Skip to content

प्रेम मिळालं नाही, म्हणून इतरांना प्रेम द्यायचं सोडू नका!

प्रेम मिळालं नाही, म्हणून इतरांना प्रेम द्यायचं सोडू नका!


मिनल वरपे


प्रेम ही एक अशी भावना ज्यामधे उत्साह , आनंद, एक वेगळीच ऊर्जा असते. प्रेमाला वयाची वा कसलीच मर्यादा नसते. गरीब असो वा श्रीमंत, काळा असो वा गोरा, ना जात ना धर्म… प्रत्येक व्यक्तीला प्रेम करण्याचा अधिकार हा असतोच.

पण हे प्रेम मात्र जबरदस्ती च नसावं.. प्रेम हे कोणावर लादता येत नाही.. माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याने सुद्धा माझ्यावर प्रेम केलेच पाहिजे हा अट्टाहास अगदीच चुकीचा आहे.

आई वडील नातेवाईक तसेच मित्र मैत्रिणी या नात्यात सुद्धा प्रेम असतेच ना म्हणून तर एकमेकांची काळजी असते. पण तिथे कोणती जबरदस्ती नसतेना?? कारण ती नाती जबरदस्तीने नाही तर आपुलकीने जवळ आलेली असतात.

प्रेम ही एक भावना आहे जी आपल्याला जाणवते. पण दुसऱ्याला सुद्धा ती जाणवेल च असे नाही. प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात, प्रत्येकाचा स्वभाव सारखाच नसतो.

म्हणून जे आपल्याला आवडेल आणि आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करू ती व्यक्ती आपल्याला मिळायलाच पाहिजे ही अपेक्षा चुकीची आहे.

आणि मग अशा चुकीच्या अपेक्षा करण्यामुळे फक्त त्रास च होतो. आपण स्वतःला सुद्धा त्रास करून घेतो आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा भावनिक त्रास देतो.

बहुतेक मुलं मुली प्रेम मिळालं नाही म्हणून चुकीचे मार्ग निवडतात. काहींना व्यसन जडते तर काही अभ्यासाकडे लक्ष न देता स्वतःच भविष्य बिघडवतात. प्रेम भंग झालं, ब्रेक अप झालं म्हणून काही तर जीव देण्यापर्यंत हिम्मत करतात.

पण या सगळ्या वागण्यातून आपल्याला काय हाती लागते. आपण असे वागतो पण त्याचा त्रास मात्र आपल्या कुटुंबाला होतो. चुकीचा मार्ग जरी निवडला तरी त्यातून काय साध्य होते?? ही प्रेमाची भावना तर आता निर्माण झाली पण त्या आधी तर आपण जगतच होतोना??

प्रेम मिळालं नाही किंवा ब्रेक अप झालं म्हणून जगायचं सोडण्यापेक्षा सगळे वाईट विचार सोडून नाविण्याने जगा..प्रेमात अपेक्षांचं ओझ ठेवू नका.

मोकळेपणाने जगा.. इतरांकडे पाहा..प्रत्येकाचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होतातच असे नाही तरी तर आयुष्य जगायचं सोडत नाही तर मग आपण का इतक्या सहज आयुष्य संपवायचा विचार करतो.

आपल्याला जन्म मिळाला आहे तो काहीतरी करण्यासाठी.. आपली कर्तव्य, जबाबदाऱ्या यांपासून पळ काढण्यासाठी नाही.

जस कोणाच्या येण्या जाण्याने आयुष्य संपत नाही अगदी तसच आपण रडत बसल्याने दुःख कमी होणार नाही.म्हणून दुःखात अडकून पडायचं नाही.

प्रेम मिळालं नाही म्हणून जिवंत राहून भावनाहिन वागण्यापेक्षा आयुष्यात बऱ्याच करण्यासारख्या गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष द्या. रडत आणि दुसऱ्यांना त्रास होईल असे वागून जगण्यापेक्षा इतरांना जगण्याचं कारण आपल्या वागण्यातून मिळेल अस जगा…

आयुष्यात सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख हे चालूच राहणार आहे म्हणून आनंदाने जगा..जे येईल ते स्वीकारा.. आपल्याला आपलं प्रेम नसेल मिळालं म्हणून दुसऱ्याला आपण प्रेम द्यायचं सोडू नका.

आयुष्य ही अतिशय सुंदर गोष्ट आहे आणि प्रेम हा त्यातला धडा आहे. त्यातून मिळणाऱ्या उपदेशाचा आपल्या पुढील आयुष्यात उपयोग करून आपण आपलं जीवन खूप चांगल्या प्रकारे जगू शकतो. प्रेम करा पण त्याचा आग्रह धरू नका….



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!