जस पक्षी उंच झेप घ्यायचा प्रयत्न करतात खाली पडले तरी प्रयत्न करायचं सोडत नाहीत तसच आपण सुद्धा यश मिळो वा ना मिळो प्रयत्न करायचं सोडायचं नाही.
मुके प्राणी काही न बोलता कोणती अपेक्षा न ठेवता आपली रक्षा करतात आणि आपल्याशी एक वेगळच नात जोडतात.तर त्यांच्या या वागण्यातून आपण सुद्धा माणसं जोडायच शिकायला हवं.
आपण कायम सूर्य, चंद्र, तारे यांच्यासारखे जगायचं.. येणारा प्रत्येक दिवस जगायचं.. येणारे सुख, दुःख, यश ,अपयश ,संकट यांच्यामुळे आपलं जगणं नाही सोडायचं. रोज नवीन ऊर्जा नविन उत्साह घेऊन दिवसाची सुरवात करायची…..


