Skip to content

या ‘९’ मार्गाने आपण एखाद्याचे मन ओळखू शकतो.

या ‘९’ मार्गाने आपण एखाद्याचे मन ओळखू शकतो.


श्री. राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


समोरच्याचे मन ओळखण्याची कुतुहुलता प्रत्येकाच्या ठिकाणी असतेच असते. जर समोरच्याचे मन जाणून घेतले तर आपल्याला त्या व्यक्ती बरोबर कशी वागणूक ठेवायची आहे, हे समजते. पुष्कळदा विचार करणारी व्यक्ती हि कुणालाही कळू देत नाही कि ती नेमकी काय विचार करत आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असे काही मनाचे भाग असतात ज्यामध्ये ते मोकळेपणाने कोणाशीही बोलू शकत नाहीत, किंबहुना बोलण्याची आवश्यकता वाटत नाही किंवा समोरच्याने ते ओळखून घ्यावे आणि त्याबद्दल आदरपूर्वक वागणूक मिळावी, अशी धारणा असल्यामुळे मनात नेमकं काय सुरु आहे, हे ओळखणं आणखीन अवघड बनत चाललेलं आहे.

ज्या व्यक्ती मनाने अगदी एकमेकांच्या जवळ असतात, त्यांच्याही आयुष्यात कधी काळी असा प्रसंग येऊन जातो कि, त्यावेळी मनात काय सुरु आहे हे ओळखताच येत नाही.

अशा वेळी मनात काय सुरु आहे, हे वेगळ्या मार्गाने सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. जेणेकरून नात्यांमधला सलोखा टिकून राहील. ते मार्ग पाहूया..

१) नजरेला नजर कमी देणे.

जर एखादी व्यक्ती तुमच्यावर तीव्र नाराज झाली असल्यास तर ती जास्तीत जास्त हाच प्रयत्न करते कि ती नजरेला नजर देत नाही. यामध्ये अशाही काही व्यक्ती असू शकतात ज्या मनातल्या भावना कळू नये म्हणून नजरेला नजर देऊही शकतात. परंतु त्यावेळी त्यांचे डोळे पुष्कळ काही सांगत असतात. हे निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असेल.

२) सारखे घड्याळ पाहणे किंवा बाहेर पाहणे.

जर एखाद्या व्यक्तीला तुमचा कंटाळा आलेला असेल तर तिचे वर्तन अशा प्रकारचे असू शकते. त्याचप्रमाणे जर ती व्यक्ती कोणाची किंवा कशाची तरी आतुरतेने वाट पाहत असल्यास ती घड्याळ बघेल, बाहेर बघेल किंवा तिची शारीरिक ठेवण सतत हालचालीची असू शकते.

३) पाय हलवणे किंवा बोटे मोडणे.

असे वर्तन असणाऱ्या व्यक्ती कोणत्यातरी विचारात असतात. ते अतिविचारच करत असतील असे नाही. कारण अतिविचार करणाऱ्या व्यक्ती विचार करून करून थकलेल्या असतात, त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली या मंदावतात. कदाचित या व्यक्ती कोणत्यातरी प्लॅनिंगचा सुद्धा विचार करत असतील. ज्यामध्ये करिअर, कुटुंब जबाबदारी, भविष्य नियोजन वगैरे गोष्टी येऊ शकतात.

४) एका जागी नुसते बसून राहणे.

या व्यक्तींच्या मनात टोकाकडची निराशा असू शकते. त्यांचे शरीर त्यांना हालचाल करायला मदत करत नसतात. इतके ते निराशाजनक मनःस्थितीत असलेले आढळतात. मन वळविण्यासाठी या व्यक्ती काहीतरी तोकडे काम करण्याचा प्रयत्न करतात. पण त्या कामाचा वेग अत्यंत कमी असतो. तसेच ते काम अर्धे सोडून किंवा आटपून पुन्हा ते एका जागेवर थंड होतात.

५) हळू आवाजात अडकत बोलणे.

या व्यक्तीच्या मनात कशाचेतरी दडपण असते. तसेच स्वतःला कमी लेखणे किंवा यांचा आत्मविश्वास फार कमी असतो. फार बारीक बोलणे किंवा काही परिस्थितीत अत्यंत मोठ्या, कल्लोळ आवाजात सुद्धा बोलून ते मनातलं दडपण रागाच्या भरात बाहेर काढतात.

६) एखाद्याकडे सारखे पाहणे.

या व्यक्तींना आपल्याकडून कोणत्यातरी गोष्टींची अपेक्षा आहे, असे हे वर्तन संदेश देत असतात. त्या व्यक्तीला प्रेमाची अपेक्षा असेल, सुरक्षिततेची, काळजीची अर्थात त्यामुळे ते सारखे पाहून अप्रत्यक्षपणे सांगत असतात.

७) मोठ्या आवाजात बोलणे.

सर्वांनी माझ्यानुसार करायला हवं, माझे ऐकले गेले पाहिजे किंवा स्वतःच्या दबदब्याबद्दल इतर माणसांमध्ये शंका आहे कि काय असे जेव्हा या व्यक्तीला वाटते तेव्हा ती आवाज चढवूनच बोलते. काही काही व्यक्तींना प्रत्येक प्रसंगांमध्ये असेच आवाज मोठ्याने चढवून बोलण्याची सवय लागते, त्यामागे त्यांचे असुरक्षित भाव असतात.

८) नेहमीपेक्षा जास्त हसणे.

एकतर या व्यक्ती मनाने प्रचंड दुःखी असू शकतात किंवा सतत दुःख करण्यावर त्यांनी हा पर्याय अवलंबला असेल. ज्या व्यक्तींपासून किंवा प्रसंगांपासुन त्या सर्वाधिक दुखावले असतील, त्याच ठिकाणी ते चेहरा जास्त आनंदी ठेवतात. यामध्ये काही चुकीचे नाही, असे त्या व्यक्तीला जरी वाटत असले तरी जवळच्या व्यक्तींना मात्र सूक्ष्म निरीक्षणाशिवाय त्यांच्या मनाचा पत्ताच लागत नाही.

९) सतत नकारार्थी बोलणे.

जग स्वार्थी आहे, काही केल्याने काहीच होत नाही, हे असंच असतं, हे नको करूस, ते नको करुस वगैरे सतत नकारार्थी बोलणाऱ्या व्यक्ती आतून पूर्ण खचलेल्या असतात. त्यांचा जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनानुसार त्यांना चांगल्यापेक्षा वाईट अनुभवच फार आलेला असतो. म्हणून पुढेही असं जगणं आहे. म्हणून ते तीव्र नकारार्थी अनुभवात जगत असतात. सततच्या निराशेमुळे या व्यक्तींच्या मनात आत्महत्येचे विचार सुद्धा येणारे असतात किंवा येऊन गेलेले असतात.

वरील या ९ मार्गाने आपण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या किंवा अशा व्यक्ती ज्यांच्याबरोबर आपले रोजचे स्नेहाचे संबंध जुडलेले आहेत त्यांच्या अंतर्गत मनात चाललेल्या घडामोडींचा अनुभव घेऊ शकतो.

या क्षणी कोणती व्यक्ती नेमकी काय विचार करत आहे, हे सांगणे अद्यापतरी कोणत्याही शास्त्राला शक्य नाही, परंतु व्यक्तीच्या ठिकाणी एखादे विशिष्ट वर्तन सातत्याने आढळून आल्यास नक्कीच त्या व्यक्तीच्या मनात नेमके काय सुरु आहे, याचा आपण अंदाज घेऊ शकतो.

आणि आपल्यात असणारे सलोख्याचे संबंध अजून मजबूत करू शकतो. संबंधित विषयाला अनुलक्षून आणखीन मुद्दे पुढच्या लेखात  अधोरेखित करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद !



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “या ‘९’ मार्गाने आपण एखाद्याचे मन ओळखू शकतो.”

  1. Best friend baddal ahe.
    Apan jar friend mhanun ekhadyachi jast kalji gheto. Tyachi satat athavan yene ..ani tya vyaktisathi kahipn karne.kay ahe.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!